समंथा-नागा चैतन्याचा घटस्फोट; अभिनेत्रीने सोशल मीडियावरून दिली माहिती

अभिनेत्री समंथा आणि नागा चैतन्या यांच्यात बिनसलं असल्याची मागील काही दिवसांपासून सुरू होती चर्चा
समंथा-नागा चैतन्याचा घटस्फोट; अभिनेत्रीने सोशल मीडियावरून दिली माहिती
अभिनेत्री समंथा आणि अभिनेता नागा चैतन्या.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्या यांच्या नात्याविषयी मागील काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा खरी ठरली आहे. समंथा आणि नागा चैतन्या घटस्फोट घेत आहे. अभिनेत्री समंथानेच सोशल मीडियातून ही घोषणा केली आहे.

सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक असलेलं समंथा-नागा चैतन्या यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांमधील नात्यांबद्दल मागील काही दिवसांपासून बरीच चर्चा सुरू होती. मात्र, दोघेही त्याबद्दल मौन धरून होते. अखेर समंथाने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं.

समंथा म्हणाली...

'खूप विचार केल्यानंतर मी पतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. आता आमचे मार्ग वेगवेगळे असतील. आम्ही खूप नशिबवान आहोत की मागील एका दशकापासून खूप चांगले मित्र म्हणून राहिलो. तेच आमच्या नात्यातील महत्त्वाचं अंग राहिलं. तोच बंध आमच्यात कायम राहिल, यावर आमचा विश्वास आहे.'

समंथा पुढे म्हणते, 'आम्ही आमच्या चाहत्यांना, शुभचिंतकांना आणि माध्यमांना विनंती करतो की, या कठीण काळात आम्हाला साथ द्यावी आणि यातून पुढे जाण्यासाठी आम्हाला प्रायव्हसी द्यावी. तुम्हा सगळ्यांच्या सोबतीसाठी आभार', असं समंथाने म्हटलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून समंथा आणि नागा चैतन्या विभक्त होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. समंथा अक्किनेनी आणि नागा चैतन्या यांनी ६ ऑक्टोबर २०१७ रोजी लग्न केलं होतं. त्यांनी गोव्यात आधी हिंदू रिवाजाप्रमाणे आणि नंतर ख्रिश्चन प्रथेप्रमाणे विवाह केला होता.

लग्नानंतर समंथाने आपल्या नावासमोर अक्किनेनी नाव लावलं होतं. मात्र, काही दिवसांपूर्वी अचानक समंथाने सोशल हॅण्डलवरील अक्किनेनी आडनाव काढून टाकल्यानंतर घटस्फोटाच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. ६ ऑक्टोबर रोजी दोघांच्या लग्नाला चार वर्ष पूर्ण होणार होती. चार दिवसांआधीच समंथाने घटस्फोट घेत असल्याची घोषणा केली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in