
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याबाबत अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर पोस्ट केल्यापासून तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. याच प्रकरणात तिला अटकही झाली आहे. मात्र, जोवर केतकी ही शरद पवारांची माफी मागणार नाही तोवर आम्ही तिला सोडणार नाही अशी थेट भूमिका ज्येष्ठ अभिनेत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक सेलच्या प्रदेश सरचिटणीस सविता मालपेकर (Savita Malpekar) यांनी घेतली आहे.
'तू तर शूद्र आहेस गं... शरद पवार यांची माफी मागितली नाहीस तर तुला आम्ही सोडणार नाही.' असा इशाराच सविता मालपेकर यांनी केतकी चितळेला दिला आहे. आपल्या फेसबुक पेजवर एक व्हिडिओ पोस्ट करुन सविता मालपेकर यांनी या सगळ्या प्रकरणाबाबत आपली भूमिका व्यक्त केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी केतकी चितळे हिला सज्जड दमच भरला आहे.
सविता मालपेकर (Savita Malpekar) या केतकी चितळेवर प्रचंड चिडल्या?
'ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर माझा ना संताप-संताप झालाय. माझ्या बोलण्यातून तुम्हाला कळत असेल की.. काय लायकी आहे तिची? काय असं कर्तृत्व काय आहे.. तर काय एखाद-दुसऱ्या सिरीयलमध्ये काम केलंय. ज्या सिरियलमध्ये तिला स्वत:चं काम सुद्धा टिकवता आलेलं नाही. त्या मुलीने असं काही तरी बोलावं?'
'हे बघ केतकी.. हे तू जे बोलली आहेस, तू जे लिहलं आहेस.. हे तू केलंच आहेस पण तुझा खरा बोलविता धनी कोणी तरी दुसरा आहे. त्याचा तर शोध आम्ही घेणारच. पण सगळ्यात आधी तुझा समाचार घेणार. अगं कुठल्या माणसाविषयी बोलतेस तू? हिमालयाएवढं कर्तृत्व असलेल्या माणसाविषयी बोलतेस तू.' असं म्हणत सविता मालपेकर यांनी प्रचंड संताप व्यक्त केला.
'अगं तू तर शूद्र आहेस गं.. तुझी लायकीपण नाहीए. त्यांचं नाव घेण्याची पण लायकी नाहीए. त्या माणसाविषयी बोलतेस. हे बघ लक्षात ठेव केतकी.. पवार साहेब आमच्या सगळ्यांना वडीलधाऱ्यांप्रमाणे आहेत. राष्ट्रवादी हे एक कुटुंब आहे आणि आमच्या कुटुंबप्रमुखाबद्दल बोललेलं आम्ही सहन करणार नाही.'
'तुझा समाचार तर आम्ही सगळे जण घेणारच आहोत. पण आता आता जर तू माझा समोर असतीस ना.. तर मी तुझं काय केलं असतं ना.. हे मला सांगता येत नाहीए. ऐकून तर तुला माहितीच असेल की, मी काय करु शकते ते.' असा इशाराच सविता मालपेकरांना केतकी चितळेला यावेळी दिला.
'एक कलाकार म्हणून मी बोलतेय आणि राष्ट्रवादीची सांस्कृतिक सेलची प्रदेश सरचिटणीस म्हणून मी तिला इशारा देतेय की, याच्या पुढे जर तू असं काही बोललीस आणि जे बोलली आहेस ते शब्द जर मागे घेतले नाही, पवार साहेबांची माफी मागितली नाही तर जिथे कुठे असशील तिथून तुला शोधून काढून पवार साहेबांच्या पायापर्यंत आणलं नाही तर नावाची सविता मालेपकर नाही.'
'जसं तुला मी पाठिशी घातलं होतं तुझ्यावर अन्याय झाला होता तेव्हा. तसंच तुला मी शिक्षाही करु शकते. माझी चांगली बाजू जशी तू बघितलेली आहेस तशी वाईट बाजूही तुला कळेल. तेव्हा आमच्या वडिलांबद्दल बोललेलं.. अगं आमचे आयडॉल आहेत ते. त्या माणसाने केवढं केलेलं आहे. महाराष्ट्रच काय जगाचा लाडका माणूस आहे तो.' असंही सविता मालपेकर यावेळी म्हणाल्या.
'शरद पवार हे नाव घेतलं तरी माणसं थरथरतात. अशा माणसाविषयी तू बोलतेस. नाही केतकी तुझा बोलविता धनी दुसराच आहे हे आम्हाला चांगलंच माहिती आहे. तो कोण आहे याचा शोध घेणार नाही तर मुकाट्याने तू सांगायचं आहेस की, तुला हे सगळं कुणी करायला लावलंय ते. तुला या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल वेळीच तर पवार साहेबांची माफी मागायची.'
'तुला ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर तू पवार साहेबांविषयी किंवा इतर कुणाविषयी काय बोललीस तर तुला सोडणार नाही. अगं का असं वागता तुम्ही? या तुमच्या अशा वागण्यामुळे इंडस्ट्रीचं नाव खराब होतं. हे लक्षात येतंय का तुझ्या? का तुझ्या एकटीमुळे सगळ्यांच्या नावाला बट्टा लावतेस?' असा सवाल करत सविता मालपेकरांनी केतकीच्या या कृत्याबाबत निषेध व्यक्त केला.
'आज तुला जे वागायचं होतं ते तू वागलीस किंवा तुला कोणी तरी ते वागायला सांगितलं. तू कशासाठी हे वागलीएस, याच्या पाठीमागचा तुझा हेतू काय तुला त्यातून काय मिळवायचंय हे माहित नाही आम्हाला. पण सुप्रिया ताईंविषयी, पवार साहेबांविषयी किंवा अजितदादांविषयी या कुठल्याही नेत्यांविषयी तू काही पुन्हा बोललीस तर तुझी खैर नाही एवढी गोष्ट मात्र लक्षात ठेव.' असं म्हणत सविता मालपेकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
केतकी चितळे ही तूर्तास तरी पोलिसांच्या कोठडीत आहे. पण आता तिच्या अडचणीत अधिक वाढ होत आहे. कारण की, राज्यभरात अनेक ठिकाणी तिच्याविरोधात तक्रारी दाखल होत आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन केतकीवर नेमकी काय कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.