Alia Bhatt नव्या जाहिरातीमुळे ट्रोल, हिंदूंचा अपमान केल्याची टीका; वाचा संपूर्ण प्रकरण

आलिया भट हिंदू धर्माच्या विरोधात आहे असं का म्हणत आहेत नेटकरी?
Alia Bhatt's new ad stir Controversy, netizens called it is attack on hinduism
Alia Bhatt's new ad stir Controversy, netizens called it is attack on hinduismफोटो-ट्विटर

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट आणि ट्रोलिंग हे नातं तसं जुनं आहे. तिच्या विचित्र उत्तरांवरून तिला आजपर्यंत अनेकदा ट्रोल करण्यात आलं आहे. आलिया भटला सामान्य ज्ञान फार कमी आहे असंही काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. आलिया भट तिच्या अभिनयामुळे, सिनेमांमुळे जशी चर्चेत असते तशीच तिच्यावरच्या ट्रोलिंगमुळेही. अशातच आता एक जाहिरात करणं आलिया भटच्या ट्रोलिंगचं कारण ठरलं आहे. आलिया भटची ही जाहिरात हिंदू विरोधी आहे असं नेटकरी म्हणत आहेत आणि त्यामुळेच आलियाला ट्रोल केलं जातं आहे.

मान्यवरच्या जाहिरातीत आलिया
मान्यवरच्या जाहिरातीत आलिया फोटो-ट्विटर

काय आहे प्रकरण?

आलिया भटने एक जाहिरात केली आहे. मान्यवर या कपड्यांच्या ब्रांडची ही जाहिरात आहे. या जाहिरातीत आलिया एका वधूच्या रूपात दिसते आहे. या जाहिरातीचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत लोकांनी आलिया भटला हिंदू धर्मावरून प्रश्न विचारण्यास सुरूवात केली आहे. काही नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की जाहिरातीतून हिंदू धर्म, प्रथा आणि परंपरा यांनाच का दाखवलं जातं? काहींना मात्र ही जाहिरात आवडली आहे. त्यांनी आलियाचं याबाबत कौतुकही केलं आहे.

आलिया ची जाहिरात अनेकांना आवडलीही आहे
आलिया ची जाहिरात अनेकांना आवडलीही आहे फोटो-ट्विटर

काय आहे जाहिरात?

या जाहिरातीत आलिया नववधूच्या रूपात दिसते. ती म्हणते 'आजी लहानपणापासून सांगायची तू जेव्हा आपल्या घरी जाशील तेव्हा मला तुझी खूप आठवण येईल. हे माझं घर नाही? पप्पांनी माझे खूप लाड केले आहेत. मी शब्द काढायचा अवकाश वस्तू हजर. सगळे म्हणतात मुलगी परक्याचं धन असते तिला बिघडवू नका. त्यांनी ऐकलं नाही. मात्र कधीच हेदेखील म्हणाले नाहीत की परक्याचं धन आहे. आई म्हणते मी चिऊताई आहे. आता (लग्नानंतर) माझं दाणा-पाणी दुसरीकडे आहे. पण चिमणीचं तर अवघं आकाश असतं ना? वेगळं होणं.. परकं केलं जाणं... कुणा दुसऱ्याच्या हाती हात सोपवलं जाणं.. मी दानाची वस्तू आहे का? कन्यादान का? असं आलिया म्हणते आणि त्यानंतर वराचे आई वडील त्याचा हात पकडून आलियाच्या हाती देतात. शेवटी आलिया म्हणते नवी आयडीया कन्यादान नाही कन्या मान'

पाहा जाहिरात

ही जाहिरात पितृसत्ताक पद्धतीवर भाष्य करणारी जाहिरात आहे. ज्या पद्धतीत कायम हे मानलं गेलं आहे की मुलगी म्हणजे परक्याचं धन. एखादी मुलगी जेव्हा सासरी जाते तेव्हा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोनही दुसऱ्या घरातून आलेली मुलगी असाच असतो. ही मानसिकता बदलली पाहिजे म्हणून ही जाहिरात करण्यात आली आहे असं जाहिरात पाहिल्यावर कळतं. ही संपूर्ण जाहिरात चांगल्या पद्धतीने तयार करण्यात आली आहे. त्यातला मेसेजही खरंतर चांगला आहे असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. मात्र या जाहिरातीवरून अनेक नेटकऱी आलिया भटवर तुटून पडले आहेत. हिंदू धर्माच्या प्रथा आणि परंपरा याच तुम्हाला जाहिरातीत दाखवायला मिळतात का? तुम्ही जाहिरातींमधून इतर धर्मांवर भाष्य का करत नाही? असा प्रश्न अनेक नेटकऱ्यांनी विचारला आहे. एवढंच नाही तर ही जाहिरात आणि मान्यवर हा ब्रांड यावर बहिष्कार घालण्याचीही मागणी काही नेटकऱ्यांनी केली आहे.

आलिया भटचा हा व्हिडीओ आतापर्यंत अनेकांनी पाहिला आहे. तिच्या या व्हीडिओला प्रचंड लाईक्स आणि कमेंट केले जात आहे. मात्र काहींना हा व्हिडीओ अजिबात आवडलेले नाही. अनेकजण या जाहिरातीमुळे आलियाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. आलिया भटने हिंदू धर्माचा अपमान केला आहे असंही अनेक नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

काही नेटकऱ्यांच्या मते, अनेकदा सर्व ब्रँड वारंवार हिंदू प्रथा आणि परंपरेलाच का लक्ष्य करतात? असा प्रश्न विचारला आहे. तसेच आलिया आणि या जाहिरातीच्या ब्रँडला बहिष्कार घालावे, असे सांगितले आहे. दरम्यान हलाल किंवा तिहेरी तलाक यासारख्या गैरप्रकाराबद्दल पुरेशी जागरुकता पसरवली जात नाही. मात्र हिंदू परंपरेबद्दल अनेकदा बोलले जाते, असेही अनेक नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in