Big Boss Marathi 3: बिग बॅासचं घर थिरकणार दादूसच्या गाण्यावर

यंदाच्या सीजनमध्ये बिग बॅासच्या घरात दिसणार आहे मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह दादूस.
Big Boss Marathi 3: बिग बॅासचं घर थिरकणार दादूसच्या गाण्यावर

बिग बॅास मराठी हा कलर्स टीव्हीवरचा कार्यक्रम मराठी मनोरंजन विश्वात सर्वाधिक टिआरपी खेचणारा कार्यक्रम म्हणून ओळखला जातो. प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेता निर्माता महेश मांजरेकर यांचं निवेदन खऱ्या अर्थाने बिग बॅास दर्शवणारं असतं म्हणून कार्यक्रमाची रंजकता वेगळीच असते. बिगबॅासच्या या घरात जाण्याचं अनेक दिग्गजांचं स्वप्न असतं. यंदाच्या सीजनमध्ये बिग बॅासच्या घरात दिसणार आहे मराठीचा बप्पी लहिरी अर्थात आगरी कोळी संगीताचा बादशाह दादूस. आगरी कोळी समाजातून बिग बॅासमध्ये झळकणारा दादूस हा पहिलाच कलाकार असेल.

दादूस म्हणजे संतोष चौधरी. मूळ गाव भिवंडीतील कामतघर. शाळेपासूनच गायनाची आवड. शाळेच्या स्नेहसंमेलनामधून गायन, निवेदन, नकला, अभिनय असे सर्व प्रकार दादूस करायचा. दादूसच्या बाबांना देवींच्या गाण्याची आवड होती.देवीच्या जागरणातून ते गाणी सादर करत. त्याला आगरी भाषेत बायाची गाणी म्हणतात. गाण्याचा वारसा दादूसला बाबांकडूनच लाभला. कोणतेही शास्त्रीय संगीताचे धडे न घेता आगरी कोळी लोकसंगीताला वेगळा आकार देण्याचा प्रयत्न केला.

“आई तुझा लालुल्या” गाण्याने दादूस ही खरी ओळख मिळाली. लहानपणी दोन्ही पायांमध्ये अपंगत्व होतं मात्र आईने दादूसची सेवा केली आणि दादूसला दोन्ही पायांवर उभं केलं. बायांची गाणी, धौलगीते, कोळीगीते आदी लोकसंगीताचा बादशाह म्हणून दादूसची आज स्वतंत्र ओळख आहे. त्याचप्रमाणे दादूसचा पेहराव, डोळ्यावर काळा गॅागल, गळ्यात जाड्या सोन्याच्या चेन, पाचही बोटात अंगठ्या हा प्रसिद्ध संगीतकार बप्पी लहिरी यांच्यासारखा असल्याने मराठीतील बप्पी लहिरी म्हणूनच दादूसला ओळखलं जातं. बप्पीदा हे दादूसचे संगीतातील आदर्श आहेत.

कोळी गीताचे संगीतकार स्व. आनंद पांचाळ यांना दादूस गुरुस्थानी मानतात. माईक हातात कसा धरावा इथपासून गायनाचे अनेक बारकावे त्यांनी दादूसला शिकवले.कोळीगीते- लोकगीते हा दादूसचा पहिला म्युझिक अल्बम. कृणाल म्युझिक कंपनीने तो प्रसिद्ध केला होता. ‘दादूस आला हळदीला’ हा दादूसचा म्युझिक अल्बम प्रचंड गाजला. त्यामुळे दादूस हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. २००७ मध्ये दादूस ‘बंध प्रेमाचे’ या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर झळकला. यामध्ये संगीतदिग्दर्शकाची भूमिका दादूसने साकारली होती. डिस्ने चंनेल आणि एमटीव्हीच्या काही कार्यक्रमामध्ये देखील दादूस दिसला होता.

प्रसिद्ध ‘सारेगमप’ मध्ये दादूसला निमंत्रित केले होते. दादूस लाईव्ह शो देखील करतो. त्याच्या लाईव्ह शो ला प्रचंड गर्दी होते. मराठी- हिंदीतील अनेक कलाकार दादूसच्या गाण्याचे आणि पेहरावाचे चाहते आहेत. बिगबॅासचं यंदाचं घर दादूसच्या प्रवेशाने आगरी कोळीगीतावर थिरकणार एवढं मात्र निश्चित.

Related Stories

No stories found.