
चित्रपट रसिकांची प्रतिक्षा अखेर संपली. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांची प्रमुख भूमिका असलेला बहुप्रतिक्षित 'ब्रह्मास्त्र'चा ट्रेलर आज रिलीज करण्यात आला. अयान मुखर्जी दिग्दर्शित ट्रायलॉजी सीरिजमधील 'ब्रह्मास्त्र-शिवा' हा पहिला भाग आहे. या चित्रपट यावर्षीच ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.
ब्रह्यास्त्र भाग एक-शिवा मध्ये रणबीर आलिया भटची रोमँटिक केमिस्ट्री दिसणार असून, भरपूर अॅक्शन बघायला मिळणार असंच ट्रेलरवरून दिसतंय. ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच भरपूर प्रतिसाद मिळाला आहे.
ब्रह्मास्त्रचा ट्रेलर जबरदस्त असल्याचं लोक म्हणत आहेत. ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूरला अग्निअस्त्रच्या रुपात दाखवण्यात आलं असून, सर्व अस्त्रांमध्ये सर्वश्रेष्ठ असलेल्या ब्रह्मास्त्राभोवती ही गोष्ट फिरताना दिसते.
ट्रेलरच्या सुरूवात बिग बी अमिताभ बच्चन यांच्या आवाजाने होते. सुरूवातीलाच पंचमहाभूतांविषयी अमिताभ बच्चन सांगतात. त्यानंतर शिवा म्हणजे रणबीर कपूर आणि ईशा म्हणजे आलिया भट्टची पार्श्वभूमी ट्रेलरमध्ये दाखवण्यात आली आहे.
चित्रपटात अमिताभ बच्चन गुरूच्या भूमिकेत आहे. अभिनेत्री मौनी रॉय व्हिलनच्या भूमिकेत आहे. दाक्षिणात्य अभिनेता नागार्जूनचीही चित्रपटात भूमिका आहे. महत्त्वाचं म्हणजे रणबीर कपूरला शिवाच्या भूमिकेत बघण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक होते.
ब्रह्मास्त्र पाच भाषांमध्ये होणार रिलीज
रणबीर कपूर-आलिया भटची मुख्य भूमिका असलेला ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणार आहे. तीन भागांमध्ये तयार करण्यात आलेला हा सिनेमा ५ प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हिंदी, तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या भाषामध्ये बघता येणार आहे.
ब्रह्मास्त्रमध्ये रणबीर कपूर शिवाच्या भूमिकेत आहे, तर आलिया भट ईशाच्या भूमिकेत दिसणार आहे. अमिताभ बच्चन यांनी प्रोफेसर अरविंद चतुर्वेदी ही भूमिका साकारली आहे. नागार्जून अजय नावाच्या पुरातत्वशास्त्रज्ञाच्या (archaeologist) भूमिकेत आहे. या सिनेमात अभिनेत्री मौनी रॉयने दामयंतीची भूमिका केली आहे.
अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिग्दर्शक अयान मुखर्जीचा हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना मागे एकदा अयान मुखर्जी म्हणाला होता की, जेव्हा लोक मला विचारतात की मी ब्रह्मास्त्र बनवण्यासाठी ९ वर्ष कसे दिले? त्यावेळी मी त्यांना अमिताभ बच्चन यांचं उदाहरण देतो. त्यांनी संपूर्ण आयुष्य अभिनय आणि चित्रपट निर्मितीसाठी वाहून घेतलं.'