Chandramukhi trailer: 'आभाळतला चंद्र बघायला दिवा कशाला हवा?' चंद्रमुखीचा ट्रेलर पाहिलात?
विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर आधारित असलेला सिनेमा चंद्रमुखी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचा दमदार ट्रेलर आज रिलिज झाला आहे. अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मोहन आगाशे मृण्मयी देशपांडे अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा २९ एप्रिलला रिलिज होतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोशल मीडियावर या सिनेमाच्या ट्रेलरचीच चर्चा आहे.

या सिनेमाची कथा विश्वास पाटील यांच्या कादंबरीवर बेतलेली आहे. तर प्रसाद ओकने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. "माणूस पावसाचं पाणी साठवायला शिकतो, पण पाऊस जर शब्दसूरांचा असेल तर तो कसा आणि कुठे साठवायचा?" "लाईफमध्ये मनोरंजन पाहिजेलच!" "आभाळातला चंद्र बघायला दिवा कशाला हवा?" "खादीमागे कवी धरला जनू..." "सौभाग्यवती दमयंती दौलतराव देशमाने" "नवऱ्याने श्यान खाल्लेलं बाईला कळलं तर ती चिडती, पण तिच्या आधी जगाला कळलं तर ती चवताळती" "चोरी करणं नाही पकडलं जाणं पाप असतं" असे दमदार डायलॉग्ज या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळतात. त्यामुळे सिनेमा संगीतासोबत डायलॉग्जसाठीही खास असणार यात काहीही शंका नाही.

अजय-अतुल या जोडीने या सिनेमाला संगीत दिलं आहे. तर गुरू ठाकूरने गीतलेखन केलं आहे. या सिनेमातलं चंद्रा गाणं हे तर युट्यूबवर सुपरहिट ठरलंय. या सिनेमाचा टीझरही लोकांना खूप भावला होता. आता सिनेमाच्या ट्रेलरवरही रसिकांच्या उड्या पडत आहेत. तमाशापट आणि मराठी सिनेमाचं नातं खूप जुनं आहे. खूप दिवसांनी हा विषय असलेला सिनेमा येतो आहे. मध्यवर्ती भूमिकेत अमृता खानविलकर आहे. त्यामुळे सिनेमा कसा असेल याची उत्सुकता आता आणखी ताणली गेली आहे.

राजकारणात ध्येयधुरंदर राजकारणी समाजात काही सकारात्मक बदल करू पाहतो आहे. मोहमयी सौंदर्य, घायाळ करणाऱ्या अदा यामुळे रसिकांना भुरळ घातलेल्या सौंदर्यवतीच्या प्रेमात पडतो. त्यानंतर त्याच्या आयुष्यात होणारे बदल, राजकीय वादळं, कुटुंबात होणारे बदल हे सगळं सगळं ट्रेलरमध्ये दिसतं आहे. चंद्रमुखी, दौलतराव आणि दमयंती यांच्या प्रेमाचा त्रिकोण सिनेमात आहे. त्यांची गोष्ट आता कोणत्या वळणावर जाणार याचं उत्तर २९ एप्रिलला सिनेमातून मिळणार आहे.
मराठी सिनेसृष्टीत कच्चा लिंबू, हिरकणी हे दोन सिनेमा दिल्यानंतर प्रसाद ओक आता चंद्रमुखी सिनेमा आणतो आहे. अक्षय बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म निर्मित, क्रिएटिव्ह वाईब प्रॉडक्शन प्रस्तुत फ्लाईंग ड्रॅगन एंटरटेन्मेंट, येलस्टार फिल्म्स, लाईटविदिन एंटरटेन्मेंट सहप्रस्तुत चंद्रमुखी सिनेमाची पटकथा आणि संवाद अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकरने लिहिले आहेत.
चंद्रमुखी सिनेमात अमृता खानविलकर, आदिनाथ कोठारे, मृण्मयी देशपाडे, मोहन आगाशे, समीर चौघुले, राधा सागर, नेहा दंडाळे, सुरभी भावे, राजेंद्र शिसतकर यांच्या भूमिका आहेत. सिनेमाचं छायाचित्रण संजय मेमाणे यांनी केलं आहे.