
बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांनी भारलेले, ठाणे जिल्ह्यात शिवसेना पक्ष अभेद्य ठेवणारे आनंद दिघे यांच्यावर आलेल्या धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाची उत्सुकता सगळ्यांनाच होती. दिघेंच्या भूमिकेतील प्रसाद ओकचा लूक पाहून एकनाथ शिंदेही स्तिमित झाले होते. गेले काही दिवस या ना त्या मार्गाने फक्त आनंद दिघे आणि त्यांच्या आसपासच्या गोष्टींचीच चर्चा होती. अखेर हा सिनेमा रिलीज झालाय. आणि हा सिनेमा केवळ आणि केवळ प्रसाद ओकच्या अप्रतिम अभिनयासाठी एकदा तरी पाहायलाच हवा इतकं तरी नक्की आहे..
जंगलात राहून वाघाशी आणि महाराष्ट्रात राहून माझ्याशी वैर करायचं नाही... या संवादातूनच आनंद दिघे हे व्यक्तिमत्व कसं होतं याचा प्रत्यय येतो.. मुळात आनंद दिघे म्हटलं की दडपशाही, भिती, सिंघानिया हॉस्पिटल जाळपोळ प्रकरण हेच लोकांना माहिती आहे. सिनेमात या पलिकडे जाऊन आनंद दिघे एक माणूस म्हणून कसे जगले, त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रसगांवर या सिनेमाचा डोलारा उभा राहिला आहे.ज्यात दिघेंनी ठाणे जिल्ह्यात वाढवलेली शिवसेना असेल, कार्यकर्त्यांचं उभारलेलं अफाट जाळं असेल, श्रीधर खोपकर खून प्रकरण ते त्यांचा झालेला अकाली मृत्यू ..अतिशय धारदार कथानक असलेली आनंद दिघेंची कहाणी...
यातील काही प्रकरणाचं गाठोंडं एकत्र करत लेखक,दिग्दर्शक प्रवीण तरडे एक कहाणी रचतो आणि आनंद दिघे प्रसाद ओकच्या रूपात आपल्याला पडद्यावर दिसत राहतात.. प्रवीण तरडेने रेखाटलेलं कथानक त्यातले संवाद अतिशय चपखल आहेत. जो परिणाम साधायचा आहे तो प्रविण तरडेने अतिशय उत्तम साधला आहे.. या सिनेमाची खटकलेली एकच गोष्ट म्हणजे हा सिनेमा आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित असलेला सिनेमा आहे. निर्मात्यांनी,दिग्दर्शकांनी कथानक तर उत्तम उभं केलंय. मात्र आनंद दिघेंच्या सावलीत वावरलेल्या आणि आता राज्याचे मंत्री असलेल्या एकनाथ शिंदेचं कँरेक्टर गरजेपेक्षा जास्त दाखवण्यात आलं आहे.. हा सिनेमा आनंद दिघेंवर आहे तेव्हा इतरांचं वाढलेलं कँरेक्टर हे जरा खटकणारं वाटलं
प्रवीण तरडेचं कथानक,दिग्दर्शन,मंगेश देसाईची निर्मिती , वेषभूषाकार विद्याधर भट्टेनी लीलया प्रसादच्या चेहऱ्यावर साकारलेले हुबेहुब आनंद दिघे याबरोबरच या सिनेमा अक्षरक्ष जगलाय तो प्रसाद ओक.. प्रसाद ओक किती तगडा अभिनेता आहे याचा प्रत्यय प्रेक्षकांनाच नाही तर इतकी वर्ष त्याला मुख्य भूमिकेत संधी न दिलेल्या अनेक फिल्ममेकर्सनाही येणार आहे. प्रसादने आनंद दिघे साकारण्यासाठी घेतलेली मेहनत पदोपदी जाणवते, दिघेंचे हावभाव, त्यांचं हात वळवणं,चालण्याची स्टाईल, आवाजात जरब, डोळ्यांमधला भाव, चिडल्यावर बोलताना होणारा त्रास,उत्तम संवादफेक प्रसाद ओकने कडकडीत साकारली आहे.
प्रसादला साथ देणाऱ्या क्षितीज दाते, स्नेहल तरडे,विजय निकम,अभिजीत खांडकेकर,रमेश परदेशी,देवेंद्र गायकवाड, ऋतूराज फडके,विघ्नेश जोशी या सर्व कलाकारांनी आपली कामं चोख केली आहेत.. प्रवीण तरडेने सिनेमा तर उत्तमच बनवला आहे यात शंकाच नाही, सिनेमाच्या लूकपासून कलाकारांच्या अभिनयामुळे हा सिनेमा उत्तम जमलाय, मात्र एका कँरेक्टरला दिलेला जास्त वाव थोडा खटकणारा आहे. आणि त्यामुळेच मी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाला देतोय ३ स्टार
सिनेमा संपताना दिघेंचा मृत्यू कसा झाला.. यावर पुसटसं भाष्य केलं आहे. मात्र त्याचं उत्तर दाखवण्यासाठी धर्मवीरचा पुढचा भाग येतोय.... मात्र तुम्ही एकदा तरी प्रसाद ओकच्या अप्रतिम अभिनयासाठी, प्रवीण तरडेच्या कथानकासाठी आणि मंगेश देसाईच्या निर्मितीसाठी हा सिनेमा पाहायलाच हवा