
जॉनी डेप आणि त्याची पत्नी एंबर हर्ड यांच्यात झालेला मानहानीचा खटला जगभरात गाजला. जॉनी डेपच्या बाजूनी ज्युरीजनी निकाल दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात दोघांकडूनही एकमेकांवर चिखलफेक झाली. यानंतर आता अंबर हर्डची प्रतिक्रिया समोर आली आहे.
काय म्हणाली आहे एंबर हर्ड?
आमच्यात झालेला वाद, त्यानंतर कोर्टात गेलेलं प्रकरण आणि या सगळ्यात जॉनीचा झालेला विजय ज्युरींनी त्याच्या बाजूने निकाल देणं याबाबत मी जॉनी डेपला दोष देणार नाही. जॉनी हा एक लोकप्रिय अभिनेता आहे. लोकांना वाटतं की आम्ही त्याला ओळखतो. तो एक उत्तम अभिनेता आहे.
आमच्या प्रकरणाची ट्रायल सहा आठवडे चालली. या सगळ्यात टीकटॉक, ट्विटर, फेसबुक आणि इतर सोशल मीडियावर आमच्या प्रकरणात बरीच बदनामी केली गेली. या केसच्या बाजूने करण्यात आलेलं कव्हरेज सापत्न भाव दर्शवणारं होतं असंही एंबरने म्हटलं आहे.
माझ्याबद्दल लोक काय विचार करतात? त्यांचं माझ्याबद्दल या सगळ्या प्रकरणानंतर काय मत झालं आहे? माझ्या लग्नात, बंद दारांमागे काय घडलं हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आता निर्णय लोकांना घ्यायचा आहे. लोकांना काय वाटतं याची पर्वा मला नाही असंही एंबरने म्हटलं आहे. जे लोक वरवरचा विचार करतात असे लोक माझ्याबाबत काय विचार करतात याने मला काहीही फरक पडत नाही असंही एंबरने म्हटलं आहे.
जॉनी डेप आणि एंबर हर्डचं प्रकरण काय?
५८ वर्षीय अभिनेता जॉनी डेपने त्याची पूर्वीची पत्नी आणि अभिनेत्री ३६ वर्षीय एंबर हर्ड विरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता. वर्तमान पत्रातील एका लेखावरून हा दावा दाखल करण्यात आला होता.
एंबर हर्डने २०१८ मध्ये वॉशिग्टन पोस्ट या वर्तमानपत्रात एक दीर्घ लेख लिहिला होता. मी कौटुंबिक हिंसाचाराची बळी ठरले आहे, अशा आशयाच्या या लेखात एंबर हर्डनं कुणाचंही नाव घेतलेलं नव्हतं.
जॉनी डेपने मानहानीचा दावा दाखल केल्यानंतर एंबर हर्डने त्याच्या विरोधात १०० मिलियन डॉलरचा दावा केला होता. या प्रकरणाचा निकाल न्यायालयाने बुधवारी दिला. एंबर हर्डच्या लेखामुळे जॉनी डेपची बदनामी झाली असल्याचं न्यायालयाने स्पष्ट केलं.
एंबरने लिहिलेला लेख असत्य आणि मानहानी करणारा आहे, असं न्यायालयाने म्हटलंय. अभिनेत्री एंबर हर्डने तिच्या लग्नाबद्दल जी विधानं केली, ती खोटी होती, असंही न्यायालयाने म्हटलंय.
जॉनी-एंबरची प्रेमकहाणी २००९ ला झाली सुरू
जॉनी-एंबर यांची प्रेम कहाणी २००९ ला सुरू झाली होती. द रम डायरी या सिनेमाच्या सेटवर जॉनी-एंबर भेटले होते. सहा वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०१४ मध्ये या दोघांनी लग्न केलं. त्यानंतर २०१६ मध्ये एंबरने पहिल्यांदा हा आरोप केला की जॉनी तिला दारू पिऊन मारहाण करतो. जॉनीने हे आरोप फेटाळले. २०१७ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला.
२०१८ मध्ये एंबरने एक पोस्ट लिहिली होती. त्यात तिने ती घरगुती हिंसाचार, लैंगिक शोषण याची बळी ठरल्याचं म्हटलं होतं. तसंच त्यातून कशी बचावले हे देखील सांगितलं होतं. या पोस्टमध्ये तिने जॉनीचं नाव घेतलं व्हतं. पण तिचा रोख त्याच्याकडेच होता. या पोस्टनंतर एंबरला बरीच सहानुभूती मिळाली होती. पण या पोस्टनंतर जॉनी डेपची इमेज खराब झाली त्याला सिनेमांमधूनही काढून टाकण्यात येऊ लागलं. मग जॉनीने एंबरविरोधात ५० मिलियन डॉलरचा दावा केला. यानंतर एंबरने जॉनीच्या विरोधात १०० मिलियन डॉलरचा दावा ठोकला. हे संपूर्ण प्रकरण ६ आठवडे सुरू होतं. अख्खं जग हा खटला लाईव्ह बघत होतं कारण ही सुनावणी लाईव्ह ब्रॉडकास्ट होत होती.
रोज नवनवे खुलासे समोर येत असलेल्या या प्रकरणात खरा ट्विस्ट तेव्हा आला जेव्हा जॉनी एंबरची एक ऑडिओ क्लिप बाहेर आली. या क्लिपमधून हे सत्य समोर आलं की घरगुती हिंसाचाराची बळी एंबर नाही तर जॉनीच आहे. एंबरने जॉनीला मारहाण केल्याचंही वास्तव यातून समोर आलं. या सगळ्या प्रकारच्या खुलासे-पुराव्यांनंतर जॉनी ही केस जिंकला. या हाय व्होल्टेज ड्राम्यानंतर पहिल्यांदाच एंबरची प्रतिक्रिया समोर आली आहे.