
मुळशी पॅटर्न हा सिनेमा चांगलाच गाजला, मराठीतला एक माईलस्टोन म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जातं. मुळशी पॅटर्न हा सिनेमा दिग्दर्शित केला होता आणि लिहिला होता तो प्रवीण तरडे यांनी. प्रवीण तरडे यांच्या या सिनेमाची भुरळ बॉलिवूडलाही पडली. त्यामुळेच या सिनेमाचा अंतिम नावाचा रिमेकही तयार करण्यात आला. मात्र मी जर हा सिनेमा दिग्दर्शित केला असता तर सलमान खानला त्यात घेतलं नसतं असं प्रवीण तरडे यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलं आहे प्रवीण तरडेंनी?
"मुळशी पॅटर्न हा सिनेमा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आधारित सिनेमा आहे. मुळशी पॅटर्नच्या माध्यमातून मला शेतकऱ्यांचे प्रश्न राष्ट्रीय स्तरावर मांडण्याची संधी आली होती. मात्र काही काही कारणांमुळे ती पूर्ण झाली नाही. हा चित्रपट जर मी केला असता तर सिनेमाचं नाव आणि कथानक कधीच बदललं नसतं. हिंदीतही मी चित्रपटाचं नाव मुळशी पॅटर्नच ठेवलं असतं. मी स्वतः मुळशी गावातला आहे. एकेकाळी शेतीवर जगणारं सधन गावमी अनुभवलं. तिथली परिस्थिती मी पाहिली आहे. मी त्या विषयावर काम केलं आहे, त्यामुळेच या सिनेमाचा हिंदी रिमेक मी दिग्दर्शित केला असता तर सलमान खानला कधीच घेतलं नसतं. कारण माझ्या दृष्टीने सलमान कधीच सूट झाला नसता."
एबीपी माझाच्या माझा कट्टा या कार्यक्रमात प्रवीण तरडे यांनी हे मत व्यक्त केलं आहे. प्रवीण तरडे म्हणाले की माझ्या सिनेमातील कलाकरांची निवड ही माझी सर्वात मोठी ताकद आहे. मुळशी पॅटर्न हा असा सिनेमा आहे ज्यामुळे मुळशी गावाची झालेली वाताहत लोकांसमोर आणावी असं मला वाटलं. मी स्वतः मुळशी गावातला आहे.
एकेकाळी शेतीवर जगणारं सधन गाव मी पाहिलं आहे. मी जगलो आणि त्यानंतर त्याच गावात जमिनी विकून पेटीभर पैसे घेऊन सधन म्हणून मिरवलेले शेतकरी, तसंच पैसे संपल्यावर झालेली त्यांची अवस्था हे सगळं माहिलं आहे. आपल्याच जागांवर उभारलेल्या आयटी पार्कवर हे लोक सुरक्षा रक्षक म्हणून कसं काम करत होते ते मी पाहिलं आहे त्या सगळ्या अनुभवांवर मी हा सिनेमा केला असंही प्रवीण तरडे यांनी म्हटलं आहे.
अंतिम हा सिनेमा मुळशी पॅटर्न सिनेमाचा रिमेक होता. अंतिम सिनेमाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केलं होतं. या सिनेमात सलमान खान, आयुष शर्मा, महिमा मकवाना, जिशू सेनगुप्ता यांच्या प्रमुख भूमिका होत्या. प्रवीण तरडे यांचा मुळशी पॅटर्न हा सिनेमा उत्कृष्ट होता तेवढी जादू या सिनेमाचा रिमेक चालवू शकला नाही. सलमान खान या सिनेमात आल्याने या सिनेमाला ग्लॅमर मिळालं होतं. मात्र अंतिम हा सिनेमा तिकीटबारीवर सुपरडुपर हिट म्हणावा असा चालला नाही. अशात आता आज प्रवीण तरडे यांना याबाबत प्रश्न विचारला असता मी जर या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असतं तर सलमान खानला त्यात घेतलं नसतं असं म्हटलं आहे.