बाहेरून येऊन बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल, तर हवे लोकांचे प्रेम सिद्धांत चतुर्वेदीने सांगितली संघर्षाची कहाणी

’इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या आतले वि. बाहेरचे या वादाविषयी सिद्धांतने आपले मत व्यक्त केले आहे
बाहेरून येऊन बॉलिवूडमध्ये टिकायचं असेल, तर हवे लोकांचे प्रेम सिद्धांत चतुर्वेदीने सांगितली संघर्षाची कहाणी

सिद्धांत चतुर्वेदीने झोया अख्तर यांच्या गली बॉय सिनेमात साकारलेल्या रॅपर एमसी शेरच्या भूमिकेतून आपल्या अभिनय कौशल्याचे सामर्थ्य दर्शवले. या भूमिकेने त्याला थेट यश राज फिल्म्सच्या बंटी और बबली 2 मध्ये प्रमुख भूमिका मिळवून दिली. या सिनेमात तो नव्या बंटीची भूमिका करत आहे! या निमित्ताने सिद्धांत नेपोटिझम आणि त्याच्यासारख्या बाहेरच्यांना बॉलिवूडमध्ये स्थिरावण्यासाठी कराव्या लागणाऱ्या तीव्र संघर्षाविषयी व्यक्त झाला.सिद्धांत म्हणाला, ‘बाहेरच्यांना बॉलिवूडमध्ये आपली दखल घेतली जाण्यासाठीसुद्धा बराच काळ वाट पाहावी लागते. जबरदस्त गुणवत्ता असूनही दखल घेतली जाण्यापूर्वी कित्येकांना करावा लागणारा संघर्ष मी जवळून पाहिला आहे. मोठी संधी मिळण्यापूर्वी मला स्वतःलाही काही वर्ष संघर्ष करावा लागला, पण तो काळ माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा आहे.’

अभिनेता बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला सक्षम केल्याचे श्रेय हा हँडसम कलाकार आपल्या मार्गदर्शकांना देतो. तो म्हणाला, ‘करियरच्या सुरुवातीलाच दिलेल्या संधीबद्दल मी झोया अख्तर, फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांचा कायमचा ऋणी आहे. त्यांच्या वरदहस्ताशिवाय मी आज इथवर पोहोचलो नसतो. मला जाणीव आहे, की दखल घेतल्या गेलेल्या काही सुदैवी स्ट्रगर्लर्सपैकी मी एक आहे. ज्यांची दखल घेतली गेली नाही असे कित्येक जण मला माहीत आहे. हे एक दुर्देवी सत्य आहे.’इंडस्ट्रीमध्ये सुरू असलेल्या आतले वि. बाहेरचे या वादाविषयी सिद्धांतने आपले मत व्यक्त केले. तो म्हणाला, ‘इनसाइडर्स म्हणजे इथल्यांकडे पटकन लक्ष दिले जाते. त्यांना पहिली संधी मिळायला वेळ लागत नाही, शिवाय बाहेरच्यांपेक्षा त्यांना बऱ्याच संधी मिळतात. हे याच नव्हे, तर जगातल्या प्रत्येक क्षेत्रातले सत्य आहे. हा जणू काही कायदाच आहे. वंशवाद – नेपोटिझम अस्तित्वात आहे आणि बाहेरच्यांना आपली दखल घेतली जावी म्हणून प्रचंड मेहनत घ्यावी लागते, पण या मेहनतीतही खरी मजा दडलेली आहे.’ माणूस म्हणून आपल्याला घडवण्यात या मेहनतीचा मोठा वाटा आहे असेही सिद्धांत म्हणाला.

‘त्यामुळे (बाहेरून आल्यामुळे) तुम्हाला आणि तुमच्या विचारांना आकार मिळतो शिवाय आयुष्यात खरंच तुम्हाला काय हवे याविषयी आपले मन आणखी एकाग्र होत जाते. बाहेरून आलेल्या कोणत्याही व्यक्तीला बॉलिवूडमध्ये टिकून राहाण्याचा एकच मार्ग असतो आणि तो म्हणजे, तुमच्या कलेच्या अभिव्यक्तीतून लोकांचे प्रेम मिळवणे. मी केवळ तेच करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मला आशा आहे, की मी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होईन आणि ते कायम मला मोठ्या पडद्यावर पाहायला येतील आणि उडण्यासाठी पंख देतील.’यश राज फिल्म्सचा बंटी और बबली 2 हा धमाकेदार विनोदी सिनेमा 19 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार असून त्यात बंटी आणि बबली नावाच्या चोरांच्या दोन वेगवेगळ्या पिढ्यांच्या जोड्या एकमेकांविरोधात लढताना दिसतील. सैफ अली खान आणि राणी मुखर्जी मूळ बंटी- बबलीच्या, तर गली बॉय हंक सिद्धांत चतुर्वेदी आणि नवोदित अभिनेत्री शर्वरी नव्या बंटी-बबलीच्या भूमिकेत दिसतील. सिनेमाचे दिग्दर्शन वरूण व्ही शर्मा यांनी केले असून यापूर्वी त्यांनी वायआरएफच्या सुल्तान आणि टायगर जिंदा है या सिनेमांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in