...तर कंगना रणौत विरोधात अटक वॉरंट काढू; न्यायालयाने दिला गंभीर इशारा

Javed Akhtar Defamation Case: पुढील सुनावणी २० सप्टेंबरला
...तर कंगना रणौत विरोधात अटक वॉरंट काढू; 
न्यायालयाने दिला गंभीर इशारा
अभिनेत्री कंगना रणौत. (संग्रहित छायाचित्र)

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या प्रकरणाची आज सुनावणी झाली. मात्र, या सुनावणीलाही कंगना रणौत गैरहजर राहिल्याने न्यायालयाने कंगनाला हजर राहण्यासाठी अल्टिमेटम दिला आहे. पुढील सुनावणीला हजर न राहिल्यास अटक वॉरंट जारी करुन असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

अभिनेत्री कंगना रणौत विरुद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी अब्रुनुकसानीचा दावा ठोकला आहे. या प्रकरणाची सुनावणी सध्या अंधेरीतील मॅजिस्ट्रेट न्यायालयात सुरू आहे. यावेळच्या सुनावणीलाही गैरहजर होती. त्यामुळे न्यायालय संतापले.

कंगनाचे वकील रिजवान सिद्दीकी यांनी कंगनाची प्रकृती बरी नसल्याचं न्यायालयाला सांगितलं. कंगनाच्या वकिलांनी तिची मेडिकल रिपोर्ट न्यायालयात सादर केला. त्याचबरोबर कंगनाला कोरोनाची लक्षणं दिसून आली आहे, अशी माहिती कंगनाच्या वकिलांनी न्यायालयाला दिली.

गेल्या १५ दिवसांपासून कंगना रणौत चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रवासात होती. त्याचबरोबर या काळात तिने असंख्य लोकांच्या भेटी घेतल्याच कंगनाच्या वकिलांनी सांगितलं. कंगनाला सात दिवसांचा वेळ देण्यात यावा. जेणेकरुन तिला कोविड चाचणी करता येईल, अशी विनंती कंगनाच्या वकिलांनी न्यायालयाला केली. तसंच कंगना व्हिडीओ कॉलद्वारे सुनावणीला हजर राहू शकते, असंही सांगितलं.

जावेद अख्तर प्रत्येक सुनावणीला प्रामाणिकपणे न्यायालयात हजर असतात. खटल्याच्या सुनावणीला विलंब व्हावा, म्हणून हे केलं जात असल्याचा आरोप जावेद अख्तर यांच्या वकिलांनी न्यायालयात केला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने प्रकरणाची पुढील सुनावणी २० सप्टेंबर रोजी होणार असल्याचे आदेश दिले. त्याचबरोबर जर कंगना रणौत न्यायालयात हजर राहिली नाही, तर न्यायालय कंगनाच्या विरोधात अटक वॉरंट जारी करेल, असा इशारा न्यायालयाने दिला आहे.

जावेद अख्तर यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केल्यानंतर कंगना रणौतने याविरुद्ध उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अब्रुनुकसानीचा दावा रद्द करण्याच्या मागणीसाठी कंगनाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मागील आठवड्यात न्यायालयाने कंगनाची याचिका फेटाळून लावली.

जावेद अख्तर यांची तक्रार काय?

बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर रिपब्लिक टीव्ही या वृत्तवाहिनीवर अर्णब गोस्वामी यांनी घेतलेल्या मुलाखतीत कंगना रणौतने माझ्याविरोधात बिनबुडाचे आरोप केले. तसेच माझी विनाकारण बदनामी करणारी विधानं केली, असं जावेद अख्तर यांचं म्हणणं आहे. याच संदर्भात त्यांनी कंगनाविरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला भरला असून, त्याची सुनावणी सध्या सुरु आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in