'आम्ही सोबतच मुंबईला जाणार होतो, पण मी त्याला गमावलं'; केकेच्या निधनानं जीत गांगुलीला धक्का
आपल्या श्रवणीय स्वरांनी रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या प्रसिद्ध गायक केकेचं निधन झालं. वयाच्या ५३व्या वर्षी केकेच्या अचानक मृत्यू अनेकांना जिवाला चटका लावून गेलाय. केकेच्या निधनानं प्रसिद्ध गायक आणि संगीतकार जीत गांगुलीलाही धक्का बसलाय. दोन दिवसांपूर्वीच त्याचं केकेशी बोलणं झालं होतं.
'आजतक'शी बोलताना गायक जीत गांगुली भावूक झाला. केकेच्या निधनामुळे आपण दुःखी असून, मला धक्का बसलाय, असं तो म्हणाला. "दोन दिवसांपूर्वीच माझं केकेसोबत बोलणं झालं होतं. माझा यावर विश्वासच बसत नाहीये. मी कोलकातामध्येच होतो. दोन दिवसांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं," असं जीतने सांगितलं.
"त्याने मला सांगितलं की, तो परफॉर्म करणार आहे. फोनवर बोलताना तो म्हणाला होता की, कोलकातामध्ये येतोय. एका कॉलेजमध्ये कार्यक्रम आहे. त्याने मला या कार्यक्रमासाठी निमंत्रितही केलं होतं. मी थोडा व्यस्त असल्याने कॉन्सर्टमध्ये जाऊ शकलो नाही. त्याचा कॉन्सर्ट पाहू शकलो नाही," असं तो केकेसोबत झालेल्या शेवटच्या संभाषणाबद्दल म्हणाला.
पुढे बोलताना जीत गांगुली म्हणाला, "आम्ही सोबत परत मुंबईला परत जाणार होतो. पण जेव्हा त्याची बातमी ऐकली, तेव्हा माझा यावर विश्वासच बसला नाही. आता मी रुग्णालयात थांबलोय केकेसाठी. विश्वासच बसत नाहीये. या घटनेनंतर मी आयुष्याला कधी गांभीर्याने घेऊ शकणार नाही."
"हे काय वय आहे का? तो फक्त ५३ वर्षांचा होता. मी त्याला गमावलं आहे. त्याचं कुटुंब उद्या सकाळी येणार आहे. त्याची पत्नी साडेदहा पर्यंत पोहोचेल," असं जीत म्हणाला.
केकेच्या निधनाबद्दल प्रश्नचिन्ह
प्राथमिक माहितीनुसार केकेचं निधन ह्रदयविकाराने झाल्याचं म्हटलं गेलं. मात्र त्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच त्यांच्या मृत्यूचं कारण समजू शकणार आहे. केकेच्या मृत्यूबद्दल शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत. केकेच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर खुणा आढळून आल्या आहेत. त्यामुळे केकेचा मृत्यू नैसर्गिक आहे की, त्यांच्यासोबत बरंवाईट झालंय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.