ARYAN KHAN ला पकडणाऱ्या समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्रोलर्सना या शब्दांत सुनावले

एनसीबी जाणूनबुजून बॉलीवूडला लक्ष्य करत असल्याचा आरोपावर क्रांती रेडकरने सुनावले खडे बोल
ARYAN KHAN ला पकडणाऱ्या समीर वानखेडेंची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्रोलर्सना या शब्दांत सुनावले

बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला अमली पदार्थांचं सेवन केल्याबद्दल एनसीबीने अटक केली. ही कारवाई मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एका आलिशान क्रूजवर करण्यात आली. सध्या आर्यन एनसीबीच्या ताब्यात आहे. परंतु, या प्रकरणात बॉलिवूडचं नाव आल्याने हे प्रकरण प्रसार माध्यमांसोबत सोशल मीडियावर देखील चांगलंच चर्चिलं जातंय. महत्वाचं म्हणजे एनसीबीने मुद्दाम आर्यनला अटक केली आहे, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. सोबतच एनसीबी जाणूनबुजून बॉलीवूडला लक्ष्य करत असल्याचा आरोपही एनसीबीवर केला जातोय. या सर्व टीकांवर एनसीबीचे मुख्य अधिकारी समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर हिने सडेतोड उत्तर दिलं आहे.

क्रांतीने एक पोस्ट करत एनसीबीच्या कामाचं कौतुक करणाऱ्या नेटकऱ्यांचे आभार मानले. त्यासोबतच तिने टीका करणाऱ्या व्यक्तींना खडे बोल सुनावले आहेत. क्रांतीने लिहिलं, 'तुम्ही देत असलेल्या पाठिंब्यासाठी खरंच मनापासून आभार. खरं तर आभार मानण्यासाठी शब्द पुरेसे नाहीत. खासकरून एनसीबीचे प्रयत्न, सततची छापेमारी आणि ते बेधडकपणे करत असलेली मेहनत तुम्हाला कळाली. त्याबद्दल धन्यवाद. परंतु, जेव्हा अशा प्रकरणात बॉलिवूडचा संबंध येतो तेव्हाच लोक या बातम्यांमध्ये रस घेतात. एनसीबी करत असलेल्या कामाचं प्रसारमाध्यमांकडून प्रसारण होतंय. दोषींना पकडण्याचं त्यांचं कामदेखील तुमच्यापर्यंत पोहोचेल. अशा प्रकारे तुमचं प्रेम आणि पाठिंबा त्यांच्या सोबत राहील अशी आशा करते.'क्रांतीने पुढे लिहिलं, 'सध्या एनसीबी मुद्दाम बॉलीवूडला लक्ष्य करतेय असा आरोप केला जातोय. पण सगळ्यांना या विनंती आहे. काहीही बोलण्यापूर्वी कृपया आधी जाऊन आकडेवारीचा काळजीपूर्वक अभ्यास करा आणि मगच येऊन टीका करा. ते दररोज नवनव्या संघर्षांना तोंड देतात. आपण मात्र आपल्या घरी सुरक्षित बसून आपल्या महागड्या फोनमधून टीका करत असतो. निस्वार्थपणे देशाची सेवा करणाऱ्यांसोबत चांगल्या पद्धतीने वागूया.' अशा पद्धतीने क्रांतीने ट्रोलर्सना समज दिली आहे.

Related Stories

No stories found.