
आलिया भट आणि रणबीर कपूर यांचं लग्न याच महिन्यात पार पडणार आहे. आज तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत रॉबिन भट्ट यांनी सांगितलं तर की १३ एप्रिलला मेहंदी असेल आणि १४ एप्रिलला लग्न होईल. आलियाचा सावत्र भाऊ राहुल भट यांनी मात्र आलिया आणि रणबीरच्या लग्नाची तारीख वेगळी सांगितली आहे.
सध्या बॉलिवूडमध्ये रणबीर आणि आलिया भट या दोघांच्याही लग्नाची चर्चा जोरात सुरू आहे. लग्नाच्या तारखांवरून विविध तर्क लावले जात आहेत. रणबीर कपूरच्या कुटुंबीयांनी याबाबत पूर्णपणे मौन बाळगलं आहे. आता चर्चा सुरू झाली आहे ती म्हणजे या दोघांच्या लग्नाची तारीख बदलली आहे का?
आता राहुल भटने असं सांगितलं आहे की आधी लग्नाची तारीख १३ आणि १४ एप्रिल ठरली होती. मात्र ही तारीख मीडियाला समजल्याने सुरक्षेच्या कारणास्तव ही तारीख बदलण्यात आली आहे.
आलिया-रणबीरच्या लग्नात पाहुणे कोण?
आलिया-रणबीरच्या लग्नाला कोण-कोण उपस्थित असणार आहे, याबद्दल विचारण्यात आलं. भट्ट म्हणाले, "पाहुण्यांना निमंत्रण देणाऱ्या समितीत मी नाही. त्यामुळे मला माहिती नाही." रॉबिन भट्ट यांना फोनवरून लग्नाचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे. रॉबिन भट्ट हे मुहेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांचे बंधू आहेत. ते बॉलिवूडमधील प्रसिद्ध लेखक आहेत.
आलिया-रणबीरचा विवाह राजेशाही थाटात होणार असून, या विवाह समारंभाला मिळालेल्या माहितीनुसार दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, करण जोहर, झोया अख्तर, डिझायनर मसाबा गुप्ता, अभिनेता वरूण धवन आणि त्याचा भाऊ रोहित धवन उपस्थित राहणार आहे. त्याचबरोबर आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांचा आगामी सिनेमा ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शक अयान मुखर्जीही या सोहळ्याला हजर असणार आहे.
या नावांबरोबरच आलिया आणि रणबीरच्या जवळचे असलेले अर्जून कपूर, फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा आणि अनुष्का रंजन यांच्याही नावांचा पाहुण्यांच्या यादीत समावेश असल्याची माहिती आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आलिया भट्टने डिअर जिंदगी चित्रपटात सहकलाकाराच्या भूमिकेत असलेल्या अभिनेता शाहरुख खानलाही निमंत्रित केलं आहे. त्याचबरोबर आलिया आणि रणबीरचे जवळचे मित्र या विवाह सोहळ्याला हजर असणार आहे. दोघांच्या कुटुंबातील सदस्य, यात नीतू कपूर, रिद्धीमा कपूर, करीना कपूर खान, करिश्मा कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट आणि सोनी राजदान हे सोहळ्यात असणार आहे.