मराठी सृष्टीतील अभिनेते सयाजी शिंदे पर्यावरण आणि वृक्षसंवर्धनाच्या कामासाठी ते सातत्याने पुढाकार घेत असतात. तर सयाजी शिंदे यांनी यंदाची शिवजयंती अनोख्या पद्धतीने साजरी करण्याचं ठरवलंय. शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांनी नवी मोहीम हाती घेतली असून याअंतर्गत गडावर झाडं लावण्याचा संकल्प त्यांनी केलाय. सयाजी स्वतः पन्हाळगडावर जाऊन वृक्षारोपण करणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर हिरवी मशाल दिसायला हवी असं आवाहन त्यांनी केलंय.
यासंदर्भात सयाजी शिंदे यांनी एक व्हिडीयोही पोस्ट केला आहे. या व्हिडियोमध्ये त्यांनी गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण करण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणतात, “सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात स्वराज्याचं स्वप्न पाहिलेले माझे राजे छत्रपती शिवाजी महाराज. सोबतीला मावळे होते, या मावळ्यांना आणि राजांना झाडांनीही साथ दिली. सह्याद्रीच्या प्रत्येक झांडांचीही स्वराज व्हावं हीच त्याची इच्छा होती. पण पूर्ण सह्याद्री आपण बोडका करुन टाकलाय.”
ते पुढे म्हणतात, “झाडं म्हणजे रयतेची लेकरं असं तळमळीने सांगणाऱ्या महाराजांचं आपण ऐकणार आहोत की, नाही? आपण शिवरायांचे मावळे आहोत, येत्या शिवजयंतीला प्रत्येक गडावर 400 झाडं लावण्याचा संकल्प आपण करुयात. गडावर मशाल घेऊन जाऊ, पण हिरवी मशाल, झाडांची मशाल, कारण झाडाशिवाय गडाला शोभा नाही.”
सयाजी यांच हा व्हिडीयो सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल झालाय. यापूर्वी देखील त्यांनी वृक्षारोपणासाठी आग्रही भूमिका घेतली होती. शिवाय त्यांच्या सह्याद्री देवराई प्रकल्पाच्या माध्यमातून राज्यभरात 40 ठिकाणावर वृक्षलागवडीसह वृक्षसंवर्धनाचं काम केलं जातंय.