कोरोनाच्या तडाख्याने मराठी रंगभूमीची होतेय वाताहात, कडक निर्बंधामुळे रंगभूमीची पुढची वाटचाल अडचणीची

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

मराठी रंगभूमीला गेल्या कित्येक वर्षांची वैभवशाली परंपरा आहे. मराठी रंगभूमी आजतागायत खस्ता खातेय किंवा बंद पडलीय असं कधीच चित्र निर्माण झालं नाही. इतर व्यवसायांवर आर्थिक नामुष्की कधी ना कधी ओढवली मात्र मराठी रंगभूमी आजपर्यंत अत्यंत समृध्दरित्या आपली वाटचाल करताना दिसून आली. मात्र कोरोनाचा प्रसार झाला आणि मराठी रंगभूमीच्या या समृध्द परंपरेला एकप्रकारे फटका पडायला सुरवात झाली. कोरोनाच्या तडाख्याने गेले वर्षभर नाट्यगृहं पूर्णपणे बंद होती. संपूर्णतह ठप्प पडलेल्या या व्यवसायाला गती मिळण्याची प्रचंड गरज आहे. काही निर्बंधासह गेल्या ९० दिवसांपासून नाट्यगृहात मराठी नाटकांच्या प्रयोगाला सुरवात तर झालीय. मात्र हाताच्या बोटांवर मोजता येतील इतके निर्मातेच मराठी नाटकाचं हे खर्चिक शिवधनुष्य उचलू शकत असल्यानं परिस्थिती हीच राहिली तर मराठी रंगभूमीवर येत्या काळात भयाण वास्तव येण्याइतपत परिस्थिती निर्माण झाली आहे.

ADVERTISEMENT

मराठी नाट्यनिर्माता हा मराठी रंगभूमीवरचा सर्वात महत्वाचा कणा आहे. सध्याच्या युगात एक नाटक उभं करण्यासाठी जवळपास १५ ते २० लाखांचा खर्च करतो. व्यावसायिक नाटयनिर्माता आपल्या नाटकावरच्या प्रेमापोटी आपली आयुष्यभराची पुंजी यात लावत असतो. कोरोना येण्याच्या पूर्वी मराठी रंगभूमीवर जवळपास ४० ते ४५ नाटकांचे प्रयोग विविध नाट्यगृहात सुरू होते. ज्यात मोठ्या बँनरची,लहान बँनरची अशी सगळीच नाटकं होती. काही नाटकांचे तर शुभारंभाचे प्रयोग झाले होते. या नवीन नाटकांसाठी काही निर्मात्यांनी कर्जही काढली होती. मात्र लॉकडाऊनचं शुक्लकाष्ट लागलं आणि या निर्मात्यांचे धाबेच दणाणले. पुढे वर्षभर महाराष्ट्रातील कोण्त्याही नाट्यगृहात मराठी नाटकाचा एकही प्रयोग झाला नाही. कर्जात गेलेले निर्माते अजून गाळात रूतले. दुसरीकडे रंगभूमीवर अवलंबून असणारा ७०० ते ८०० जणांचा रंगमंच कामगारांचा परिवार आहे. यातील जवळपास ३५० रंगमंच कामगार हे पूर्णत:ह फक्त आणि फक्त रंगभूमीवर अवलंबून आहेत. त्यांचा रोजगारच संपल्याने या रंगमंच कामगारांना जगण्यासाठी इतर नोकऱ्यांचा पर्याय स्वीकारावा लागला. ज्यात कोणी सिक्युरीटी गार्ड,डिलीव्हरी बॉय तर कोणी रिक्षा,टँक्सी चालवायला लागला. पण अचानक वेळ आल्यामुळे स्वीकारलेल्या या पर्यांयामधून या रंगमंच कामगारांना तुटपुंजी मिळकत मिळतेय.

हे वाचलं का?

मनोरंजन क्षेत्रातील मराठी रंगभूमी हे एकमेव असं क्षेत्र आहे. जिथे केलेल्या कामाचा मोबदला त्याच दिवशी नाटकाच्या भाषेत म्हणायचं झालं तर नाईटच्या स्वरूपात मिळतो. सिरीयल,सिनेमा,सध्या सुरू असलेल्या वेबसिरीज या माध्यमांमध्ये पैसा जरी नाटकाच्या प्रमाणात जास्त जरी मिळत असला तरी तो लगेच मिळत नाही. हा मोबदला एका ठराविक काळानंतर मिळतो.त्यामुळे नाटकधंद्यावर अवलंबून असणारा एक मोठा वर्ग आहे. ज्याची आता पुरती वाट लागली आहे. पूर्वी मराठी नाटकांचे प्रयोग रोजच्या रोज व्हायचे मात्र जसा काळ बदलला तसं या नाटकांचे प्रयोग आता फक्त दर शनिवार आणि रविवार आणि सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी होतात. महिन्याला सरासरी प्रत्येक नाटकाचे १० ते १२ प्रयोग होतात. कोरोना आधी दरमहिन्याला मराठी व्यावसायिक नाटकांवर अवलंबून असणाऱ्या निर्माता,कलाकार, रंगमंच कामगाराला या प्रयोगातून येणाऱ्या उत्पनाचा तरी आसरा होता मात्र पूर्ण वर्षभर नाटयगृहं बंद असल्याने ही परिस्थिती खूप भयाण आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

वर्षभर नाट्यगृहं बंद असल्यानंतर सरकारच्या परवानगीने ९० दिवसांआधी पुन्हा नाट्यगृहं सुरू झाली. मात्र नाटयगृहात ५० टक्के प्रेक्षकांनाच प्रवेश मिळणार असे निर्बंध घालण्यात आले. एखाद्या नाट्यगृहात संपूर्ण प्रयोग हाऊसफुल्ल असेल तर २ ते अडीच लाखांचं बुकींग होते. आता प्रेक्षकसंख्याच अर्ध्यावर आल्याने जरी एखादा प्रयोग हाऊसफुल्ल झाला तर एखाद्या नाटकाच्या प्रयोगाचं बुकींग १ ते सव्वा लाख रूपये होतं. मात्र निर्मात्यांसमोर खर्च अजूनही तेच आहेत. कलाकार आणि रंगमंच कामगारांच्या नाईटस,नाट्यगृहाचं भाडं, सेट ने आण करण्यासाठी टेम्पो, दौरा असेल तर बसचा खर्च आणि नाटक चालण्यासाठी वृत्तपत्रात देण्यात येणाऱ्या जाहिरातीचा खर्च हे सर्व खर्च अजून तेच आहेत. त्यातल्या त्यात दिलासा देणारी गोष्ट म्हणजे नाट्यगृहांनी आपलं भाडं कमी केलं असल्याने निर्मात्यांना श्वास घ्यायला तरी वाव आहे. मात्र १ ते सव्वा लाख बुकींग झाल्य़ावर येणारा प्रत्येक प्रयोगाचा खर्च हा ६० ते ७० हजारांच्या घरात आहे. त्य़ामुळे ३० ते ३५ हजारांत निर्माता पुढचा प्रयोग कसा लावील आणि तो काय स्वतचा नफा करील हे मोठे प्रश्न आहेत. बरं सध्या निर्बंधासह नाट्यव्यवसाय सुरू झाल्यानंतर ४० ते ४५ नाटकांपैकी मोजून १० नाटकंच सध्या सुरू आहेत. बाकी नाट्यनिर्मात्यांनी अजूनही आपल्या नाटकांचे प्रयोग सुरू केले नाहीत यामागे आर्थिक गणित आहे. बरं प्रशांत दामले, भरत जाधव यांच्या नाटकांना हाऊसफुल्ल बुकींग सोडलं तर बाकी नाटकांना ५० ते ७० हजारांच्या घरात बुकींग आहे. त्यामुळे जितका पैसा मिळतोय तितका खर्चही आहे यामुळे लहान निर्माता नाटक करायला धजावत नाहीये.

कोरोनाचा जोर अजूनही ओसरला नाहीये. मराठी नाटक हे मुंबई,पुणे सोडलं तर बाकीच्या शहरांत फार प्रमाणात होत नाही. पुण्यात पुढचे ७ दिवस नाटयगृहं पुन्हा बंद केली गेली आहेत. मुंबईतही कोरोनाचा जोर वाढला आहे त्यामुळे मुंबईतल्या नाटयगृहांवरही बंद होण्याची टांगती तलवार ही आहेच. तेव्हा अश्या परिस्थितीत आधीच गाळात गेलेला निर्माता नाट्यगृहंच बंद राहिली तर गाडी जरा कुठे रूळावर येतेय असं वाटतंय पण परत रूळावरून घसरतेय या परिस्थीत आला आहे. मराठी रंगभूमीवर अवलंबून असणाऱ्या अनेक जणांनी आता दुसऱ्या पर्यायांचा विचार करण्यास सुरवात केली आहे. बडे निर्माते सोडले तर लहान निर्माते सध्या नाटयनिर्मीती करण्यास धजावत आहेत. म्हणूनच आम्ही कडक निर्बंध पाळू पण लॉकडाऊन लावू नका आणि आमचं नाटयगृहं बंद करू नका अशी कळकळीची विनंती रंगकर्मी सरकारकडे करत आहेत. मात्र परिस्थिती अशीच राहिली तर समृध्द असणारी मराठी रंगभूमी हे केवळ कागदावरंच राहेल आणि मराठी रंगभूमीसमोर एक भयाण वास्तव येईल . त्यातून मराठी रंगभूमी इतक्या लवकर सावरू शकेल की नाही हाच मोठा प्रश्न आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT