Padma Awards: घराघरात लावणी पोहचवणाऱ्या लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांची सदाबहार कहाणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

घराघरात लावणी पोहचवणाऱ्या प्रख्यात लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांना भारत सरकारचा मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला….एकसोएक सुपरहिट मराठी चित्रपटातील लावणी गाणी गाणाऱ्या सुलोचना चव्हाण यांचा हा सन्मान म्हणजे अस्सल कलाकाराला दिलेली सर्वोच्च दाद आहे. यानिमित्त आपण सुलोचना चव्हाण यांच्या सदाबहार करिअरवर एक नजर टाकूया.

१७ मार्च १९३३ मध्ये मुंबईत सुलोचना चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांचे माहेरचे नाव सुलोचना कदम. मुंबईतील चाळ संस्कृतीत त्यांचे बालपण गेले. त्यावेळेस मुंबईत अनेक मेळे होते. सुलोचना चव्हाण यांच्या घरचाच एक मेळा होता ‘श्रीकृष्ण बाळमेळा’. याच मेळ्यात त्यांच्यासोबत अभिनेत्री संध्या यांनीसुद्धा काम केले होते. या श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांनी कलाक्षेत्रात पहिले पाऊल ठेवले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत. त्यांची मोठी बहीण स्वतः कलाक्षेत्रात नव्हती, पण सुलोचना चव्हाणांना नेहमी प्रोत्साहन देत असे. सुलोचनाने उत्तम गावे असे त्यांना वाटत असे. असे असले तरी, सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या. त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली आणि पुढे ह्या क्षेत्रात आपले नाव निर्माण केले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

त्यावेळेस वत्सलाबाई कुमठेकर यांनी गायलेली “सांभाळ गं, सांभाळ गं, सांभाळ दौलत लाखाची” ही लावणी सुलोचना चव्हाण वारंवार गुणगुणत असत आणि त्यासाठी आईकडून त्यांनी भरपूर ओरडाही खाल्ला होता. कारण मुलींनी लावणी ऐकू नये, गाऊ नये असे त्यांच्या आईला वाटायचे. पुढे मराठी लावणीसम्राज्ञी ठरलेल्या सुलोचना चव्हाण यांनी पहिली लावणी, आचार्य अत्रे यांच्या “हीच माझी लक्ष्मी” या चित्रपटात गायली. संगीतकार होते वसंत देसाई, आणि ही लावणी चित्रित झाली होते हंसा वाडकर यांच्यावर. या एका गाण्याने सुलोचनाजींच्या कारकिर्दीला लावणीच्या दिशेने वळण लावले. त्या लावणीचे शब्द होते “मुंबईच्या कालेजात गेले पती, आले होऊनशान बीए बीटी…” . आचार्य अत्रे यांनीच त्यांना “लावणीसम्राज्ञी” असा किताब बहाल केला होता.

ADVERTISEMENT

सुलोचना चव्हाण यांनी १९५३-५४ च्या सुमारास “कलगीतुरा” या चित्रपटासाठी राजा बढे यांनी गायलेल्या काही लावण्या गायल्या. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक होते “एस. चव्हाण” पुढे याच दिग्दर्शकाबरोबर सुलोचनाबाईंचे लग्न झाले आणि सुलोचना कदम यांच्या सुलोचना चव्हाण झाल्या. यादरम्यानच “रंगल्या रात्री अशा” या चित्रपटातील गाणी सुलोचना चव्हाण यांनीच गावी असा आग्रह गीतकार जगदीश खेबुडकर यांनी धरला आणि “नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची” या गाण्याने त्यांचे आयुष्यच बदलून गेले. त्यातूनच ख-या अर्थाने लावणीसम्राज्ञी म्हणून सुलोचना चव्हाण पुढे आल्या. ’मल्हारी मार्तंड’, ’केला इशारा जाता जाता’, ’सवाल माझा ऐका’ अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या. चपखळ, फटकेबाज शब्दांना आपल्या आवाजाच्या, सुरांच्या माध्यमातून ठसका व खटका देण्याचे काम सुलोचनाजीं इतके कुणीच उत्तम करू शकलेले नाही. “पाठीमागे अंतरे कसेही असोत पण लावणीच्या मुखड्याची सुरुवात ठसकेबाजच झाली पाहिजे” असे सुलोचना चव्हाणांचे ठाम मत होते आणि याचा प्रत्यय त्यांनी गायलेल्या लावण्यांतून येतोच.

ADVERTISEMENT

लावणी गायनामध्ये नाव मिळवण्याआधी सुलोचना चव्हाण यांनी विविध प्रकारची गाणी गायलेली होती. श्रीकृष्ण बाळमेळ्यामध्येच मेकअपमन दांडेकर हे चित्रपटसृष्टीशी संबंधित होते. त्यांच्यामुळेच संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. आपण गाणे रेकॉर्डिंगसाठी फ्रॉकमध्ये गेलो होतो अशी आठवण देखील त्या आवर्जून सांगतात. या नंतर त्यांनी मास्टर भगवान यांच्या काही चित्रपटांत पार्श्वगायन केले आणि त्यावेळेस त्यांच्यासोबत सहगायक असत “सी. रामचंद्र” पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली. करियरच्या सुरुवातीलाच अनेक दिग्गजांबरोबर त्यांनी काम केले. वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत “भोजपुरी रामायण” त्या गायल्या होत्या. मराठी व्यतिरीक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामिळ, पंजाबी या भाषेमध्ये भजन, गझल असे विविध प्रकार देखील हाताळले आहेत. त्यांचे गझल गायन ऐकून बेगम अख्तर यांनी सुलोचना चव्हाण यांना जवळ घेऊन दिलखुलास दाद दिली होती. सुलोचनाबाईंच्या आयुष्यातील आठवणींपैकी ही एक अतिशय महत्त्वाची आठवण. सुलोचनाजींचे शास्त्रीय गायकीचे शिक्षण झाले नाही हे ऐकून तर बेगम अख्तर यांना आश्चर्याचा धक्का बसला होता. असे अनेक सन्मानाचे प्रसंग त्यांच्या आयुष्यात आले आहेत. आपण सुलोचनाबाईंच्या लावण्या ऐकताना संगीतातील त्यांची ही मजल थोडी दुर्लक्षित होते.

पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार “मल्हारी मार्तंड” या चित्रपटासाठी त्यांना १९६५ साली मिळाला. त्यापलिकडे जाऊन विविध स्तरावर त्यांनी गायलेली गाणी आणि लावणी या प्रकाराला त्यांच्या गायनाने मिळवून दिलेली मान्यता आणि यामुळेच जनमानसांच्या ह्रदयात मिळालेले स्थान, त्यांचे केलेले कौतुक हा देखील एक सर्वोच्च पुरस्कार म्हणता येईल. आणि आता पद्मश्री पुरस्कारामुळे त्यांचं या क्षेत्रातील योगदान पुन्हा एकदा जगासमोर आलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT