'मुंबईकर मुंबईबाहेर जातील'; अभिनेता सुमित राघवनने आदित्य ठाकरेंना टॅग केलेलं ट्वीट व्हायरल

सुमित राघवन बेधडकपणे सोशल मीडियावर आपलं मत मांडताना दिसतो. मुंबईतील सामान्य लोकांच्या समस्यांबाबत तो अनेकदा आवाज उठवतानाही दिसतो.
'मुंबईकर मुंबईबाहेर जातील'; अभिनेता सुमित राघवनने आदित्य ठाकरेंना टॅग केलेलं ट्वीट व्हायरल

अभिनेता सुमित राघवन सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. अगदी सामाजिक ते राजकीय अशा सर्वच विषयांवर सुमित राघवन बेधडकपणे सोशल मीडियावर आपलं मत मांडताना दिसतो. मुंबईतील सामान्य लोकांच्या समस्यांबाबत तो अनेकदा आवाज उठवतानाही दिसतो. अनेकदा त्याचे ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. नुकतंच मुंबई महानगरपालिकेला उद्देशून सुमितनं केलेलं ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल झालंय.

मागच्या काही दिवसांपासून मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अनधिकृत दुकानं किंवा विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याचं चित्र सर्रास दिसतंय. सुमितनं नुकत्याच केलेल्या ट्वीटमध्ये याच प्रकाराकडे मुंबई महानगरपालिकेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्या ट्विटरवर त्यानं पश्चिम द्रुतगती मार्गावरील एक व्हिडीओ शेअर करत एक पोस्टही लिहिली आहे. ज्यात त्यानं मुंबई महानगरपालिकेला टॅगही केलं आहे.

सुमितनं वांद्रे ते दहिसर या मार्गावर असलेल्या अनधिकृत दुकानांचा व्हिडीओ शेअर करताना म्हटलं आहे की ‘मेट्रो कारशेड्स तुम्ही हलवली. पण दहिसर टोलनाक्यावरील किंवा वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील अनधिकृत दुकाने हलवण्यात आलेली नाहीत. मुंबईकर मुंबईबाहेर जातील आणि तुम्हाला या अतिक्रमण करणाऱ्यांसोबत शहरात आनंदाने राहता येतील, याची काळजी घ्या.’ आपल्या या ट्वीटमधून सुमितनं मुंबईच्या रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या या अनधिकृत दुकानांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.सुमित राघवनचं हे ट्वीट आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

ज्यात त्यानं मुंबई महानगरपालिकेबरोबरच राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुंबईचे पालक मंत्री आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री कार्यालयालाही टॅगही केलं आहे. दरम्यान मुंबई किंवा सामान्य मुंबईकरांच्या समस्यांवर भाष्य करण्याची सुमित राघवनची ही पहिलीच वेळ नाही. या आधीही अनेकदा त्यानं मुंबईतील समस्यांवर भाष्य केलं आहे. आता या ट्विटवरुन काही कारवाई होते का? महापालिका यावर काही उत्तर देते का? हे पाहाणं महत्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in