सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकरची जोडी पुन्हा जमणार, आला रे आला मिडीयम स्पाइसीचा ट्रेलर आला.

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “मीडियम स्पाइसी” ची लज्जतदार झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. शेफ निस्सीम म्हणजेच ललित प्रभाकर हॉटेलमध्ये काम करतो आहे आणि त्याचा सहकारी मित्र शेफ शुभंकर म्हणजे सागर देशमुखच्या “ए शेफ, यार काम काम होता है, लाईफ नहीं” अशा संवादापासून सुरु होणारा हा ट्रेलर सुरुवातीलाच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतो. आई, वडील, बहीण, मित्र, मैत्रिणी, सहकारी अशा नात्यांची चॉईस जास्त असल्याने कॉम्प्लिकेटेड आयुष्य जगताना काहीशा गोंधळलेल्या मनस्थितीत वावरणाऱ्या एका शेफच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतलेला आहे असे यातून स्पष्ट होत आहे. साऊथ इंडियन टोन मध्ये बोलणारी शेफ गौरी या दाक्षिणात्य मुलीची भूमिका सई ताम्हणकर हिने साकारली आहे, या निमित्ताने पुन्हा एकदा सईला एका वेगळ्या भूमिकेत पाहायची संधी प्रेक्षकांना लाभली आहे. आपल्या ठाम मतांसह स्वतःच्या पायावर उभी असलेली प्राजक्ता ही भूमिका पर्ण पेठे हिने साकारली आहे तसेच नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, इप्शिता या तरुण कलाकारांना ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग आणि अभिनेते रवींद्र मंकणी यांची भक्कम साथ लाभली आहे.

मराठी, हिंदी, उर्दू, कन्नड भाषिक रंगभूमीवरील प्रसिद्ध आणि आघाडीचे नाव आणि एक उत्तम संकलक म्हणून प्रसिद्ध असलेले युवा नाटककार मोहित टाकळकर “मीडियम स्पाइसी” या चित्रपटाच्या माध्यमातून मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहेत. त्यांनी या चित्रपटातून सध्याच्या शहरी वातावरणात असलेले मानवी नातेसंबंध वेगवेगळ्या दृष्टिकोनातून उलगडण्याचा प्रयत्न केला असल्याचे ट्रेलर मधून दिसते आहे. निर्मात्या विधि कासलीवाल या प्रत्येकवेळी एक वेगळा विषय घेऊन चित्रपट निर्मिती करत असतात, त्यांचा नेहमीच युवा आणि प्रयोगशील कलाकारांना संधी देण्यावर भर असतो व “मीडियम स्पाइसी” या चित्रपटातुन त्यांनी पुन्हा एकदा हे अधोरेखित केले आहे.लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, विधि कासलीवाल निर्मित, इरावती कर्णिक लिखित आणि मोहित टाकळकर दिग्दर्शित “मीडियम स्पाइसी” ची लज्जतदार डिश १७ जून २०२२ पासून संपूर्ण महाराष्ट्रात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT