
बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात अटक. 3 ऑक्टोबर 2021 रोजी सर्वच माध्यमांमध्ये तत्सम बातम्या आल्या. आर्यन खानला 20 दिवसांहून अधिक दिवस मुंबई तुरुंगात काढावे लागले. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शनवर प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली आहे. पण, कालांतराने आर्यन खानविरुद्धचा खटल्याने 'यु टर्न' घेतला आणि केस आर्यन खानच्या बाजूने झुकू लागली.
अखरे मे 2022 मध्ये आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणावर अनेक प्रश्न उपस्थीत करण्यात आले. त्यानंतर आर्यन खानने एनसीबीला काही प्रश्न विचारले आहेत. त्याने विचारले, ' खरंच मी हे सर्व डिझर्व करतो का?' हा प्रश्न आर्यन खानने एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंग यांना विचारला आहे.
संजय सिंह यांना आशा नव्हती की आर्यन खान या सर्व प्रश्नांची उत्तरे देईल. संजय सिंह यांनी सांगितले की, बोलणे सुरू करण्यापूर्वी त्यांनी आर्यन खानला आरामात बसवले. संजय सिंह यांनी आर्यन खानला सांगितले की ते त्याच्याशी मोकळ्या मनाने बोलायला आलो आहेत.
आर्यन आपलाही मुद्दा ठेवू शकतो आणि प्रश्नांची उत्तरेही देऊ शकतो. या गोष्टीमुळे आर्यन खान चांगलाच सुखावला. त्यानंतर आर्यन खानने संजय सिंहांनाच काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.
आर्यनने संजय सिहांना काय विचारले?
''सर, तुम्ही मला आंतरराष्ट्रीय ड्रग तस्कर म्हणून दाखवले. मी ड्रग्जमध्ये पैसे गुंतवतो हे दाखवले. तुमचे आरोप बिनबुडाचे नाहीत का? NCB ला माझ्याकडून कोणतेही ड्रग्स मिळाले नाही, तरीही त्यांनी मला अटक केली. सर, तुम्ही माझ्यासोबत खूप चुकीचे केले आहे आणि माझी प्रतिष्ठा खराब केली आहे. मला इतके आठवडे तुरुंगात का ठेवले गेले, मी खरोखरच ते डिझर्व करत होतो का?
इंडिया टुडे मॅगझिनच्या कव्हर स्टोरीमध्ये संजय सिंहांनी आर्यन खानसोबत झालेल्या मुलाखतीचा उलगडा केला. 'लेसन्स फ्रॉम द आर्यन खान केस' नावाची कव्हर स्टोरी इंडिया टुडे ग्रुपचे संपादकीय संचालक राज चेंगप्पा यांनी लिहिली आहे. संजय सिंह हे या आर्यन खान प्रकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीचे (SIT) प्रमुख होते.
दरम्यान, आर्यन खान प्रकरणी नोव्हेंबर 2021 मध्ये एसआयटीची स्थापना करण्यात आली होती. एसआयटीने स्वतंत्रपणे तपास करून ड्रग्ज बाळगल्यानंतर आर्यनसह 19 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. 2 ऑक्टोबर रोजी गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर ड्रग्ज असल्याची माहिती एनसीबीला मिळाली होती. त्यानंतर समीर वानखेडे यांच्या पथकाने आर्यन खानसह पाच जणांना अटक केली. या प्रकरणाला अनेक महिने उलटल्यानंतर आता आर्यन खानला विचारण्यात आलेले प्रश्न समोर आले आहेत.
या प्रकरणात आर्यनवर आरोप सिद्ध झाले असते तर त्याला 20 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकला असता. परंतु 28 मे 2022 रोजी त्याच्यावरील आरोप चुकीचे असल्याचे सिद्ध झाले. तपास पथकाला त्याच्याविरुद्ध कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.
इंडिया टुडे मॅगझिनशी संवाद साधताना संजय सिंहांनी सांगितले की, आर्यन खान तुरुंगात असताना इतर पालकांप्रमाणेच तो शाहरुख खानला भेटला होता. संजय सिंह यांनी सांगितले की, किंग खानने त्यांच्या भेटीत मुलाच्या भावनिक आणि मानसिक आरोग्याबद्दल चिंता व्यक्त केली. सिंग यांनी सांगितले की, अशा अनेक रात्री शाहरुख त्याच्या मुलाला खोलीत त्याला कंपनी द्यायला जायचा. परंतु, आर्यन तुरुंगात असताना शाहरुख त्याला दिलासा देऊ शकला नाही.
शाहरुखनेही संजय सिंहांसोबत आर्यनच्या निर्दोष असल्याची गोष्ट केली. ते म्हणाले होते की, कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय त्यांच्या मुलाला 'बदनाम' केले जात आहे. संजय सिंहांच्या मते, ओलसर डोळ्यांनी शाहरुख म्हणाला, ''आमची समाजासमोर मोठा गुन्हेगार दाखवून बदनामी केली गेली. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की आम्ही दररोज खूप कठीण प्रसंगातून जात आहोत, ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.''
आर्यनला एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी अटक केली होती. त्यानंतर 28 ऑक्टोबरला त्यांना जामीन मिळाला. काही काळापूर्वी एनसीबीने या प्रकरणाशी संबंधित आरोपपत्र दाखल केले होते, ज्यामध्ये आर्यन खानचे नाव नव्हते.