"ते जे काही बोलतात ते सर्वच पटतं असं नाही, पण...; 'त्या' वादावर अवधूत गुप्तेने मांडली बाजू

भारताच्या स्वातंत्र्याबद्दल कंगनाने केलेल्या विधानाला विक्रम गोखलेंनी पाठिंबा दिला होता... या संपूर्ण प्रकरणावर आता अवधूत गुप्तेने फेसबुक पोस्ट लिहून भूमिका मांडली आहे...
"ते जे काही बोलतात ते सर्वच पटतं असं नाही, पण...; 'त्या' वादावर अवधूत गुप्तेने मांडली बाजू
अभिनेते विक्रम गोखले आणि संगीतकार-गायक अवधूत गुप्ते.

अभिनेत्री कंगना रणौतने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानाचं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी समर्थन केलं होतं. गोखले यांच्या भूमिकेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. या वादावर बोलताना संगीतकार-गायक अवधूत गुप्तेने 'विक्रम गोखले विचार करूनच बोलले असतील' असं म्हटलं होतं. त्यामुळे तोही टीकेचा धनी ठरला. या सर्व प्रकरणावर आता अवधूत गुप्तेने फेसबुक पोस्ट लिहून भूमिका स्पष्ट केली आहे.

अवधूत गुप्तेने लिहिलेली पोस्ट...

नमस्कार!

आधी दुर्लक्षित करावे असे वाटले होते. पण, काही मित्र अजूनही नाराज आहेत असे वाटते, म्हणून त्यांची नाराजी दूर करण्यासाठी हा एक छोटासा प्रयत्न.

सर्वप्रथम "मी ह्यावर बोलू इच्छित नाही, कारण ते वडिलांच्या ठिकाणी आहेत" असे सांगितले असता अधोरेखित शब्दांची जागा हेतूपुरस्सर बरोब्बर उलटी करुन, माझ्या बोलण्याचा वेगळाच अर्थ काढणाऱ्या सर्व वृत्त संस्थांना मानाचा मुजरा. एवढेच सांगेन, की लोकांच्या प्रेमाचा हा ताजमहाल मी अतिशय कष्टाने कण-कण जमवून बांधला आहे. माझ्यासाठी त्यांचे प्रेम हीच आयुष्यातील सर्वात मोठी कमाई आहे. काही हजार व्ह्यूजच्या क्षुल्लक स्वार्थासाठी प्लीज त्यावर दगड मारू नका!

अभिनेते विक्रम गोखले आणि संगीतकार-गायक अवधूत गुप्ते.
'समाजात विकृत मनोवृत्ती असते, तिची दखल घ्यायची नाही'; शरद पवारांचा विक्रम गोखलेंना टोला

ही मराठी चित्रपट सृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे. ह्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना आम्ही अशोक 'मामा', विक्रम 'काका' अशाच नावांनी हाका मारतो. आणि ते काहीही बोलले तरी सुद्धा मान खाली घालून उभे राहणे हीच आमची संस्कृती आहे.

ह्याचा अर्थ ते जे काही बोलतात ते सर्व आम्हास पटते असा अजिबात होत नाही. परंतु, पटले नाही म्हणून तोंड वर करून सांगणे बरोबर ठरेल काय?

त्यांच्या काळात त्यांनी नाटका पासून रुपेरी पडद्यापर्यंत आपल्या कलेने मराठी रसिक वर्ग घडवला आणि वाढवला, ज्या झाडाची फळे आज आम्ही चाखत आहोत. त्यांचे उपकार आम्ही आणि मराठी रसिकवर्ग ठरवूनही फेडू शकत नाही. त्यामुळेच त्यांनी उतारवयात केलेले एखादे वक्तव्य हे त्यांच्या संपूर्ण आयुष्याची मेहनत आणि कमवलेला सन्मान केराच्या टोपलीत टाकू शकत नाही.

अभिनेते विक्रम गोखले आणि संगीतकार-गायक अवधूत गुप्ते.
Vikram Gokhale: 'मोदींची गणना जगातील शक्तीशाली लोकांमध्ये.. म्हणून यांची आग होते', गोखलेंनी कोणावर साधला निशाणा?

राहता राहिला हा संपूर्ण वाद ज्यामध्ये पडायची माझी अजिबात इच्छा नाही. ह्याचा अर्थ माझ्याकडे सजगता नाही, असा अजिबात होत नाही. पण, माझ्याकडे माझी स्वतःची संगीत आणि चित्रपट अशी चिरंतन टिकणारी माध्यमे असताना ह्या क्षणभंगुर समाज माध्यमांतून आणि वृत्तसंस्थाना काहीतरी विधाने देऊन मी का व्यक्त होऊ? आणि आजवर मी त्याच माध्यमातून व्यक्त होत आलेलो आहे. चित्रपट 'झेंडा' पासून 'जात' गाण्यापर्यंत सर्व उदाहरणं तुमच्या समोर आहेत.

बाकी, माझ्यावर आरोप करणाऱ्या मित्रांनी सांगावे, की ह्या बातमीवर जितक्या तत्परतेने प्रतिक्रिया दिलीत किंवा शेअर केलीत तितक्याच तत्परतेने माझे 'जात' हे गाणे शेअर केले होते का? माझी खात्री आहे की माझ्या ह्या मित्रपरिवारातील ९९ टक्के माणसे ही अतिशय समजूतदार, माझ्यावर विश्वास ठेवून प्रेम करणारी, माणुसकीला जपणारी अशीच सुसंस्कारी आहेत.

अभिनेते विक्रम गोखले आणि संगीतकार-गायक अवधूत गुप्ते.
'2014 पासूनच देशाला खरं स्वातंत्र्य मिळालं, मी माझ्या मतावर आजही ठाम', विक्रम गोखले पुन्हा तेच म्हणाले

बाकीच्या मित्रांना एवढीच विनंती. की तिरस्काराचे हे विष असे पसरवू नका. ह्यामुळे होणाऱ्या त्रासाचे चटके शेवटी तुम्हाला देखील लागतीलच. काळजी घ्या!

तुमचा

अवधूत

अवधूत आधी काय म्हणाला होता?

विक्रम गोखलेंनी कंगनाच्या भूमिकेचं समर्थन केल्यानंतर अवधूत गुप्तेला माध्यमांकडून याविषयी त्याचं मत विचारण्यात आलं होतं. त्यावर बोलताना 'विक्रम गोखले मोठे कलाकार आहेत. ते केवळ कलाकार म्हणून मर्यादित नाहीत. विक्रमजी विचारवंत आहेत; त्यांचा अभ्यास खूप मोठा आहे. ते आमच्या वडिलांच्या स्थानी आहेत. आम्ही त्यांचा खूप आदर करतो. विक्रमजी जे काही बोलले असतील, ते विचार करूनच बोलले असतील. त्यांनी व्यक्त केलेलं मत पूर्ण विचारांती असावं. त्यावर प्रतिक्रिया देण्याइतकी माझी पात्रता नाही', असं अवधूत गुप्तेंनं म्हटलं होतं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in