Bigg Boss: बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?

Who is Vishal Nikam: बिग बॉस 3 सीजनचा विजेता ठरलेला विशाल निकम आहे तरी कोण जाणून घ्या त्याच्याविषयी सविस्तरपणे.
Bigg Boss: बिग बॉस मराठी 3 चा विजेता विशाल निकम आहे तरी कोण?
who is vishal nikam winner of bigg boss marathi season 3(फोटो सौजन्य: Instagram)

मुंबई: बिग बॉस मराठी 3 सीजनच्या विजेतेपदावर सांगलीच्या विशाल निकम याने नाव कोरलं आहे. 'दख्खनचा राजा ज्योतिबा' या मालिकेतील मुख्य भूमिकेमुळे विशाल निकम हा महाराष्ट्रातील घराघरात पोहचला होता. मात्र, कलर्स मराठीच्या बिग बॉसने विशाल निकमला आता खरी ओळख मिळवून दिली आहे. बिग बॉसचा विजेता ठरलेल्या विशाल निकम याने घरातील अनेक तगड्या स्पर्धकांना मागे सारुन बिग बॉसचं जेतेपद पटकावलं आहे. जाणून घेऊया विशाल निकम आहे तरी कोण.

कोण आहे विशाल निकम?

बिग बॉसच्या घरात सुरुवातीच्या काही आठवड्यानंतरच विशाल निकम हा स्ट्राँग स्पर्धक म्हणून ओळखला जाऊ लागला. शेवटच्या आठवड्यात Ticket to finale मिळवून विशाल हा बिग बॉसच्या टॉप-5 मधील पहिला स्पर्धक ठरला होता.

27 वर्षीय विशाल निकमचा जन्म सांगलीतील खानापूर येथील एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला होता. विशालचं ग्रॅज्युएशनपर्यंतचं शिक्षण हे सांगलीतच झालं आहे. भौतिकशास्त्र या विषयातून त्याने एमएस्सीची पदवी घेतली आहे.

विशाल निकम हा बिग बॉसच्या घरातील सुदृढ स्पर्धकांपैकी एक होता. व्यायामाची सुरुवातीपासूनच आवड असलेल्या विशाल निकम याला लष्कराचं आकर्षण होतं. मात्र, नंतर तो मनोरंजन क्षेत्राकडे वळला. सुरुवातीपासूनच चांगली शरीरयष्टी असलेला विशाल निकम याने मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. त्यानंतर त्याने काही ब्रँडसाठी मॉडेलिंग देखील केलं होतं.

विशालने मनोरंजन क्षेत्रात आपली करिअरची सुरुवात मोठ्या पडद्यापासून केली होती. 'मिथुन' हा त्याचा पहिलावहिला सिनेमा होता. त्यानंतर तो छोट्या पडद्याकडे वळाला. साता जन्माच्या गाठी ही त्याची पहिली मालिका होती. तसेच तो 'द स्निपर्स' या वेबसीरीजमध्ये देखील मुख्य भूमिकेत होता.

'दख्खनचा राजा ज्योतिबा' या पौराणिक मालिकेतील त्याची ज्योतिबाची भूमिका ही फारच गाजली होती. या मालिकेनंतर विशाल हा थेट बिग बॉसच्या घरातच पाहायला मिळाला. विशाल सुरुवातीला हा कमकुवत स्पर्धक असल्याचं घरातील लोकांना वाटत होतं. मात्र, जसजसा खेळ पुढे गेला तसतसा विशाल हा टॉप 5 मध्ये असणारा स्पर्धक असेल असं सर्वांनाच वाटू लागलं.

सुरुवातीला विशाल, विकास, मीनल आणि सोनाली पाटील या चौघांचा एक ग्रुप घरात होता. पण काही दिवसांनी विशालचे तिघांसोबतही काही कारणांमुळे वाद होत होते आणि म्हणूनच तो काहीसा एकटाही पडला होता. पण शेवटच्या आठवड्यात तिकीट टू फिनाले मिळवून फायनलमध्ये पोहचलेला विशाल निकम यालाच बिग बॉस सीजन 3 चा विजेता म्हणून महाराष्ट्रातील जनतेने आणि प्रेक्षकांनी पसंती दिली.

असा रंगला 'बिग बॉस'चा ग्रँड फिनाले

गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असलेल्या बिग बॉस 3 सीजनच्या अंतिम फेरीत उत्कर्ष शिंदे, विकास पाटील, जय दुधाणे, विशाल निकम आणि मीनल शहा हे स्पर्धक पोहचले होते. याच 5 जणांपैकी मीनल शहा ही विजेतेपदाच्या शर्यतीतून सर्वात आधी बाहेर पडली. 'बिग बॉस'च्या घरातील सर्वात स्ट्राँग स्पर्धक अशी ओळख मिळवलेल्या मीनल शहा हिला घरातून बाहेर पडावं लागल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला.

मीनलनंतर उत्कर्ष, विकास, विशाल आणि जय यांच्यात विजेतेपदाची शर्यत रंगली. पण मीनल पाठोपाठ उत्कर्ष शिंदे हा घराबाहेर गेला. उत्कर्ष हा देखील बिग बॉसच्या सीजन 3 चा प्रबळ दावेदार होता. पण प्रेक्षकांनी त्याला मतांचा पुरेसा कौल न दिल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं.

who is vishal nikam winner of bigg boss marathi season 3
विशाल निकम ठरला Marathi Bigg Boss 3 च्या पर्वाचा विजेता, जय दुधाणेला उप-विजेतेपद

उत्कर्ष शिंदे हा घराबाहेर गेल्यानंतर विशाल, विकास आणि जय हे टॉप ३ स्पर्धक राहिले होते. ज्यापैकी विकास पाटील हा देखील विजेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर पडला आणि जय दुधाणे व विशाल निकम हे तिसऱ्या पर्वाचे फायनलिस्ट ठरले.

अखेरीस या दोन स्पर्धकांपैकी विशाल निकमने बाजी मारत तिसऱ्या पर्वाचं विजेतेपद मिळवलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in