
एनआयए (NIA) अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या पथकांनी मुंबईतील २० ठिकाणी धाडी टाकल्या आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमशी संबंधित शार्प शूटर्स आणि तस्करांच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.
एनआयएच्या पथकांनी मुंबईतील विविध २० ठिकाणांवर धाडी टाकल्या आहेत. डी-कंपनीच्या रिअर इस्टेट मॅनेजर, तस्कर आणि शार्प शुटर्सच्या ठिकाणांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर अनेक हवाला ऑपरेटर्सवरही कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे.
एनआयएने मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात धाडी टाकल्या. बोरिवली, सांताक्रूझ, वांद्रे, नागपाडा, गोरेगाव, परळसह २० ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर एनआयएने दाऊद इब्राहीम, डी-कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. डी-कंपनीवर संयुक्त राष्ट्र संघाने बंदी घातलेली आहे.
१९९३ मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या दाऊदला २००३ मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने दहशतवादी घोषित केलं होतं. त्यांच्यावर २५ मिलियन डॉलरचा बक्षीसही ठेवलेला होता.
नवाब मलिकांशी कनेक्शन
राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्याविरुद्ध अटक केलेल्या प्रकरणातच ही छापेमारी करण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी नवाब मलिक यांना मनी लाँडरिंग प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. दाऊद इब्राहीमचा फ्रंटमॅनसोबत मलिकांनी व्यवहार केल्याचा आरोपानंतर ईडीने ही कारवाई केली होती.
दाऊद इब्राहीमशी संबंधित प्रकरणाचा तपास केंद्रीय गृह मंत्रालयाने फेब्रुवारी २०२२ मध्ये एनआयएकडे सोपवला होता. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या माहितीप्रमाणे डी कंपनी आणि दाऊद इब्राहीम भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्ज स्मगलिंग आणि बनावट चलनाचा वापर करण्याचं काम करत आहे.
दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनी लश्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद आणि अल कायदा यांच्या माध्यमातून भारतात अतिरेकी कायवाया करत असल्याचंही गृह मंत्रालयाचं म्हणणं आहे.
एनआयए फक्त दाऊद इब्राहीम आणि डी-कंपनीचीच चौकशी करणार नाहीये, तर छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इकबाल मिर्ची, दाऊदची बहीण हसीना पारकर यांच्याशी संबंधित घटनांचाही तपास करणार आहे.