Hanuman Chalisa Row : "तुरुंगातील जेवण इतकं वाईट आहे का की, तुम्हाला घरचं जेवण हवंय?"; राणांना न्यायालयाचा सवाल

Navneet Rana, Ravi Rana case : तुरुंगात घरचं जेवण दिलं जावं, अशी मागणी नवनीत राणा, रवी राणांनी केली होती...
Hanuman Chalisa Row : "तुरुंगातील जेवण इतकं वाईट आहे का की, तुम्हाला घरचं जेवण हवंय?"; राणांना न्यायालयाचा सवाल

हनुमान चालीसा पठण वादामुळे तुरुंगात पोहोचलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या याचिकेवर शनिवारी सुनावणी झाली. मुंबईतील बोरिवलीमध्ये मेट्रोपॉलिटन न्यायालयात जामीनावरील याचिकेवर सुनावणी झाली. जामीनावरील निर्णय उद्या (२ मे) सुनावला जाणार आहे. दरम्यान, न्यायालयाने राणा दाम्पत्याची तुरुंगात घरचं जेवण देण्याची मागणी फेटाळली.

मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान नवनीत राणा, रवी राणा यांनी दिलं होतं. त्यासाठी मुंबईत आलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. सध्या राणा दाम्पत्य पोलीस कोठडीत आहे. दोघांनी जामीनासाठी याचिका दाखल केलेली असून, याचा फैसला सोमवारी होणार आहे.

दरम्यान, जामीनाच्या याचिकेबरोबरच नवनीत राणा, रवी राणा यांनी तुरुंगात घरचं जेवण दिलं जावं, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. राणा दाम्पत्याची मागणी न्यायालयाने फेटाळून लावली. नवनीत राणा आणि रवी राणा यांनी तुरुंगात दिलं जाणार जेवण हे निकृष्ट असतं, असंच दाखवलं आहे, असं म्हणत न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली.

राणा दाम्पत्याने असा कोणताही वैद्यकीय रिपोर्ट न्यायालयाकडे सादर केला नाही, ज्यातून हे सिद्ध होईल की त्यांना फक्त घरचं जेवण दिलं जायला हवं, असंही न्यायालयाने मागणी फेटाळताना सांगितलं.

आठवडाभरापासून तुरुंगात असलेल्या नवनीत राणा व रवी राणा यांनी घरच्या जेवणाची मागणी केली होती. ही मागणी करताना दोघेही निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. (खासदार, आमदार) प्रतिष्ठीत, समाजात मान असलेल्या व्यक्ती असल्याने त्यांना तुरुंगातील जेवणाची सवय नाही. डाएट प्लान व्यतिरिक्त कोणतंही जेवण घेतलेलं नसल्याचं राणा दाम्पत्याकडून सांगण्यात आलं होतं.

आरोग्य चांगले राहावं म्हणून गुणवत्तापूर्ण जेवण करतो, असं राणा दाम्पत्याने याचिकेत म्हटलेलं होतं. त्यांना तुरुंगात तसं जेवण तुरुंगात मिळत नसल्यानं दिवसेंदिवस प्रकृती खराब होत आहे. त्या आधारावरच राणा दाम्पत्याने ही मागणी केली होती.

राणा दाम्पत्याने प्रकृतीचं कारण देत घरच्या जेवणाची मागणी केली, मात्र कोणतीही कागदपत्रे न्यायालयात सादर केली नाही. ज्यातून सिद्ध होईल की, त्यांना घरच्या जेवणाची गरज आहे. त्यांनी कोणतंही वैद्यकीय प्रमाणपत्रही सादर केलं नाही. त्याचबरोबर न्यायालयाने ही मागणी फेटाळताना सांगितलं की, बाहेरचं जेवण दिल्यामुळे कैद्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

सरकारी वकिलांनी केला विरोध

घरचं जेवण दिलं जावं, या राणा दाम्पत्यांच्या मागणीवर सरकारी वकिलांनी आक्षेप घेतला. हा अर्ज अवैध असल्याचं त्यांनी सांगितलं. तुरुंग अधिकाऱ्यांकडून सर्वच कैद्यांना स्वच्छ जेवण दिलं जात आहे. बाहेरून जेवण देण्यामुळे तुरुंगाच्या सुरक्षेला धोका संभावू शकतो.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in