
खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. न्यायालयाने राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. मुंबई पोलिसांनी नवनीत राणा यांच्या पत्रकार परिषदेतील काही मुद्दे अधोरेखित करत जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांचा जामीन रद्द करण्याची मागणी करणारा अर्ज मुंबई पोलिसांनी दाखल केला आहे. नवनीत राणा यांनी लिलावती रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणी विशेष न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी न्यायाधीश राहुल रोकडे यांनी राणा दाम्पत्याला नोटीस बजावली आहे. आपल्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट का जारी करण्यात येऊ नये, असा सवाल करत न्यायालयाने कारणे द्या नोटीस बजावली आहे.
मुंबई पोलिसांनी विशेष न्यायालयाकडे जामीन रद्द करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी काही मुद्दे मांडले असून, माध्यमांशी बोलताना नवनीत राणांनी केलेल्या टीकेतील काही विधानांवर बोट ठेवलं आहे.
मुंबई पोलिसांनी काय म्हटलंय?
मुंबई पोलिसांनी नवनीत राणा यांच्या काल माध्यमांशी झालेल्या संवादातील काही विधानांचा दाखला हा अर्ज करता दिला आहे. नवनीत राणांच्या पत्रकार परिषदेतील खालील मुद्दे पोलिसांनी अधोरेखित केले आहेत.
१) "हनुमान चालीसा वाचणे हा जर गुन्हा असेल, तर मी यासाठी १४ वर्षे तुरुंगात जायला तयार आहे."
२) "१४ दिवसच का? मी १४ वर्ष गजाआड राहायला तयार आहे. मी पुन्हा ताकदीने बाहेर येईन. मला गजाआड केल्याबद्दल देशातील रामभक्त आणि हनुमान भक्त तुम्हाला धडा शिकवतील."
३) "राम आणि हनुमानाच्या नावावर तुम्ही माझा छळ केला. राम आणि हनुमानाला विरोध करणाऱ्यांचं काय होतं, हे तुम्हाला जनता दाखवून देईल."
४) "तुम्हाला तुमच्या वडिलांमुळे हे पद मिळालं आहे. माझं तुम्हाला आव्हान आहे. जर तुमच्यात (मुख्यमंत्री उद्धव ठाकरे) हिंमत असेल, तर माझ्याविरोधात कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवा आणि जिंकून दाखवा. ते तुम्ही करणार नाही. एका महिलेची ताकद काय तुम्हाला दाखवून देईन."
५) "तुरुंग प्रशासनावर ठाकरेंनी दबाव टाकला. त्यामुळे तुरुंगात मला वाईट वागणूक दिली गेली. मला चटईवर झोपवलं आणि जेवणही दिलं नाही."
६) "तुरुंगात डांबल्यामुळे मी माघार घेईन असं त्यांना वाटतं. मी त्यांना आव्हान देते की, मुंबईतील लोक तुम्हाला मुंबई निवडणुकीमध्ये धडा शिकवतील."
७) "पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांच्याकडे यांची तक्रार करण्यासाठी मी दिल्लीला जात आहे. रामाचं आणि हनुमानाचं नाव घेण्यापासून ते मला रोखू शकत नाही. मी फूटपाथवर उभ राहून राम आणि हनुमानाचं पठण करेन."
८) "त्यांनी माझ्याविरुद्ध कारवाई केली म्हणून मी पराभूत झालेली नाही. ११ वर्षांपासून मी माझ्या पतीसोबत राहत आहे आणि त्यामुळे जेव्हा मी त्यांना भेटले तेव्हा भावूक झाले, पण तुरुंगातून बाहेर आल्यानंतर मी त्यांच्या (उद्धव ठाकरे) विरोधात खंबीरपणे उभी राहीन. त्यांनी माझ्यावर सूडाने कारवाई केली आहे. या सूडबुद्धीच्या कृतीविरोधात मी लढणार असून, याबाबत कुणीही शंका घेऊ नये. मी त्यांच्याविरुद्ध लढण्याबद्दल ठाम आहे."
९) "मुंबई सर्वजण त्यांच्या दबावाखाली काम करत आहेत. माझ्याविरुद्ध जी कारवाई केलीये, त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तक्रार करण्यासाठी आणि त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी मी दिल्लीला जात आहे."
"या प्रकरणावर आरोपींनी बोलण्यास मज्जाव करण्यात आला होता. या प्रकरणाशी संबंधित विषयावर प्रसारमाध्यमांशी बोलल्यास जामीन तात्काळ रद्द केला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. आदेशाचं उल्लंघन झाल्यानं आरोपींचा जामीन आपोआप रद्द होईल," असंही पोलिसांनी म्हटलेलं आहे.