
हनुमान चालीसा पठण प्रकरणामुळे तुरुंगात जावं लागलेल्या खासदार नवनीत राणा यांची १३व्या दिवशी सुटका झाली. नवनीत राणा यांना भायखळा तुरूंगातून सोडण्यात आलं. जामीनाची प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आज खासदार राणा तुरूंगातून बाहेर पडल्या.
हनुमान चालीसा पठण प्रकरणात अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्याचे पती तथा बडनेराचे आमदार रवी राणा यांना अटक करण्यात आली होती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचं आव्हान राणा दाम्पत्याने दिलं होतं. याच प्रकरणात त्यांच्या गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली होती.
दरम्यान, या प्रकरणात न्यायालयाने राणा दाम्पत्याला ६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर रवी राणा यांना तळोजा कारागृहात, तर नवनीत राणा यांना भायखळा येथील तुरूंगात नेण्यात आलं होतं.
नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काल जामीनाची प्रक्रिया पुर्ण करण्यात दिवस गेला. त्यानंतर आज त्यांची सुटका झाली. दुपारी दोन वाजेच्या सुमारास नवनीत राणा भायखळा तुरूंगातून बाहेर पडल्या.
त्यानंतर त्यांना आता लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे. नवनीत राणा यांना तपासणीसाठी लिलावती रुग्णालयात नेण्यात आलं आहे. तपासणी करून त्यांना सोडण्यात येणार आहे.
या अटींवर मिळालाय जामीन
नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांना जामीन देताना न्यायालयाने काही अटी घातलेल्या आहेत. तुरूंगातून बाहेर पडल्यानंतर राणा दाम्पत्याला या अटी पाळव्या लागणार आहेत. राणा दाम्पत्याला या प्रकरणावर माध्यमांशी बोलता येणार नाही.
त्याचबरोबर बाहेर आल्यानंतर पुराव्याशी छेडछाड करता येणार नाही. अशाच स्वरूपाचं कृत्ये पुन्हा करू नये. त्याचबरोबर राणा दाम्पत्याला तपासात पुर्ण सहकार्य करण्यास न्यायालयाने सांगितलं आहे. तपास अधिकाऱ्यांनाही राणांना तपासासाठी बोलवण्याआधी २४ तास आधी नोटीस द्यावी लागेल, असंही न्यायालयाने म्हटलं आहे.