बारामतीकर मुलीची फोर्ब्स मासिकाने घेतली दखल, जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे?

प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत समावेश, जाणून घ्या काय आहे आर्याचं काम की जगालाही घ्यायला लागली तिची दखल
बारामतीकर मुलीची फोर्ब्स मासिकाने घेतली दखल, जाणून घ्या कोण आहे आर्या तावरे?

राज्याच्या राजकारणात बारामतीला एक वेगळं स्थान आहे. सध्या पवार परिवारामुळे बारामतीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालं आहे. दरम्यान आणखी एका बारामतीकर मुलीने जगभरात आपला डंका वाजवत सर्वांना दखल घ्यायला भाग पाडलं आहे. मुळची बारामतीकर असलेल्या आर्या तावरे या तरुणीची जगप्रसिद्ध फोर्ब्स मासिकाने दखल घेतली असून जगातील प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या तीस जणांमध्ये आर्याला स्थान मिळालं आहे.

मुळची बारामतीकर असलेली आर्या सध्या लंडनमध्ये वास्तव्यास आहे. आर्याने आपलं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पुण्यात घेतलं. यानंतर पुढील शिक्षणासाठी ती लंडनला गेली. शिक्षणात हुशार असलेल्या आर्याला टेनिस खेळण्याचीही आवड आहे.

आर्या ही प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक कल्याण तावरे यांची कन्या आहे. कल्याण तावरे यांच्या पुण्यासह महाराष्ट्रात विविध ठिकाणी साईट्स सुरू आहेत. आर्याने लंडन विद्यापीठात अर्बन प्लॅनिंग अँड रिअल इस्टेट अँड फायनान्स हा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्या नंतर नोकरी करताना तेथील बांधकाम व्यावसायिकांना निधी उभारणीसाठी ज्या अडचणी येत होत्या त्याचा अभ्यास करत आर्या हिने स्वतःची स्टार्ट अप कंपनी सुरु करण्याचा निर्णय घेतला. नव उद्योजकांना उद्योग सुरू करताना सुरुवातीला तिला निधी उभा करण्यात अडचण निर्माण झाली. परंतु आर्याने निधी उभारणीची अडचण दूर करण्यासाठी क्राऊड फंडींगचा वापर करत यश मिळवले. फ्यूचरब्रीक या नावाने तिने कंपनी सुरु करुन बांधकाम व्यवसायातील विविध अडचणी दूर करण्याचा प्रयत्न केला. आज तिच्या हाताखाली ब्रिटीश लोक काम करतात ही अभिमानास्पद बाब आहे.

युरोपमधील तीस वर्षांखाली प्रभावशाली पहिल्या तीस व्यक्तींमध्ये आर्याला स्थान मिळाले आहे, ही बाब अभिमानास्पद आहे. याआधी देखील आर्याला ब्रिटिश सरकारकडून स्टार्टअपसाठी दिला जाणारा 25 वयोगटातील पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, आर्याने मिळवलेल्या यशाबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील तिचे कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.