
मुंबईच्या गोरेगाव भागात राहणाऱ्या एका महिलेच्या बाबतीत एक धक्कादायक प्रसंग घडला आहे. सीएसएमटी रेल्वे स्थानकावर ज्या आरोपीने महिलेची छेड काढली होती. तोच आरोपी तीन महिन्यांनी पीडित महिलेला पुन्हा दिसला. यावेळी प्रसंगावधान राखत महिलेने आपल्या पतीला आणि पोलिसांना याची माहिती देत आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.
काय घडलं होतं तीन महिन्यांपूर्वी?
14 जानेवारीला सदर पीडित महिला सीएसएमटी रेल्वे स्थानकात लांब पल्ल्याच्या गाडीचं तिकीट बूक करण्यासाठी गेली होती. गोरेगावला राहणाऱ्या या महिलेला त्यावेळी कन्फर्म तिकीट न मिळाल्यामुळे ती स्टेशनवर थांबली होती. यावेळी तिच्यावर नजर ठेवून असलेल्या आरोपीने महिलेला मी तुम्हाला कन्फर्म तिकीट मिळवून देतो म्हणत तिचा विश्वास संपादन केला.
टॅक्सीमध्ये आरोपीकडून महिलेचा विनयभंग -
यानंतर आरोपीने महिलेला टॅक्सीतून घेऊन जात असताना तिच्यावर बळजबरी करत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. परंतू यावेळी सावध असलेल्या महिलेने आरडाओरड केल्यामुळे टॅक्सीचालकाने गाडी मध्येच थांबवली. यावेळी आरोपीने घटनास्थळावरुन तात्काळ पळ काढला.
तीन महिन्यांनी तोच आरोपी त्याच ठिकाणावर पुन्हा दिसला -
या प्रकरणात गुरुवारी पीडित महिला सीएसएमटी स्थानकात काही कामासाठी गेली असताना तिला हा आरोपी पुन्हा नजरेत पडला. यावेळी पीडित महिलेने आपल्या पतीला याची माहिती देत त्याला सीएसएमटी स्थानकात बोलवून घेतलं. याचवेळी पीडित महिलेने पोलिसांना याची माहिती देत आरोपीला अटक करवून घेतली.
पोलिसांनी या प्रकरणात विश्वजीत दास (वय 52) राहणार नालासोपारा या आरोपीला अटक केली असल्याची माहिती सीएसएमटी रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेहबूब अब्बास इनामदार यांनी दिली.