
महाराष्ट्रात दिवसभरात 1045 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात कोरोनामुळे एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 517 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत राज्यात 77 लाख 36 हजार 792 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा सध्या 98.07 टक्के आहे.
राज्यात एका मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याच्या मृत्यू दर 1.87 टक्के इतका झाला आहे. आत्तापर्यंत पाठवण्यात आलेल्या 8 कोटी 9 लाख 77 हजार 908 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 78 लाख 89 हजार 212 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात आज घडीला 4 हजार 559 सक्रिय रूग्ण आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी राज्यात 1 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
महाराष्ट्रात आणि मुंबईत कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढते आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने खबरदारीची पावलं उचलण्यास सुरूवात केली आहे. राज्यातलं लसीकरण मोठ्या प्रमाणावर पूर्ण झालं आहे. अशात टास्क फोर्ससोबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बैठक सुरू आहे.
आज अजित पवार यांनी मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं आहे की सध्या राज्यात रूग्णांची संख्या वाढते आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्हाला डॉ. व्यास सगळ्या प्रकारची माहिती देतात. राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये काय चाललं आहे हे आम्हाला सांगतात तसंच जगात काय चाललं आहे तेदेखील व्यास सांगत असतात. या सर्व माहितीतून आम्हाला हे कळलं आहे की राज्यात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. मात्र व्हेंटिलेटर, ऑक्सिजन बेडवर असलेल्या रूग्णांची संख्या फारच कमी आहे.
मास्क सक्तीविषयी पुन्हा विचार करावाच लागेल. काही राजकारणी मास्क लावत नव्हते त्यांना पुन्हा कोरोना झाला असंही अजितदादांनी म्हटलं आहे. अजित पवार यांनी नाव न घेता राज ठाकरेंना हा टोला लगावला. तसंच गरज पडली तर राज्यात पुन्हा मास्क सक्ती होऊ शकते असेही संकेत दिले आहेत.
मुंबईत आणि महाराष्ट्रात कोरोना रूग्णांची संख्या वाढते आहे. गेल्या आठवड्यात मुंबईत कोरोना रूग्ण वाढले. बुधवारी मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या 700 च्या पुढे गेली होती. तर महाराष्ट्रात फेब्रुवारी महिन्यात पहिल्यांदाच एक हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळले होते. त्यानंतर आज दुसऱ्या दिवशी रूग्णांची संख्या एक हजारांच्या पुढे गेली आहे.