26/11 : ज्या दिवशी मुंबईने पाहिला दहशतवादाचा कहर आणि मृत्यूचं तांडव

26/11 : ज्या दिवशी मुंबईने पाहिला दहशतवादाचा कहर आणि मृत्यूचं तांडव

देशातल्या सर्वात मोठ्या हल्ल्याची 13 वर्षे पूर्ण

26/11 चा दहशतवादी हल्ला हा मुंबईच्या इतिहासातला एक सर्वात भयंकर आणि भीषण असा दहशतवादी हल्ला होता. या हल्ल्याला 13 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र या हल्ल्याच्या मुंबईकरांच्या मनातल्या आठवणी या आजही ठसठसत आहेत. सगळ्या देशाला या महाभयंकर हल्ल्याने हादरवून टाकलं होतं. दहशतवादी संघटना असलेल्या लष्कर-ए-तोयबाच्या 10 दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. देशाच्या आर्थिक राजधानीला म्हणजेच मुंबईला या सगळ्यांनी लक्ष्य केलं. हा हल्ला आणि त्याच्या काळ्या आठवणी अजूनही देशातल्या नागरिकांच्या मनात कायम आहेत.

काय घडलं होतं 26 नोव्हेंबर 2008 ला?

26 नोव्हेंबर 2008 ची संध्याकाळ होती. मुंबईने आपला वेग काहीसा मंदावत धुंद होण्यास सुरूवात केली होती. तेवढ्यात शहरातल्या एका भागातून गोळ्या चालवल्याचा आवाज येऊ लागला. दहशतवाद्यांनी त्यांच्या मनसुब्यांना आकार देण्यास केलेली ही सुरूवात होती. मुंबईतल्या लिओपोल्ड कॅफे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणी दहशतवाद्यांनी गोळीबाराला सुरूवात केली. नेमकं काय घडतं आहे याचा अंदाज कुणालाच आला नव्हता.

मात्र त्यानंतर मुंबईतल्या विविध ठिकाणाहून गोळीबार आणि स्फोट यांच्या बातम्या येऊ लागल्या. 26 नोव्हेंबरची रात्र ही मुंबईसाठी काळरात्र ठरली. कारण या दिवशी दहशतावादाचा थरार आणि मृत्यूंचं तांडव या शहराने पाहिलं.

मुंबईतलं सर्वात गर्दीने गजबजलेलं स्टेशन म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन. या ठिकाणी सामान्य माणसं होती. घरी परतणाऱ्या लोकांना आपल्यासोबत काय घडणार आहे याची कल्पनाही नव्हती. दहशतावादी या ठिकाणी अक्षरशः रक्ताची होळी खेळले. दोन दहशतावद्यां या ठिकाणी पोहचून अंदाधुंद गोळीबार केला. तसंच हँड ग्रेनेडही फेकले. ज्यामुळे 58 निरपराध प्रवाशांना त्यांना प्राण गमावावा लागला. तसंच गोळीबार झाल्याने जी गर्दी आणि धक्काबुक्की झाली त्यामध्येही अनेकजण जखमी झाले. अजमल आमिर कसाब आणि इस्माईल खान या दोन दहशतवाद्यांनी या ठिकाणी हा हल्ला केला होता.

छत्रपती शिवाजी टर्मिनस, ताजमहाल हॉटेल, ओबेरॉय हॉटेल, लिओपोल्ड कॅफे, कामा हॉस्पिटल आणि दक्षिण मुंबईतल्या इतर काही भागांमध्ये हल्ले सुरू झाले. चार ठिकाणी चकमकी सुरू होत्या. पोलीस तर दहशतवाद्यांचा नायनाट करण्यासाठी पुढे सरसावलेच. पण निमलष्करी दलही पोलिसांच्या मदतीला धावून आलं. एकाचवेळी एवढ्या ठिकाणी इतके हल्ले होतील याची कल्पनाच कुणी केली नव्हती. तसंच दहशतवादी नेमके किती आहेत आणि त्यांनी काय काय लक्ष्य केलं आहे हेदेखील सुरूवातीला कुणाला ठाऊक नव्हतं.

26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईची शान असलेलं ताजमहाल हॉटेलही दहशतवाद्यांनी ताब्यात घेतलं होतं. या ठिकाणी उतरलेल्या अनेक पाहुण्यांना दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलं होतं. ज्यामध्ये सात विदेशी नागरिकांचा समावेश होता. ताज हॉटेलच्या हेरिटेज विंगमध्येही दहशतवाद्यांनी आग लावली. त्यामुळे दुरुनही दिसणाऱ्या ताज हॉटेलच्या घुमटातून त्यादिवशी धुराचे लोट, आगीचे लोळ आणि किंकाळ्या हेच ऐकू येत होतं. संध्याकाळ ते रात्र या कालावधीत मुंबई दहा दहशतवाद्यांनी ग्रासली.

मग उजाडला दुसरा दिवस अर्थातच 27 नोव्हेंबर. या दिवशी एनसजी कमांडो दहशतवाद्यांचा सामना कऱण्यासाठी त्यांचा बिमोड करण्यासाठी पोहचले. सर्वात आधी ओबेरॉय हॉटेलमध्ये ज्या लोकांना ओलीस ठेवण्यात आलं होतं त्याचं सुटका करण्यात आली. एनसजी कमांडोंनी ओबेरॉय हॉटेलच्या ठिकाणी हाती घेतलेली मोहीम 28 नोव्हेंबरच्या दुपारी संपली. त्यादिवशी संध्याकाळपर्यंत नरीमन हाऊस या ठिकाणी असलेले दहशतवादीही मारले गेले होते. मात्र ताज महाल हॉटेलमध्ये जी धुमश्चक्री सुरू होती त्यातून बाहेर पडण्यासाठी आणि दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी 29 नोव्हेंबरची सकाळ उजाडली.

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर रक्ताची होळी खेळणारा दहशतवादी अजमल आमिर कसाब याला ताडदेव या ठिकाणाहून जिवंत पकडण्यात पोलिसांना यश आलं. मात्र त्याला पकडत असताना कॉन्स्टेबल तुकाराम ओंबळे हे मात्र शहीद झाले. त्यांनी गोळ्या झेलल्या पण कसाबला सोडलं नाही त्यामुळेच तो पकडला गेला. कसाबला अटक केल्यानंतर आणि त्याची चौकशी झाल्यानंतर त्याने त्याच्या साथीदारांची नावं सांगितली, कट कसा रचला, त्याचं ट्रेनिंग कसं मिळालं? हे सगळं सांगितलं. कसाबवर पुढे खटला भरवण्यात आला. जो चार वर्षे चालला. 21 नोव्हेंबर 2012 ला कसाबला फाशी देण्यात आली.

मुंबईवर झालेला हा आजवरचा सर्वात भयंकर असा हल्ला होता. दहा दहशतवाद्यांनी मुंबईला वेठीस धरलं होतं. 29 नोव्हेंबरच्या सकाळपर्यंत दहशतवाद्यांनी मुंबईत त्यांची दहशत पसरवली होती. कसाब पकडला गेल्याने या हल्ल्यात एकूण दहा दहशतवादी होते आणि त्यांना पाकिस्तानात ट्रेनिंग देण्यात आलं होतं हे स्पष्ट झालं. 26 नोव्हेंबर 2008 ला समुद्री मार्गाने कसाब आणि त्याचे साथीदार मुंबईत आले होते. पोलिसांना या प्रकरणात वापरण्यात आलेली बोटही सापडली होती ती अर्धवट जळालेल्या अवस्थेत होती.

मुंबईवर जेव्हा हल्ला करण्यात आला तेव्हा पोलिसांची व्हॅन घेऊनही दहशतवादी पळाले होते. या व्हॅनमधून ते रस्त्यावरच्या लोकांवर गोळ्या चालवत होते. एका टीव्ही चॅनलच्या कॅमेरामनच्या हातालाही दहशतवाद्याची गोळी लागली होती. त्यानंतर हे दहशतवादी कामा रूग्णालयात घुसले होते. या अतिरेक्यांशी दोन हात करतानाच एटीएसचे चीफ हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे आणि विजय साळस्कर हे तिघे शहीद झाले. तर कसाबला पकडताना तुकाराम ओंबळे शहीद झाले. देशाच्या राजधानीवर झालेला हा हल्ला आजवरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला ठरला. त्यानंतर या दहशतावद्यांचा बिमोड करण्यासाठी 200 एनएसजी कमांडो आणि लष्कराचे 50 कमांडो मुंबईत आले होते. तसंच लष्कराच्या पाच तुकड्याही तैनात करण्यात आल्या होत्या आणि नौदललाही अलर्ट कऱण्यात आलं होतं.

मुंबईवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा मुकाबला करताना मुंबई पोलीस, एटीएस आणि एनएसजीचे 11 जण शहीद झाले. एनएसजी कमांडो मेजर संदीप उन्नीकृष्णन, एटीएस प्रमुख हेमंत करकरे, एसीपी अशोक कामटे, एसीपी सदानंद दाते, एन्काऊंटर स्पेशालिस्ट विजय साळसरक, पोलीस निरीक्षक सुशांत शिंदे, एसआय प्रकाश मोरे, एसआय दुदगुडे, एसआय नानासाहेब भोसले, एसआय तुकाराम ओंबळे, कॉन्टेबल विजय खांडेकर, जयवंत पाटील, योगेश पाटील, अंबादास पवार आणि एम. सी. चौधरी हेदेखील शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्यात 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला तर 300 पेक्षा जास्त लोक मारले गेले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in