
भारतात 2016 मध्ये demonetization अर्थात नोटबंदी झाली तेव्हा RBI अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2 हजारांची नोट चलनात आणली होती. या नोटा 2017-18 या वर्षात 33 हजार 630 लाख एवढ्या उच्चांकी प्रमाणात छापण्यात आल्या. त्यांचं मूल्य 6.72 लाख कोटी इतकं होतं. मात्र मार्च महिन्यातल्या संख्येप्रमाणे दोन हजारांच्या 24 हजार 510 लाख नोटा सिस्टिमध्ये होत्या. ज्यांचं मूल्य 4.90 लाख कोटी इतकं होतं.
याचाच अर्थ 2 हजारांच्या नोटा सुमारे 27 टक्के कमी झाल्या. या 27 टक्के नोटांची संख्या 9 हजार 120 लाख इतकी आहे. ज्यांचं मूल्य सुमारे 1.82 लाख कोटी आहे त्या आता चलनात नाहीत ही बाब समोर आली आहे. या नोटांचं झालं तरी काय? याचं उत्तर RBI कडेही नाही.
दोन हजारांच्या या सगळ्या नोटांचं काय झालं?
RBI ने दिलेल्या नुकत्याच दिलेल्या अहवालात या परत न आलेल्या नोटांचं काय झालं? याबाबत काहीही भाष्य केलेलं नाही. तसंच आरबीआयने आता दोन हजारांच्या नव्या नोटा छापणंही बंद केलं आहे. कारण या सर्वाधिक मूल्य असलेल्या नोटा चलनात परत आलेल्या नाहीत. अनेक लोकांना ATM मध्येही दोन हजारांच्या नोटा सहजरित्या उपलब्ध होत नाहीयेत. त्यामुळे अशी दाट शक्यता आहे की या सगळ्या नोटांचं रूपांतर काळ्या पैशांमध्ये झालं आहे. याचं कारण दोन हजार रूपये हे नोटेचं असलेलं सर्वाधिक मूल्य हेच आहे.
जेव्हा नोटबंदी झाली तेव्हाही जो काळा पैसा बाहेर येईल अशी चर्चा होती त्यातली सुमारे 5 लाख कोटीचं काळं धन बाहेर आलंच नाही असं अर्थविषयक तज्ज्ञांनी सांगितलं आहे. या नोटांबाबतही वार्षिक अहवालात काहीही नमूद करण्यात आलेलं नव्हतं. गेल्या काही वर्षांमध्ये पैशांचं चलनवलन हे साधारणतः 12 टक्के वाढलं आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे RBI ने 2 हजारापेक्षा कमी मूल्य असलेल्या नोटा म्हणजेच 500, 200 आणि 100 च्या नोटा जास्त प्रमाणात छापल्या.
RBI च्या अहवालानुसार बँकेच्या चलनी नोटांचं मूल्य आणि प्रमाण हे अनुक्रमे 16.8 टक्के आणि 7.2 टक्के वाढलं आहे. 2020-21 या वर्षात हे प्रमाण 14.7 टक्के आणि 6.6 टक्के वाढलं आहे. वर दिलेली टक्केवारी 2019-20 या वर्षातली आहे. 500 आणि 2000 रूपयांच्या चलनात एकत्रित रित्या झालेली वाढ 31 मार्च 2021 ला 85.7 टक्के इतकी होती. तर 31 मार्च 2020 ला हे प्रमाण 83.4 टक्के इतकं होतं.
याचाच स्पष्ट अर्थ हा होतो की 500 च्या नोटांनी 2 हजार रूपयांच्या नोटांची जागा घेतली. 500 च्या नोटांचं प्रमाण लक्षात घेतलं तर त्यामध्ये 31.1 टक्के एवढा मोठा वाटा होता.