Solapur: सासूच्या पार्थिवाला सुनांनी दिला खांदा, समाजासमोर ठेवला नवा आदर्श

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विजयकुमार बाबर, सोलापूर

सासू आणि सुनांमधले वाद ही गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली अशीच आहे. अनेकदा हे वाद घरापासून थेट पोलीस ठाणे आणि कोर्टापर्यंत गेल्याचं देखील आपण पाहिलं आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीत मुलीप्रमाणे सुना आणि आई प्रमाणे सासू असं नातं देखील जपलं जातं. असंच नातं सोलापुरातील मुंढे कुटूंबात होतं.

या घरातील सासू-सुनांच्या नात्याचा आदर्श समाजाने घेण्यासारखा होता. पण मायेच्या एका धाग्यात ओवलेल्या मुंढे कुटुंबाची माळ काल तुटली. कारण त्यांच्या प्रेमळ सासूबाई ह्या माळेतून निखळल्या.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

यावेळी सगळ्यात बोलकं दृश्य तेव्हा पाहायला मिळालं जेव्हा सासूबाईंच्या पार्थिवाला चारही सुनांनी खांदा दिला. परंपरेला छेदणारा सासू-सुनांच्या नात्यातील हा प्रत्यय सर्वांसमोर दिशादर्शक ठरला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मळेगाव येथील दमयंती कारभारी मुंढे यांचे वयाच्या 70व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. अध्यात्माची आवड असलेल्या दमयंती यांनी आयुष्यात देवधर्मासोबतच तत्व आणि मूल्यांचही पालन केलं. त्यांनी आपल्या चारही सुना अनिता, वैशाली, अर्चना आणि मनोरमा मुंढे यांना कायम मुलींप्रेमाणे प्रेम अन् माया दिली. या सुनांनीही कधी सासूबाईंचा शब्द खाली पडू दिला नाही की, शब्दाने कधी दुखावले नाही.

ADVERTISEMENT

वृद्धापकाळाकडे झुकलेल्या दमयंती यांना प्रत्येक गोष्ट जिथल्या तिथे आणि जेव्हाच्या तेव्हा अगदी मागण्याअगोदर हजर असे. त्यातही चौघींपैकी कधी कोणी ‘तू-मी’असे केले नाही. त्यांच्यातले नाते म्हणजे सासू-सून नाही तर आई-मुलीप्रेमाणेच फुलत गेले आणि शेवटपर्यंत टिकलेही.

ADVERTISEMENT

दरम्यान, त्यांच्या जाण्यामुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. गुरुवारी दुपारी जेव्हा अंत्ययात्रा निघाली त्यावेळी प्रेताला खांदा देण्यासाठी सुना पुढे आल्या. दमयंती यांचे भाऊ चंद्रकांत, हरिश्‍चंद्र आणि संभाजी तर मुले यशवंत,जयवंत, गुणवंत, बळवंत यांनी देखील खांदा दिला. दमयंती यांचे पती कारभारी मुंढे हे स्वतः शिक्षक होते. त्यांनी देखील या बदलास संमती दिली.

स्वतः दमयंती या 1990 ते 95 ह्या काळात पंचायत समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत होत्या. याशिवाय संपूर्ण राज्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानातून आपल्या गावाची स्वतंत्र ओळख निर्माण करणाऱ्या तत्कालीन सरपंच गुणवंत मुंढे यांच्या त्या मातोश्री होत्या.

आजारी पत्नीचा सांभाळ करण्यात हयगय, सासऱ्याने सुन आणि पत्नीला संपवलं

ज्या सासू-सुनांच्या भांडणांचे भांडवल करून टीव्ही मालिका जोमात चालतात त्यांचे अनुकरण करुन आपल्या घरातील वातावरण बिघडवतात अशा सासू-सुनांच्या डोळ्यात मुंढे कुंटुबी झणझणीत अंजन घातले आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT