Corona : 24 तासात मुंबईतल्या 71 पोलिसांना कोरोना संसर्ग

Corona : 24 तासात मुंबईतल्या 71 पोलिसांना कोरोना संसर्ग
प्रातिनिधीक छायाचित्र

मुंबईतल्या 71 पोलिसांना गेल्या चोवीस तासात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तिसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी सुरू असताना आणि तिसऱी लाट येण्यापासून रोखण्याचे प्रयत्न सुरू असतानाच ही घटना घडली आहे. मुंबईत रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. अशात आता 71 पोलिसांनाही कोरोना संसर्ग झाला आहे.

पोलिसांमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा पसरू लागला आहे, 71 पोलिसांना कोरोना झाला आहे याची आपल्याला कल्पना आहे असं राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. तसंच या सगळ्यांनी योग्य औषधोपचार घ्यावेत आणि स्वतःला जपावं असंही आवाहन त्यांनी केलं आहे.

55 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वय असलेल्या पोलिसांनी कामावर येऊ नये असं आम्ही सांगितलं आहे. ते घरून काम करू शकतात. अशा पोलिसांना आम्ही Work From Home ची मुभा दिली आहे. अद्याप राज्यात तिसरी लाट आलेली नाही. मात्र आत्तापासूनच आम्ही पोलिसांना काळजी घेण्याचं आवाहन करतो आहोत. त्यांना सर्व वैद्यकीय सुविधाही पुरवल्या जातील असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबई तकला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत म्हणजेच 6 जानेवारी 2022 पर्यंत 9510 पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना कोरोना झाला आहे.

प्रातिनिधीक छायाचित्र
Cordelia Cruise: क्रूझवरील तब्बल 209 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, 832 जणांचा रिपोर्ट येणं अद्यापही बाकी

कोरोना संसर्गाचं प्रमाण वाढतं आहे तसंच मुंबईतही रूग्ण वाढत आहेत. यावेळी ओमिक्रॉन या व्हेरिएंटचाही धोका आहे. अशात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही काय निर्णय घेतील याकडेही आमचं लक्ष आहे असंही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं आहे. आरोग्य विभाग, कोव्हिड टास्क फोर्स यांच्याशी सद्यस्थितीबाबत चर्चा करून त्यानंतर ते निर्णय घेतील असंही कळतं आहे.

मुंबईत बुधवारी 15 हजार 166 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत कोरोना रूग्ण संख्या चांगलीच वाढली आहे हे दिसून येतं आहे. बुधवारी 1218 रूग्णांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आज दिवसभरात 714 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी तीन मृत्यूंची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत मुंबईत एकूण 16 हजार 384 मृत्यू झाले आहेत. मुंबईतील रूग्ण दुप्पटीचा दर 89 दिवसांवर आला आहे. मुंबईचा कोव्हिड रूग्ण बरे होण्याचा दर अर्थात रिकव्हरी रेट हा 90 टक्के आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in