'NCB नेच तिथे ड्रग्ज ठेवले, CCTV मध्ये दिसेल' आर्यन खानचा मित्र अरबाझ मर्चंटचा आरोप

'NCB नेच तिथे ड्रग्ज ठेवले, CCTV मध्ये दिसेल' आर्यन खानचा मित्र अरबाझ मर्चंटचा आरोप

ड्रग्ज पार्टीचं प्रकरण सध्या राज्यभर गाजतं आहे. मुंबईतल्या क्रूझवर टाकण्यात आलेल्या NCB च्या छाप्यात ड्रग्ज पार्टी प्रकरणी आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट या दोघांसह आठ जणांना अटक करण्यात आली आहे. अशात आता अरबाझ मर्चंट याने जामिनासाठी अर्ज केला असून एनसीबीनेच क्रूझवर ड्रग्ज ठेवले असा आरोप केला आहे. एवढंच नाही तर सीसीटीव्ही फुटेज तपासा त्यात ही बाब दिसून येईल असंही सांगितलं आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अरबाझ मर्चंटनं बुधवारी जामिनासाठी अर्ज केला आहे. मात्र, त्यासोबतच अरबाझने मुंबई पोर्ट ट्रस्टमधील इंटरनॅशनल टर्मिनलच्या ग्रीन गेटवरचं CCTV फुटेज देण्याची देखील मागणी केली आहे. 2 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजून 30 मिनिटांपासून रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंतचं सीसीटीव्ही फूटेज मिळावं, अशी मागणी अरबाझ मर्चंटनं केली आहे. तसेच, सीआयएसएफनं त्याची एक कॉपी ठेवावी, असं देखील अरबाझ मर्चंट म्हणाला आहे.

अतिरिक्त न्यायदंडाधिकारी आर. एम. नारळीकर यांनी एनसीबीला सीसीटीव्ही फुटेजसंदर्भात नोटीस पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. अरबाझ मर्चंटनं आपल्या याचिकेमध्ये म्हटलंय की, 'सीसीटीव्हीमधून हे दिसून येईल की प्रवेश करताना माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाहीत आणि ते एनसीबीनंच तिथे प्लांट केले होते'

ड्रग्स पार्टीच्या छाप्याची Inside Story

एनसीबीनं एक निवेदन जारी करत संपूर्ण कार्यवाहीची माहिती दिली आहे. दोन ऑक्टोबरला कार्डेलिया क्रूझवर छापा टाकण्यात आला. क्रूझवरील सर्वांची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ हस्तगत करण्यात आले. चरस, कोकेन, एमडीएमए ड्रग्ज टॅब्लेट्स आणि एमडी ड्रग्स यावेळी सापडले आहेत.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे या क्रूझ पार्टीची एनसीबीला 15 दिवसांपूर्वीच माहिती मिळाली होती. एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांनी सांगितलं, की क्रूझ पार्टीबद्दल शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि जहाजबांधणी मंत्रालयाला सविस्तर अहवाल दिला जाईल. या पार्टीबद्दल आम्हाला 15 दिवसांपूर्वीच गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानंतरच आम्ही ऑपरेशन सुरू केलं.

एनसीबीचे 22 अधिकारी प्रवाशी बनून क्रूझवर गेले. त्यावेळी क्रूझवर 1800 लोक होते. त्यामधूनच अंमली पदार्थ प्रकरणात 8 लोकांना आम्ही शोधून काढलं.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यावेळी, काही जणांकडून ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे. या सर्वांनी अत्यंत हुशारीने ड्रग्स आपल्यासोबत आणलं होतं. काही जणांनी हे ड्रग्स आपल्या चप्पल, शर्टची कॉलर, ब्लेट, बॅगेतील हँडल यामध्ये लपवून आणलं होतं. तर काही जणांनी आपल्या अंतर्वस्त्रात देखील ड्रग्स लपवून आणलं होतं.

Related Stories

No stories found.