
जगातले सर्वात श्रीमंत व्यावसायिक असा लौकिक असणाऱ्या एलॉन मस्क यांनी नुकतीच ट्विटरची खरेदी केली आहे. ४४ अरब डॉलर्समध्ये त्यांनी ट्विटर खरेदी केलं आहे. ही डील आता शेवटच्या टप्प्यात आहे. त्यासंबधीची प्रक्रिया सुरूच आहे. अशात समजा कुठल्याही कारणाने ही डील होऊ शकली नाही तर काय कराल हा सल्ला त्यांना अदर पूनावाला यांनी दिला आहे. सिरम इन्स्टिट्युटचे अदर पूनावाला यांचा हा सल्ला सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो आहे.
जगभरातली सर्वात मोठी व्हॅक्सिन उत्पादन कंपनी सिरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पूनावाला यांनी एलन मस्क यांना गुंतवणुकीसाठी नवा पर्याय दिला आहे. अदर पूनावाला यांनी एलॉन मस्क यांना उद्देशून केलेलं ट्विट चांगलंच चर्चेत आहे.
काय म्हणतात अदर पूनावाला?
"एलॉन मस्क तुम्ही ट्विटर खरेदी केलं आहे, त्या डीलचा शेवटचा टप्पा सुरू आहे. मात्र काही कारणाने ते पूर्ण होऊ शकलं नाही तर त्या गुंतवणुकीचा काही हिस्सा तुम्ही भारतात गुंतवू शकता. तुम्ही भारतात Tesla Cars ची एक भली मोठी आणि हाय क्वालिटी फॅक्टरी उभारू शकता. मी तुम्हाला हे अत्यंत विश्वासपूर्वक सांगू शकतो की जर तुम्ही असं केलं तर ही तुमच्या आयुष्यातली सर्वात चांगली गुंतवणूक असेल."
भारतात टेस्ला कार निर्मिती करण्यासंबंधी सरकार आणि एलॉन मस्क यांच्यात चर्चा सुरू आहे. भारतात इलेक्ट्रिक कारची बाजारपेठ वाढत असूनही एलॉन मस्क हे टेस्ला कार लाँच करू शकत नाहीत. एलॉन मस्क यांना भारतात टेस्लाची फॅक्टरी उभारण्याआधी सरकारकडून तयार करण्यात आलेल्या कार्स भारतात आणण्यासाठी आयात करात सूट हवी आहे. मात्र सरकारने हे स्पष्ट केलं आहे टेस्लाला कार विकायची असेल तर त्यांना या ठिकाणी फॅक्टरी लावावी लागेल. त्यासाठी ते सरकारच्या PLI योजनेचाही लाभ घेऊ शकतात.
या सगळ्या प्रकारानंतर भारत सरकारसोबत येणाऱ्या अडचणींविषयी एक ट्विट एलॉन मस्क यांनी केलं होतं. त्यानंतर काही राज्य सरकारांनी त्यांना आमच्या राज्यात प्लांट सुरू करा असं सांगितलं होतं. त्यामध्ये पश्चिम बंगाल, तेलंगण, पंजाब, तामिळनाडू आणि महाराष्ट्र या राज्यांचा समावेश आहे.