
मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी खूपच संताप व्यक्त केला आहे. एवढंच नव्हे तर या हल्ल्यानंतर फडणवीसांनी केंद्रीय गृहसचिव अजय कुमार भल्ला यांना थेट पत्र लिहून राज्यात अराजकता माजली असल्याचं म्हणत ठाकरे सरकारची एक प्रकारे तक्रारच केली आहे.
पाहा देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय गृह सचिवांना लिहलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?'
अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना खार, मुंबई पोलिसांनी हनुमान चालीसा पठणावरुन 23 एप्रिल 2022 रोजी अटक करण्यात आली आहे.
खासदार आणि आमदार राणा दाम्पत्याची चौकशी करण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेलेल्या भाजपच्या माजी खासदार किरीट सोमय्या हे पोलिसांना सूचना देऊन जेव्हा भेटण्यासाठी गेले तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला.
शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडीवर बाटल्या फेकल्या तसेच जोरदार दगडफेक देखील केली. ज्यामध्ये त्यांच्या गाडीच्या काच्या फुटल्या आणि ते जखमी झाले.
खरं तर किरीट सोमय्या यांनी पोलिसांना आधी माहिती दिली होती की, ते खार पोलीस स्टेशनमध्ये खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी येत आहेत. जेव्हा नवनीत राणा यांची भेट घेऊन सोमय्या बाहेर पडत होते तेव्हा त्यांनी पोलिसांना सांगितलं देखील की, शिवसैनिकांकडून त्यांच्यावर हल्ला होणार आहे.
त्यामुळे पोलीस स्टेशनच्या बाहेरुन सर्वात आधी गर्दी हटविण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली होती. पण पोलिसांनी गर्दी हटवली नाही. त्यामुळेच त्यांच्यावर हल्ला झाला. पोलिसांच्या उपस्थितीत आणि पोलीस स्टेशन परिसरातच असा हल्ला होणं हा अतिशय गंभीर प्रकार आहे.
या घटनेमुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेबाबत गंभीर सवाल उपस्थित केले जात आहेत. मुंबई पोलिसांच्या आडून ही सरळसरळ गुंडागर्दी आहे. किरीट सोमय्या यांना केंद्राकडून झेड सुरक्षा पुरविण्यात आली आहे. त्यानंतर देखील त्यांच्या सुरक्षेबाबत महाराष्ट्रा तथा मुंबई पोलीस गंभीर नाहीत. त्यांच्यावर झालेला हा तिसरा हल्ला आहे.
मुंबई पोलीस देशातील सर्वात उत्कृष्ट पोलीस दल असूनही ते महाविकास आघाडी (MVA) सरकारचे नोकर असल्याप्रमाणे काम करत आहेत. मुंबई पोलिसांनी आतापर्यंत या घटनेची गंभीरपणे नोंद घेतलेली नाही. असं करुन मुंबई पोलिसांनी अप्रत्यक्षपणे सोमय्या यांच्यावरील हल्ल्याचे समर्थनच केलं आहे. हल्लेखोरांविरुद्ध कोणतीही कारवाई करु नये यासाठी राजकीय दबाव त्यांच्यावर आहे.
महाराष्ट्रातील बिघडलेली कायदा-सुव्यवस्था, विरोधी पक्षाच्या मूलभूत अधिकारांचं हनन आणि अराजकता ही एकूण परिस्थिती पाहता या प्रकरणाची गंभीरपणे नोंद घेऊन आपण कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत आहोत.
अशी तक्रार देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे केंद्रीय गृह सचिवांकडे केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी गृह सचिव अजय भल्ला नेमकी काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.