
मुंबई: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पाडवा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या भाषणातून महाविकास आघाडीवर तुफान टीका केली. याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर मात्र घणाघाती शब्दात टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण केला गेला. असा थेट आरोपच राज ठाकरे यांनी केला आहे.
पाहा राज ठाकरे नेमकं काय म्हणाले:
'आपण जातीपातीमध्ये गुंतून पडणं हेच शरद पवारांना हवं आहे'
'अयोध्येला जाणार आहात की नाही जाणार आहात... जाणार. आता तारीख सांगत नाही. जातीपातीमध्ये गुंतून पडणार असू, तर कुठलं हिंदुत्व घेऊन बसलोय आपण. हिंदू हा हिंदू-मुस्लिम दंगलीत हिंदू होतो. चीनने आक्रमण केलं की त्याला कळतच नाही की, आपण कोण आहोत. तो ज्यावेळी मराठी होतो, त्यावेळी तो पंजाबी, तामिळी, गुजराती... ज्यावेळी तो मराठी होतो. त्यावेळी मराठा, ब्राह्मण, कोळी, आगरी... काही लोकांना ही गोष्ट हवी आहे. शरद पवारांना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला ही गोष्ट हवी आहे.' असा थेट आरोप राज ठाकरे यांनी केला आहे.
'राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर जाती-जातीबद्दल द्वेष निर्माण झाला'
'राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू झालं. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष निर्माण केला गेला.'
'इथे बाबासाहेब पुरंदरे सॉफ्ट टार्गेट. आम्ही इतिहास वाचतच नाहीये. ज्या शिवरायांनी एक व्हा असं सांगितलं. त्याच महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण सुरू आहे. जातीतून बाहेर पडणार नाही, तर हिंदू कधी होणार.' असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवार यांच्यावर थेट निशाणा साधला.
'जाणूनबुजून राजकारण तापवलं जातं'
'अनिल शिदोरे उत्तर प्रदेशात गेले होते. ते एका ढाब्यावर थांबले होते, तिथे त्यांना विचारलं गेलं की कोणत्या जातीतील आहात. ही अवस्था करायची का महाराष्ट्राची. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर जेम्स लेन आला. कोण आहे जेम्स लेन. बर्नाड शॉ आहे का? त्या भिकारड्याने जिजाऊसाहेबांबद्दल काहीतरी लिहिलंय, ते आपण उगाळतोय. त्यावरून जाणूनबुजून राजकारण तापवलं जातं.'
'आम्ही आमच्याच दैवतांची अब्रू काढतोय. कसलंच भान राहिलं नाहीये. निवडणुकीत पैशाचा चारा टाकला जातो. जातीपातीतून आम्ही बाहेर येत नाही आहोत. हिंदू म्हणून आपण कधी एक होणार आहोत. ही संपूर्ण विविधता... भाषा, संस्कृती, वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या संस्कृती. 1947 मध्ये हा देश झाला. त्याआधी ही फक्त भूमी होती.' असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.