
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या विरोधात रोष वाढतानाच दिसतो आहे. भारतातल्या दहा राज्यांमध्ये या योजनेला कडाडून विरोध केला जातो आहे. उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा या ठिकाणी आंदोलन तीव्र झालं आहे. उत्तर प्रदेशातल्या बलिया या ठिकाणी ट्रेन जाळण्यात आली. आपण जाणून घेऊ कुठे कसा विरोध केला जातो आहे?
अग्निपथ योजना जाहीर झाल्यानंतर लगेचच या योजनेचा विरोध होण्यास सुरूवात झाली आहे. ही योजना केंद्र सरकारने मागे घ्यावी अशी मागणी आंदोलक विद्यार्थी करत आहेत. सकाळपासून बिहारच्या लखीसराय, बेगुसराय, हाजीपूर, मुंगेर, खगडिया, औरंगाबाद, समस्तीपूर आणि बेतिया या जिल्ह्यांसहीत अनेक ठिकाणी आंदोलन सुरू आहे. काही भागांमध्ये विद्यार्थी थेट रेल्वेच्या रूळांवर उतरून आंदोलन करत आहेत.
उत्तर प्रदेशातल्या बलियामध्ये ट्रेन जाळून या योजनेचा निषेध नोंदवण्यात आला. पोलिसांनी काही आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतलं आहे. हरयाणातल्या नरनौल या ठिकाणी जिल्हा उपायुक्तांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यांच्या घराबाहेर दगडफेकही करण्यात आली. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली.
गुरूवारीही आंदोलनकर्त्यांनी ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन केलं. रेल्वे रोको करतही या योजनेचा विरोध दर्शवला. रेल्वे ट्रॅक्सवर जळते टायर सोडण्यात आले. तसंच काही ट्रेन्सनाही आग लावण्यात आली. रेल्वे खात्याने दिलेल्या माहितीनुसार विद्यार्थ्यांच्या या आंदोलनामुळे ३४ ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २९ या प्रवासी ट्रेन्स होत्या. शुक्रवारीही ३८ हून जास्त ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत.
उत्तर प्रदेश-बिहार पासून मध्य प्रदेश राजस्थाव पर्यंत आंदोलन
बिहार- सर्वात जास्त हिंसक आंदोलन हे बिहारमध्ये सुरू आहे. बिहारमधले विद्यार्थी बुधवारपासून आंदोलन करत आहेत. गुरूवारी हे आंदोलन आणखी उग्र झालं. छपरा, गोपालगंज, कैमूर या ठिकाणी तीन ट्रेन्स जाळण्यात आल्या. शुक्रवारीही सुपौल आणि आरा या ठिकाणी ट्रेन्स जाळून योजनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे. एडीजीपी संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार या आंदोलनात जाळपोळ आणि हिंसा पसरवणाऱ्या १२५ जणांना अटक करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातही आंदोलक विद्यार्थ्यांनी फक्त घोषणा दिल्या नाहीतर तर रस्त्यांवर उतरून आंदोलन केलं. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अलीगढ , आग्रा या ठिकाणी आंदोलक विद्यार्थ्यांनी दगडफेक केली. बुलंदशहर, मथुरा, फिरोजाबाद आणि बलिया मध्ये शुक्रवारीही आंदोलन झालं. शुक्रवारी सकाळी उत्तर प्रदेशातल्या बलियामध्ये ट्रेन जाळण्यात आली. तर वाराणसीत तोडफोड करण्यात आली.
हरयाणा-हरयाणातल्या पलवल या ठिकाणी उपायुक्तांच्या घराबाहेर जोरदार दगडफेक झाली. पलवलशिवाय गुरूग्राम, रेवाडी, चरखी दादरी, हिसार आणि रोहत या ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. पलवलमध्ये हिंसक आंदोलनाप्रकरणात २० पेक्षा जास्त युवकांना अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश-मध्य प्रदेशातल्या ग्वाल्हेर रेल्वे स्टेशनच्या जवळ एका दुकानाच्या भागात आंदोलक विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. इंदूर मध्ये अग्निपथ योजनेला विरोध करत १५० हून जास्त आंदोलक विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. ग्वाल्हेरचे एसपी अमित सांघी यांनी दिलेल्या माहितीनुसार गोला का मंदिर भागात विद्यार्थ्यांनी आंदोलन करत रस्ता अडवून धरला होता त्या ठिकाणी निषेध नोंदवत पुतळाही जाळला. आता या प्रकरणी सीसीटीव्ही फुटेज तपासलं जातं आहे.
राजस्थानमध्ये आरएलपी च्या नेत्यांनीही विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. या ठिकाणी जयपूर, जोधपूर, सीकर, नागौर, अजमेर, आणि झुंझनू मध्ये नारेबाजी करण्यात आली. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करतं आहे असा आपोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केंद्र सरकावर केला आहे.
हिमाचल प्रदेशातल्या कांगडा आणि हमीरपूर या ठिकाणी अग्निपथ योजनेला कडाडून विरोध दर्शवला गेला. कांगडामध्ये काँग्रेस नेते पंकज कुमार यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्याचा प्रयत्न झाला. ज्या ठिकाणी मोदींचा रोड शो होणार होता.
दिल्लीतही काँग्रेसने गुरूवारी रॅली काढून या योजनेचा निषेध नोंदवला. केरळ हाऊस ते जंतरमंतर या ठिकाणी विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. कनॉट प्लेस भागातही आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की काही लोकांनी संमती न घेता जेव्हा कनॉट प्लेस भागात आंदोलन केलं त्यानंतर सहा जणांना ताब्यात घेण्यात आलं. राजीव चौक मेट्रो स्टेशनचे दोन गेटही दिल्लीत बंद करण्यात आले होते.
उत्तराखंडच्या सीतम चौक या भागात गुरूवारी शांततेच्या मार्गाने या योजनेचा निषेध नोंदवण्यात आला. मात्र या आंदोलनामुळे प्रवाशांना फटका बसला. त्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
या आंदोलनाचे पडसाद पश्चिम बंगालमध्येही उमटले. अग्निपथ योजनेचा निषेध नोंदवत कोलकाता या ठिकाणी असलेल्या हावडा पुलावर विद्यार्थी जमले होते. त्यांनी सरकारच्या निर्णयाविरोधात राष्ट्रीय महामार्गही बंद केला होता, त्यानंतर पोलीस आले आणि त्यांनी या सगळ्यांना बाजूला केलं.
झारखंडमधल्या रांचीतही लष्कराच्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली गेली. रांची रेल्वे स्टेशनच्या बाहेर विद्यार्थ्यांनी ठिय्या आंदोलन केलं.