Air India bid : एअर इंडियाची 'घरवापसी'; 'टाटा सन्स' बनले नवे मालक

टाटा समूहाने स्पाईस जेटचे चेअरमन अजय सिंह यांच्यापेक्षा जास्त लावली होती बोली
Air India bid : एअर इंडियाची 'घरवापसी'; 'टाटा सन्स' बनले नवे मालक
एअर इंडियाची मालकी मिळवण्यात टाटा ठरले यशस्वी...Reuters

देशातील राष्ट्रीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया पुन्हा टाटा उद्योग समूहाच्या ताब्यात जाणार आहे. केंद्र सरकारने निर्गुंतवणूक धोरणातंर्गत एअर इंडियाच्या खासगीकरणासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. यात अखेर टाटा सन्सने बाजी मारली आहे. स्पाईस जेटचे चेअरमन अजय सिंह यांच्यापेक्षा जास्त बोली टाटा समूहाने लावली होती. अखेर ६८ वर्षांनंतर टाटा पुन्हा एअर इंडियाचे मालक होणार आहेत.

कर्जाच्या ओझ्यामुळे डबघाईस आलेल्या राष्ट्रीय हवाई वाहतूक विमान कंपनी एअर इंडियाचं खासगीकरण करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला होता. तोट्यात सुरु असलेल्या एअर इंडियाला विकण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते.

यापूर्वी केंद्र सरकारने कंपनीतील ७६ टक्के भागीदारी विकण्यासाठी लिलाव प्रक्रिया सुरू केली होती. २०१८ मध्ये केलेल्या या प्रयत्नांना यश आले नाही. कारण कंपनीचं व्यवस्थापन सरकार स्वतःकडे ठेवणार होती. लिलावाला प्रतिसाद न मिळाल्याने केंद्र सरकारने व्यवस्थापन मालकीसह संपूर्ण कंपनीच विक्रीसाठी काढण्याचा निर्णय घेतला होता.

केंद्र सरकारने एअर इंडियाची संपूर्ण मालकी विकण्यासाठी लिलाव काढला होता. यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, वाणिज्य मंत्री पियूष गोयल आणि नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचा समावेश होता. या लिलावासाठी एअर इंडियाची राखीव बोली १५ ते २० हजार कोटी निश्चित करण्यात आली होती.

यात टाटा ग्रुपने स्पाईस जेटचे चेअरमन अजय सिंह यांनी लावलेल्या बोलीपेक्षा जास्त बोली लावली. या लिलावात टाटांनी लावलेली बोली सर्वाधिक असल्यानं टाटा सन्सला विजयी ठरवण्यात आलं. अमित शाह यांच्या अध्यक्षतेखालील समितीने लिलावाला मंजुरी दिली. त्यामुळे जेआरडी टाटांनी सुरू केलेली एअर इंडिया पुन्हा एकदा टाटा समूहात परतली आहे.

या लिलावानुसार एअर इंडियाचं मुंबईतील मुख्य कार्यालय आणि दिल्लीतील एअरलाईन्सचं हाऊस दोन्हींची मालकही टाटांना मिळणार आहे. सध्या मुंबईतील एअर इंडिया कार्यालयाचं बाजारमूल्य १५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त असून, सध्या एअर इंडिया देशात ४४०० तर परदेशात १८०० विमानाचं लॅण्डीग आणि पार्किंग स्लॉट नियंत्रित करते.

जेआरडी टाटांनी सुरू केली होती एअर इंडिया

एअर इंडिया कंपनीची स्थापना टाटा उद्योग समूहाचे प्रमुख जेआरडी टाटा यांनी केली होती. जेआरडी टाटा स्वतः वैमानिक होते. त्यामुळे या कंपनीचं नाव टाटा एअर सर्विस असं ठेवण्यात आलं होतं. १९३८ मध्ये कंपनीने देशातंर्गत विमानसेवा सुरू केली होती. दरम्यान, दुसऱ्या महायुद्धानंतर कंपनीचं राष्ट्रीयीकरण करण्यात आलं.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in