मास्क कुठेय? तुला पोलिसांना उचलायला सांगू का?; अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी

Ajit pawar in baramati : बारामती येथील सहकार व पणन मंडळाच्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमातील प्रसंग
मास्क कुठेय? तुला पोलिसांना उचलायला सांगू का?; अजित पवारांची बारामतीत टोलेबाजी
कोरोना नियमांचं पालन करा हे जोर देऊन सांगत असतानाच यावेळी अजित पवारांची नजर एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनकडे गेली.Photo- India Today

राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचं भाषण म्हणजे अस्सल ग्रामीण भाषेतील विनोदाची पखरण असते. भाषणात बोलता-बोलता दादा अनेकांची फिरकी घेतात. त्यामुळे साहजिकच गर्दीतून हास्याचे तुषार उडतात. तर कधीकधी मिश्किलपणे ते एखाद्याची कानउघाडणी देखील करतात. बारामती येथील सहकार व पणन मंडळाच्या शनिवारी झालेल्या कार्यक्रमात असाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मिश्किलपणाचा प्रत्यय आला.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते बारामती बाजार समितीच्या फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचं भूमीपूजन झालं. बारामतीत पार पडलेल्या या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाबाबत अजुनही काळजी घेणं गरजेचं आहे. तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लसीकरणाचा वेग वाढवला जात आहे. लवकरात लवकर लसीकरण व्हावे यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहे. त्यासाठी मार्गदर्शक सुचनांचे पालन करा, असं आवाहन केलं.

कोरोना नियमांचं पालन करा हे जोर देऊन सांगत असतानाच यावेळी अजित पवारांची नजर एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामनकडे गेली. त्याचा मास्क हनुवटीवर असल्याचे पवार यांच्या निदर्शनास आले. ते लगेच म्हणाले, ‘अरे मी काय सांगतो? तुझा मास्क कुठेय? तुझ्यामुळे शेजारी असणाऱ्याला कोरोना व्हायचा. उचलायला सांगू का पोलिसांना’, अशा शब्दात त्यांनी कानउघाडणी केली. यावर कार्यक्रमस्थळी हशा देखील पिकला.

अजित पवारांनी सांगितला बाळासाहेब पाटलांबद्दलचा किस्सा

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचं कारण नसतानाच विधानसभेचे तिकीट एका निवडणुकीमध्ये पक्षानं कापलं. त्यावेळी बाळासाहेब पाटील यांनी बंडखोरी केली. आम्ही सुद्धा त्यांना ‘करा’ असं म्हणालो. त्यानंतर बाळासाहेब ४३ हजारांच्या मताधिक्यानं विजयी झाले. विजयी झाले तरी शरद पवार यांना बाळासाहेब दैवत मानत असल्याने त्यांनी राष्ट्रवादी सोडली नाही', असा किस्सा अजित पवारांनी सांगितल्यानंतरही जोरदार हशा पिकला.

यावेळी बोलताना अजित पवारांनी फळे व भाजीपाला केंद्राबद्दलही भाष्य केलं. 'फळे व भाजीपाला हाताळणी केंद्राचा बारामतीसह आसपासच्या तालुक्यांना फायदा होईल. एक हजार कोटी रुपयांचा प्रकल्प राज्यात राबवत आहोत. प्रत्येक जिल्ह्यात हे सुविधा केंद्र सुरु केलं जाणार आहे. फळांवर प्रक्रिया करण्याचं काम या प्रकल्पात होणार असून, शेतकऱ्यांनी पिकवलेला शेतमाल जगाच्या बाजारपेठेत पाठवण्यासाठी हा प्रकल्प आहे', असं अजित पवारांनी म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in