'अरे बाबा, मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहुदे'; वर्तनावरून अजित पवारांनी टोचले आमदारांचे कान

मांजरीचा आवाज काढल्याच्या प्रकरणाचे विधानसभेत पडसाद : अजित पवारांनी अध्यक्षांकडे केली शिक्षा देण्याची मागणी
'अरे बाबा, मुख्यमंत्र्यांची खुर्ची तरी राहुदे'; वर्तनावरून अजित पवारांनी टोचले आमदारांचे कान
विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार.

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे सभागृहात जात असताना भाजपचे आमदार नितेश राणे यांनी मांजरीचा आवाज काढत त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरून आज विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी वर्तणुकीचे धडे देत सर्वच आमदारांचे कान टोचले. विधिमंडळाच्या आवारात सभागृहाच्या प्रतिमेला धक्का बसेल, असं वर्तन करणाऱ्या आमदारांना शिक्षा देण्याची मागणी अजित पवारांनी यावेळी विधानसभा अध्यक्षांकडे केली.

अजित पवार काय म्हणाले?

"आचारसंहितेचं पालन करणं सभागृहातील प्रत्येक सदस्याचं कर्तव्य आहे. राज्यातील प्रत्येकजण विधिमंडळातील सदस्यांच्या वर्तनाकडे लक्ष ठेवून असतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. सुनील प्रभु यांनी अर्ज दिला होता. या सभागृहात सहकारातील प्रतिनिधी म्हणून येतात. काही नगरपंचायत, महापालिकेचं प्रतिनिधीत्व करतात. काहीजण नव्या कोऱ्या पाटीसारखे असतात. त्यांना कसलाही अनुभव नसतो. त्यांचं काम असतं, पक्षाचा पाठिंबा असतो. त्यामुळे ते निवडून येतात. काही पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून अनुभव घेतात आणि तिथून निवडून येतात, ही आजपर्यंतची परंपरा आहे. हे आपण पाहिलेलं आहे."

"विधिमंडळाचा सदस्य सभागृहात कसा वागतो, कसा बोलतो; विधिमंडळाच्या आवारात त्याचं वर्तन कसं आहे. सार्वजनिक जीवनात तो कशा पद्धतीने वावरतो. या सगळ्यांवर फक्त त्या सदस्याचीच नाही, तर सभागृहाची विधिमंडळाची प्रतिमा ठरते, याची जाणीव सगळ्यांनीच ठेवली पाहिजे. या सभागृहातील सर्व सन्माननीय सदस्यांना माझी विनंती आहे. गेल्या काही वर्षांमध्ये आपल्यापैकी काही जणांच्या वर्तनामुळे सभागृहाच्या प्रतिमेला, मानसन्मानाला धक्का बसला आहे. ही प्रतिमा आणखी ढासळू नये, तिला उंचावण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे आज आवश्यक झालं आहे."

"विधिमंडळ आवारात आणि सार्वजनिक जीवनातील वर्तनाबद्दल अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. हे मला सर्वांच्या लक्षात आणून द्यायचं आहे. आदर्श वर्तन आचारसंहितेबद्दल सगळ्यांनी सकाळच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, या सभागृहाचं कामकाज... आम्ही 30 वर्षांपूर्वी आलो. आमच्यापूर्वी बाळासाहेब थोरात 35 वर्षांपूर्वी आले. त्यावेळची गोष्ट वेगळी होती. त्यावेळी काही लाईव्ह दाखवलं जात नव्हतं. आता थेट प्रक्षेपण टीव्ही केलं जात आहे. त्यामुळे विधिमंडळ सदस्याचं वर्तन शोभेल आणि कुणाचा अवमान होणार नाही, अशा पद्धतीचं असलं पाहिजे."

"एका गोष्टीची खंत आहे. मी माझी मतं नेहमीच स्पष्टपणे मांडतो. त्यामध्ये मी कधीही पक्षीय राजकारण आणत नाही. परंतु संसदीय सदाचार आणि शिष्टाचाराच्या पुस्तकाबद्दल अध्यक्ष महोद्यांनी सांगितलं. प्रत्येकाने हे पुस्तक वाचलं पाहिजे. या सभागृहात निवडून येताना लाखो मतदार तुमच्याकडे बघून मतदान करत असतात. त्यानंतर तुम्ही या सभागृहाचं प्रतिनिधीत्व करतात. कुत्री, मांजरं, कोंबड्या या प्राण्याचं प्रतिनिधी आपण करत नाही, याची जाणिव ठेवली पाहिजे. त्यामुळे विधिमंडळाच्या आवारात प्राण्यांचा आवाज काढणं, सभागृह सदस्यत्वाचा आणि मतदारांच्या विश्वासाघात आणि त्यांचा अपमान आहे. त्यांना वाटतं आपला माणूस तिथे जातो आणि अशा पद्धतीने आवाज काढतो. टवाळी करतोय, काय वाटेल त्यांना?"

"सगळ्यांनीच... चारही प्रमुख पक्ष त्याचबरोबर इतर राजकीय पक्ष यांनी ही गोष्ट गांभीर्याने घेतली पाहिजे. आम्ही ज्यावेळी आमदार झालो त्यावेळी सुधाकरराव चौधरी हे होते. इतका दरारा असायचा की, ते येत असले की, आम्ही दरवाजात उभं राहायचो. त्यांना कुणीही आडवं जायचो नाही. आता कुणीही येतं, इथं बसलेलो असताना शेजारी बसण्यापर्यंत मजल चाललीये. मी त्यादिवशी एकाला सांगितलं की, मुख्यमंत्र्यांची खूर्ची आहे, तेवढी तरी राहूदे रे बाबा. तुला 145 लोकांचा पाठिंबा मिळाला तर बस. आम्ही पाठिंमागे बसायचो. आता एक पत्र आणून दिल्यानंतर दहाव्या मिनिटानंतर दुसरं पत्र आणून देतात. एकदाच काय द्यायचं ते द्या. आपल्या सगळ्यांनी नियमावलीचं पालन केलं पाहिजे. क्रॉसिंग तर कुणाला कळतच नाही. कुठं कोण उभा आहे."

"इथं तर बरेच जण गप्पा मारत असतात. बऱ्याचदा त्यांची पाठ अध्यक्षांकडे असते. अध्यक्षांना पाठ दाखवायची नसते. आल्यानंतर अध्यक्षांना नमस्कार करून मग बसायचं असतं. जातानाही अध्यक्षांना नमस्कार करून मग जायचं असतं. नमस्कार करणं तर काहींनी सोडूनच दिलंय. काय म्हणजे काहीही तारतम्य राहिलेलं नाही. आमदार झालो म्हणजे सगळं समजत असं नाही. अजूनही आम्हाला सगळं समजत नाही, यांना कधी समजायला लागलं. याचा तरी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे."

"कधी कधी काही प्रसंग घडतात. ते प्रसंग तेव्हढ्यापुरते मर्यादित असतात. तितक्या वेळेपुरतं गांभीर्य लक्षात घेऊन राज्यकर्त्यांनी मार्ग काढायचा असतो. विरोधकांनीही समन्वयाचा प्रयत्न करून वेळ मारून न्यायची असते. त्याबद्दल दुमत असण्याचं काहीही कारण नाही. पण कुणी चुकत असेल आणि जोपर्यंत नियम करत नाही, तोपर्यंत तो चुकायचा थांबणार नाही. माझी सभागृहातील सर्व सदस्यांच्या साक्षीने अध्यक्षांना माझी विनंती आहे की, कुणी चुकलं तर नेम करा आणि चार तास बाहेर ठेवा. चारच तास ठेवा, तरी त्याला कळेल आपली काहीतरी चूक झालीये. चार तास कमी वाटतं असेल, तर एखादा दिवस ठेवा. त्याचाही विचार केला पाहिजे. पण एकदम 12-12 महिने कुणाला पाठवू नका, एवढंच मला म्हणायचं आहे."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in