गडकरी-पवार आणि राऊत एकाच रांगेत, पवारांच्या दिल्लीतील घरात सर्वपक्षीय आमदारांचं स्नेहभोजन

राज्यात ईडीच्या कारवाईवरुन रणकंदन सुरु असताना दिल्लीत सत्ताधारी आणि विरोधक एकत्र
गडकरी-पवार आणि राऊत एकाच रांगेत, पवारांच्या दिल्लीतील घरात सर्वपक्षीय आमदारांचं स्नेहभोजन

राज्यात एकीकडे ईडीकडून महाविकास आघाडी सरकारवरील नेत्यांवर होत असलेल्या कारवाईवरुन रणकंदन सुरु असताना राजधानी नवी दिल्लीत वेगळंच चित्र पहायला मिळालं, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी आज सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली. ज्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊत यांचीही हजेरी होती.

महाराष्ट्रातले आमदार सध्या प्रशिक्षणासाठी राजधानी नवी दिल्लीमध्ये आहेत. या निमित्ताने शरद पवार यांनी आमदारांसाठी आज रात्री आपल्या निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवला आहे. या स्नेहभोजनाला राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस तसंच भाजपच्याही आमदारांना निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यानुसार चारही पक्षांचे आमदार आणि काही निवडक खासदारांनी या स्नेहभोजनाला उपस्थिती लावली आहे.

पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी आजच्या स्नेहभोजनासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार सुनील तटकरे, डॉ. फौजिया खान, विनायक राऊत, श्रीनिवास पाटील, डॉ. अमोल कोल्हे, श्रीकांत शिंदे, ओमराजे निंबाळकर या खासदारांनी उपस्थिती लावली आहे. दुसरीकडे विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, कृषीमंत्री दादाजी भुसे, रोहित पवार, आदिती तटकरे, सुनील शेळके, झिशान सिद्धीकी, अनिकेत तटकरे, डॉ. प्रज्ञा सातव यांच्यासोबत काही भाजप आमदारांनीही उपस्थित लावली आहे.

दरम्यान ईडीने आजच शिवसेना खासदार संजय राऊत यांची राहतं घर आणि संपत्ती सील केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊतांनी आपल्या नेहमीच्या शैलीत केंद्रीय तपासयंत्रणा आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका केली. परंतू गरज असताना महत्वाच्या ठीकाणी राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आलेले पहायला मिळाले. यानिमित्ताने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती प्रगल्भ असल्याचं पुन्हा दिसून आलं.

Related Stories

No stories found.