आम्हाला एकटं लढू द्या, मग बघू कोणात किती दम ! नाना पटोलेंनंतर भाई जगतापांकडूनही स्वबळाचा नारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्यात महाविकास आघाडी सरकारमधला घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने गेल्या काही दिवसांपासून स्वबळाची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काही दिवसांपूर्वी विधानसभा निवडणूकीत स्वबळावर लढण्याचं वक्तव्य केलं होतं. आज मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनीही स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडी सरकारमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचं दाखवून दिलंय.

राहुल गांधींच्या वाढदिवसानिमीत्त आयोजित कार्यक्रमात भाई जगताप बोलत होते. यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच.के.पाटील उपस्थित होते. “माझी तुमच्याकडे, राहुल गांधींकडे, सोनिया गांधीकडे विनंती आहे. आम्हाला एकटं लढू द्या तेव्हा बघूयात किस मे कितना दम..हा संदेश तुम्ही सोनिया गांधी-राहुल गांधीपर्यंत पोहचवा”, अशी विनंती भाई जगताप यांनी एच.के.पाटील यांना केली आहे.

यावेळी बोलत असताना भाई जगताप यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जात असल्याची खंतही बोलून दाखवली. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवेल असं सांगितलं होतं. शिवसेनेनेही अशीच भूमिका घेतली होती. परंतू काँग्रेसकडून होत असलेल्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीमधल्या कुरबुरी पुन्हा एकदा प्रामुख्याने समोर आल्या आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिन सोहळ्यात भाषण करताना स्वबळाची भाषा करणाऱ्या काँग्रेसला टोले लगावले. “कोरोनाच्या काळात आजही अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. स्वबळावर लढणं हा शिवसेनेचाही हक्क आहे. पण हे स्वबळ फक्त निवडणुकांपूरत असू नये. हे स्वबळ स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं असावं. सध्याच्या परिस्थितीत संकुचित राजकारण केल्यास त्याचा कोणालाही फायदा होणार नाही. काहीजणांना आपण स्वबळावर लढू आणि सरकारला अडचणीत आणू असं वाटत असेल तर ते होणार नाही. आता लोकांसमोर स्वबळाची भाषा करायला गेलात तर ते चपलेने मारतील. सत्ता आणि स्वबळ बाजूला ठेवत सध्या सर्वांनी कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.”

    follow whatsapp

    ADVERTISEMENT