
वसंत मोरे, बारामती
गेल्या चार दिवसांपासून राज्यातील भाजप नेत्यांची दिल्लीवारी सुरू आहे. त्यातच दोन माजी मंत्र्यांनी काल (10 ऑगस्ट) पुन्हा केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्रालयाचा नव्याने पदभार स्वीकारलेले सहकारमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. पण महाराष्ट्रातील 'दोन दिग्गज' नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मात्र वेगळीच चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या आठवड्यात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिल्ली दौरा केला होता. त्यावेळी अमित शाह यांनी देवेंद्र फडणवीस यांना भेट दिली होती. मात्र, चंद्रकांत पाटलांना काही त्यांनी आपल्या भेटीची वेळ दिली नव्हती. त्यामुळे अमित शाह हे चंद्रकांत पाटलांवर नाराज असल्याची चर्चा भाजपमध्ये रंगली आहे.
या चर्चेने आता अधिकच जोर धरला आहे. कारण की, राज्याचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल अमित शहा यांची भेट दिल्लीत जाऊन भेट घेतली आहे.
एकीकडे चंद्रकांत पाटलांचं दिल्लीत दोन दिवसांहून अधिक काळ वास्तव्य असताना देखील अमित शाह यांनी त्यांना भेटीची वेळ दिली नाही. पण आता राधाकृष्ण विखे-पाटील आणि हर्षवर्धन पाटील या दोघांना अमित शाह यांनी भेटीची वेळ दिल्याने मात्र सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
हर्षवर्धन पाटील आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांच्या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला होता. राधाकृष्ण विखे-पाटील तर विरोधी पक्ष नेते होते आणि विरोधी पक्ष नेत्यानेच भाजपात प्रवेश केल्यामुळे त्यावेळी मोठी खळबळ उडाली होती.
2019 मध्ये केंद्रात भाजपचे सरकार आले पण महाराष्ट्रात चक्र फिरली आणि भाजपच्या हातची सत्ता गेली.
तेव्हापासूनच या दोन्ही ‘पाटलांचा’ अज्ञातवास सुरु आहे. कारण भाजपात प्रवेश केल्यापासून दोन्ही नेत्यांना कुठलंही महत्त्वाचं पद मिळालेलं नाही. दोन्ही नेत्यांनी जेव्हा कॉंग्रेस सोडली तेव्हा त्यांच्यात एकच साम्य होतं ते म्हणजे राष्ट्रवादीवरचा रोष. त्यावेळी भाजपकडून त्यांना मोठी आश्वासनं देखील देण्यात आली होती. पण पुढे सत्ताच नसल्याने त्यांना काहीही मिळालं नाही.
दोन्ही नेते सहकार क्षेत्रातले मातब्बर नेते आहेत. साखर कारखाने, दूध महासंघ, सहकारी पतसंस्था या दोघांच्याही राजकारणाचा पाया आहे. दोघांच्याही गाठीशी प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. तरी भाजपात त्यांची म्हणावी तितकी दखल घेतली गेली नाही आणि हिच रुखरुख त्यांनी अमित शहांकडे व्यक्त केली असावी अशीही आता चर्चा आहे.
मात्र याच निमित्ताने एक शंका पुन्हा उपस्थित होत आहे ती म्हणजे अमित शाह यांनी नगर, इंदापूरच्या पाटलांना भेट दिली पण कोल्हापूरच्या पाटलांची मात्र भेट घेतली नाही. कदाचित यामुळेच चंद्रकांत पाटील जाणार आणि संजय कुटे नवे प्रदेशाध्यक्ष होणार अशी चर्चा सुरु आहे.
अमित शाहांसोबत सहकार क्षेत्राशी संबंधित चर्चा
केंद्र सरकारने नव्याने सहकार मंत्रालयाची स्थापना करून त्याचं कॅबिनेट मंत्रिपद हे अमित शाह यांच्याकडे सोपवलं आहे. अमित शाह हे सहकार मंत्री झाल्याने महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीत उलथापालथ होईल असे अंदाज वर्तविले जात आहेत.
त्यातच राज्यात सहकार मंत्री म्हणून काम पाहिलेल्या हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी (10 ऑगस्ट) दिल्लीत अमित शहा यांची भेट घेऊन सहकार तसेच साखर उद्योग व इतर विविध विषयांवरती सविस्तर चर्चा केली.
या भेटीच्या वेळी या दोन नेत्यांनी देशाचे पहिले सहकार मंत्री म्हणून पदभार स्वीकारल्याबद्दल अमित शाह यांचा सत्कार केला.
राज्यातील सहकार चळवळीतील भाजपच्या दोन प्रमुख दिग्गज नेत्यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष या भेटीने वेधून घेतले आहे.
हर्षवर्धन पाटील हे राज्याचे सलग 7 वर्षापेक्षा अधिक काळ सहकार मंत्री होते. तसेच ते पणन मंत्री असताना भारत सरकारने कृषी विपणन संदर्भात नेमलेल्या देशपातळीवरील विविध राज्यांच्या पणन मंत्र्यांच्या समितीचे अध्यक्षही होते.
देशामध्ये महाराष्ट्र व गुजरात ही दोन राज्ये इतर राज्यांच्या तुलनेत सहकार क्षेत्रात आघाडीवर आहेत. केंद्र सरकारने प्रथमच सरकार हे खाते निर्माण केल्याने व या खात्याचे मंत्रिपद अमित शाह यांच्याकडे असल्याने देशातील सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत.
हर्षवर्धन पाटील व राधाकृष्ण विखे पाटील हे राज्यातील सहकार क्षेत्रातील नेते असल्याने अमित शाह यांच्याशी झालेल्या भेटीची जोरदार चर्चा राज्यातील सहकार क्षेत्रात सुरू झाली आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या सहकार क्षेत्रातील अभ्यास व अनुभवाचा उपयोग भाजपकडून केला जाईल अशी चर्चा सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील राजकारणावर सहकार क्षेत्राचा मोठा प्रभाव आहे. राज्यातील सत्तेच्या चाव्या सहकार क्षेत्रावर अवलंबून असल्याचे नेहमीच बोलले जाते. त्यामुळे राज्यातील सहकार क्षेत्रातील या दोन प्रमुख नेत्यांची अमित शाह यांच्याशी झालेली भेट राज्यातील राजकारणावर दूरगामी परिणाम करणारी ठरेल अशीही चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात आहे.