
अमरावतीतत्या शाईफेक प्रकरणाचे विधानसभा सभागृहात चांगलेच गाजले. आमदार रवी राणा यांच्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एखादा आमदार दिल्लीत असताना त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. महाराष्ट्रात असं होणं दुर्दैवी आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
शाई फेक प्रकरणात ३०७ चा गुन्हा दाखल झाला. तो का लावला दिल्लीत असताना माझ्यावर गुन्हा का दाखल झाला. यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांचा दबाव असल्याचा आरोप रवी राणा यांनी औचित्याच्या मुद्याद्वारे सभागृहात उपस्थित करण्यात आला आहे. या प्रकरणी चौकशीसाठी उच्च पदस्थ अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करुन चौकशीचे आदेश गृहमंत्री दिलिप वळसे पाटील यांनी दिले आहेत. मात्र यावरून रवी राणा यांनी गदारोळ घातला. मला बोलू दिलं नाही तर विधानसभेत फाशी घेईन असं आमदार रवी राणा विधानसभेत म्हणाले.
काय म्हणाले रवी राणा?
आमदार रवी राणा यांना सभागृहात बोलण्याची संधी मिळाली तेव्हा ते म्हणाले की, 'छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मनपा आयुक्त, पोलीस आयुक्त यांच्या संगनमताने छिन्नी हातोड्याने काढून तो पुतळा गोडाऊनमध्ये ठेवला. त्यानंतर शिवभक्तांच्या भावना दुखावल्या . संतप्त शिवभक्तांनी मनपा आयुक्तांनी शाईफेक केली त्याचा निषेध करतो. त्यावेळी मी दिल्लीत होतो. तरीही माझ्यावर 307 चा गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारमधील प्रमुख लोकांच्या दबावाखाली माझ्यावर गुन्हा दाखल करण्याचा दबाव टाकण्यात आला. रात्री दीड वाजण्याच्या सुमाराला माझ्या घरात 100 हून अधिक पोलीस आले होते त्यांनी माझ्या कुटुंबीयांना त्रास दिला.'
'यानंतर गृहमंत्री, मुख्यमंत्री यांचा फोन पोलीस आयुक्तांना येऊन गेला. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. आपल्या राज्याला आर. आर. पाटील यांच्यासारखे गृहमंत्री राज्याला असले पाहिजेत. सचिन वाझेसारखे पोलीस अधिकारी राज्य निर्माण करत असतील तर तुमचा अनिल देशमुख होणार. माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी इतका दबाव टाकला की रवी राणा जिथे दिसेल त्याला गोळी मारा असं सांगण्यात आले होते. मी खोटं बोलत असेन तर मला फाशी द्या किंवा मी भर विधानसभेत फाशी घेईन' असं म्हणत रवी राणांनी त्यांचा संताप व्यक्त केला.