Amravati: भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे म्हणतात, अमरावतीत हिंसाचार भडकला कारण...

Amravati Violence: अमरावतीत हिंसाचार का भडकला याबाबत आता भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे यांनी बाजू मांडली आहे.
amravati violence former bjp minister anil bonde statement
amravati violence former bjp minister anil bonde statement

अमरावती: अमरावतीमध्ये दोनच दिवसांपूर्वी भीषण हिंसाचार भडकला होता. मात्र आता शहरातील परिस्थिती काहीशी नियंत्रणात आहे. पठाण चौक, इतवारा बाजार, चित्रा चौक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच विविध जिल्ह्यातील जवळपास 4000 पोलीस कर्मचाऱ्यांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

भाजप नेते आणि माजी मंत्री अनिल बोंडे यांना काल (15 नोव्हेंबर) पोलिसांनी अटक केली होती. ज्यानंतर त्यांना कोर्टाने जामिनावर सोडलं. यानंतर माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे यांनी अमरावतीत हिंसाचार का उसळला याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

पाहा अनिल बोंडे नेमकं काय म्हणाले:

200 पोलिसांचा माझ्या घराभोवती होता गराडा

'काल सकाळीच पाच वाजल्यापासून 200 पोलिसांनी माझ्या घराभोवती गराडा टाकला होता. त्यानंतर सहा वाजता पोलिसांनी मला अटक केली. यावेळी माझ्यासोबत भाजपच्या 13 लोकांनाही सर्च ऑपरेशन करुन अटक करण्यात आलं. अमरावतीच्या न्यायालयाने आम्हाला सगळ्यांना जामिनावर मुक्त केलं. परंतु नवाब मलिकसारखा बेताल वक्तव्य करणारा माणूस दारु आणि पैशाचे आरोप करतो आहे.' असं अनिल बोंडे म्हणाले.

'शांतता मोर्चावर हल्ला करण्यात आला'

'खरं जर पाहिलं तर 12 तारखेला काही इतर धर्मीय लोकांनी जो हिंसाचार भडकवला, दुकानं फोडण्यात आली. अनेकांवर जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्याच्यावर संतप्त प्रतिक्रिया भाजपच्या शांततापूर्ण निर्दशनातून देण्यात आली. राजकमल चौकात आमची शांततापूर्ण निदर्शने सुरू होती. त्या शांततापूर्ण निदर्शनावरही नमुना गल्ली परिसरातील काही लोकांनी हल्ला केला. दगडफेक केली. त्यामुळे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर त्याची स्वाभाविक प्रतिक्रिया उमटली.' अशी माहिती त्यांनी दिली.

'आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरुय'

'ते म्हणाले लोकांच्या मनामध्ये राग आहे तरीही आम्ही लोकांनी शांतता ठेवण्याचं आवाहन केलं आहे. 12 तारखेला झालेल्या हिंसाचारात ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांना भरपाई देण्यात यावी. त्याचबरोबर जखमी झालेल्या युवकांच्या उपचाराचा खर्च उचलावा. ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांच्यावरच 307 कलम लावली जात आहे. आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. तसं होता कामा नये.' असं म्हणत अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर देखील निशाणा साधला.

'नवाब मलिकांना कोर्टात खेचणार'

'नवाब मलिकसारख्या माणसाने बेताल वक्तव्य केलं आहे. त्यांनी सिद्ध करुन दाखवावं त्यांचं वक्तव्य. त्यांच्यावर आतापर्यंत आठ-दहा अब्रूनुकसानीचे दावे आहेत. त्यांना सुद्धा मी अमरावतीच्या न्यायालयात खेचणार. कारण अमरावतीमधल्या सगळ्या संतप्त नागरिकांचा त्यांनी अपमान केला आहे.' असं म्हणत नवाब मलिक यांच्याविरोधात खटला दाखल करणार असल्याचं त्यांनी म्हटलं.

दुसरीकडे पोलिसांनी अटकसत्र सुरू ठेवले आहे. आतापर्यंत 60 आंदोलनकर्त्याना अटक झालेली असून भाजप नेते तुषार भारतीय यांना अटक केली करण्यात आली आहे, त्याचबरोबर आमदार प्रवीण पोटे यांचाही शोध सुरू आहे.

संवेदनशील ठिकाणी पोलीस फोर्स तैनात आहे. तसेच पोलिसांमार्फत रूट मार्चही काढला जात आहे. समाजकंटकाना सोडले जाणार नाही. नागरिकांनी शांतता कायम ठेवण्याची असं आवाहन अमरावती पोलीस आयुक्त आरती सिंह यांनी केलं आहे.

amravati violence former bjp minister anil bonde statement
अमरावती हिंसाचार प्रकरणी धरपकड; 100 हून अधिक जणांना अटक, संचारबंदी अंशतः शिथिल

परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर संचारबंदी उठवण्यात येईल: यशोमती ठाकूर

संचारबंदीनंतर अमरावती शहरातली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. दरम्यान, गेल्या 24 तासात एकही विपरीत घटना घडली नसल्याचं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे. 'कालपासून स्थिती नियंत्रणात आहे. ग्रामीण भागातील जमावबंदी उठवण्यात आली आहे. पण काही कारणास्तव अंजनगाव-सुर्जी तालुक्यात 144 कलम कायम आहे. जेवढ्या लवकर परिस्थिती नियंत्रणात येईल तेवढ्या लवकर सूट देण्यात येईल. मात्र काही संवेदनशील भागात बंधन कायम राहतील.'

'मूलभूत सुविधांसाठी दोन ते चार याकाळात सूट देण्यात आली आहे. मात्र हळूवारपणे सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन आपण निर्णय घेऊ.' असं पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in