
अमृता फडणवीसांचं आणखी एक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे गाणं रिलीज करण्यात आलं असून, यातून डॉक्टरांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. अमृता फडणवीसांनी काही दिवसांपूर्वीच पुण्यात या गाण्याची घोषणा केली होती.
अमृता फडणवीस यांच्या आवाजातील गणेशोत्सव विशेष गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात अमृता फडणवीस नव्या रुपात बघायला मिळाल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी पारंपरिक मराठमोळी वेशभूषा केलेली आहे.
अमृता फडणवीस यांनी ट्वीट करून या गाण्याबद्दल माहिती दिली आहे. गणेश वंदना गाणं रिलीज झालं असून, हे गाणं जसं मला आवडलं, तितकंच तुम्हालाही आवडेल, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.
अमृता फडणवीस यांनी २ सप्टेंबरला गाण्याचं पोस्टर ट्वीट केलं होतं. त्याचबरोबर लवकरच गाणं रिलीज होत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. अमृता फडणवीस यांनी गणेश वंदना गायली असून, अभियनही केला आहे.
या गाण्यातून अमृता फडणवीस यांनी कोरोना काळात अहोरात्र सेवा करणाऱ्या डॉक्टरांच्या कार्यालाही सलाम केला आहे. या गाण्यात अमृता फडणवीस यांनी डॉक्टरची भूमिका केली आहे. त्याचबरोबर डॉक्टरांनी केलेल्या सेवेवरही प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
अमृता फडणवीस यांना गायनाची आवड असून, त्यांची अनेक गाणी यापूर्वी रिलीज झालेली आहेत. ‘व्हॅलेंटाईन डे’च्या पार्श्वभूमीवर त्यांचं एक गाणं रिलीज झालं होतं. अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं होतं. त्यानंतर अमृता यांची ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’, ‘ये नयन डरे डरे’ ही गाणीही चांगलीच गाजली होती. त्यामुळे नवीन गाण्याला कसा प्रतिसाद मिळणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.