Amruta Fadnavis: 'चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?', अमृता फडणवीसांचं 'त्या' फोटोवरुन मलिकांना प्रत्युत्तर

Amruta Fadnavis reaction on Nawab Malik: नवाब मलिकांनी केलेल्या गंभीर आरोपाला अमृता फडणवीस यांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. पाहा नेमकं काय म्हटलंय अमृता फडणवीस यांनी.
Amruta Fadnavis: 'चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा?', अमृता फडणवीसांचं 'त्या' फोटोवरुन मलिकांना प्रत्युत्तर
amruta fadnavis tweet reaction nawab malik allegation drug peddler jaydeep rana maharashtra ex cm devendra fadnavis(फोटो सौजन्य: फेसबुक)

मुंबई: महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर सोमवारी (1 नोव्हेंबर) अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या इशाऱ्यावरुन महाराष्ट्रात ड्रग्सचा खेळ सुरु आहे असा आरोप केला आहे. याशिवाय नवाब मलिक यांनी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचा एक फोटो ट्विट केला असून त्यांच्या ड्रग पेडलरसोबत फोटो कसा? असा सवाल त्यांनी विचारला होता. ज्याला आता अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.

'चला आज भाजप आणि ड्रग्स पेडलरच्या नात्याबाबत चर्चा करुया', असं ट्विट करुन नवाब मलिक यांनी आपल्या आज (1 नोव्हेंबर) सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांवर गंभीर आरोप केले. जयदीप राणा ज्याला ड्रग्स पेडलर म्हणून एनसीबीने अटक केल्याचं म्हटलं जात आहे त्याचा फोटो अमृता फडणवीसांसोबत, देवेंद्र फडणवीसांसोबत कसा? असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला होता. ज्याला आता अमृता फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.

अमृता फडणवीस यांनी कोणाचंही नाव न घेता एक सूचक असं ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्या म्हणतात की, 'चोराच्या उलट्या बोंबा का असतात बुवा? कारण विनाशकाले विपरित बुद्धी असते!' त्यामुळे या ट्विटच्या माध्यमातून एक प्रकारे त्यांनी नवाब मलिकांवरच निशाणा साधला आहे.

नेमकं प्रकरण काय?

'भाजपचं ड्रग्स नेक्सस.. हा माणूस जयदीप चंदूलाल राणा (ड्रग्स पेडलर) याला एनसीबीने जून 2021 मध्ये अटक केली होती आणि जो अद्यापही जेलमध्ये आहे. याचं भाजपसोबत नेमके कनेक्शन काय?' असा सवाल राजकीय विश्लेषक निशांत वर्मा यांनी अमृता फडणवीसांसोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करुन विचारला होता. याच ट्विटचा हवाला देत नवाब मलिक यांनी देखील याबाबत काही गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.

'देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी नदी स्वच्छता मोहिमेविषयी गाणं केलं होतं. त्या गाण्याचा फायनान्स हेड जयदीप राणा आहे. देवेंद्र फडणवीस आणि जयदीप राणाचे जवळचे संबंध आहेत.' असं म्हणत मलिक यांनी जयदीप राणा आणि देवेंद्र फडणवीस यांचा देखील एक फोटो शेअर केला आहे.

याच मुद्द्यावरुन आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. जयदीप राणा याचा फडणवीसांना नेमका संबंध काय सवाल नवाब मलिक यांच्याकडून विचारण्यात आला आहे. अशावेळी आता स्वत: अमृता फडणवीस यांनी सूचक ट्विट करुन प्रत्युत्तर दिलं आहे. दरम्यान, याप्रकरणी आता नवाब मलिक नेमकं काय म्हणणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे अमृता फडणवीस यांचे पती आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील याबाबत प्रतिक्रिया देताना नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला आहे. 'फक्त फोटोच्या आधारे ड्रग्सशी संबंध जोडला जात असेल तर इथे नवाब मलिकांच्या जावयाकडेच ड्रग्स सापडले आहेत. त्यामुळे आता दिवाळीच्या मुहूर्तावर मलिकांनी लवंगी फटाका फोडला असला तरी मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे.' असं फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

Related Stories

No stories found.