नाराज शिवसैनिकांचं बंड मोडून काढण्यात पक्षाला यश, दापोलीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी विजयी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोकणात काही दिवसांपूर्वी रंगलेल्या अंतर्गत वादात नाराज शिवसैनिकांचं बंड मोडून काढण्यात पक्षाला यश आलं आहे. दापोली नगरपंचायत निवडणुकीत परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या प्रयत्नांना यश आलं असून एकूण १७ जागांपैकी १४ जागा शिवसेना-राष्ट्रवादी युतीने जिंकल्या आहेत. रामदास कदम यांच्या बंडखोर गटाचे अवघे २ उमेदवार या निवडणुकीत विजयी झाले असून भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.

काही महिन्यांपूर्वी रामदास कदम यांनी पालकमंत्री अनिल परब यांच्याविरुद्ध आपली नाराजी उघड बोलून दाखवली होती. राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेला मतदारसंघ शिवसेनेने पुन्हा जिंकला. परंतू अनिल परब हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या घशात घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला होता. रामदास कदम यांचा मुलगा आमदार असलेल्या खेड येथील मतदार संघात अनिल परबांनी सर्व नियुक्त्या रद्द करत नवीन पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली.

अनिल परबांच्या या भूमिकेमुळे नाराज रामदास कदमांनी आपल्या समर्थकांना निवडणुकीत उभं रहायला सांगितलं होतं. रामदास कदम यांच्या विधानपरिषदेतील शेवटच्या दिवशीही अनिल परब आणि रामदास कदम यांच्यातली दरी स्पष्टपणे दिसली. त्यामुळे स्थानिक निवडणुकीत रामदास कदम काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष होतं. परंतू अनिल परब आणि सुनील तटकरे यांनी नेटाने किल्ला लढवत दापोली नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दापोलीत महाविकास आघाडीला आपली सत्ता मिळवण्यात यश आलेलं असलं तरीही मंडणगडमध्ये सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती गेल्या आहेत. या भागात नाराज शिवसैनिकांच्या बंडखोरीचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला बसला आहे. या नगरपंचायतीत १७ जागांपैकी राष्ट्रवादी काँग्रेसने ७ तर नाराज शिवसैनिकांच्या शहर विकास आघाडीचे ७ जागा जिंकल्या आहेत. ३ जागांवर अपक्ष विजयी झाले असून सत्तास्थापनेचा दावा करताना या तिन्ही अपक्षांचं मत महत्वाचं असणार आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT