ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण स्थगित झालं आहे. देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या नेत्यांची शिष्टाई यशस्वी ठरली आहे. अनेक वर्षांपासून मी समाज, राष्ट्र आणि राज्य निर्मितीसाठी आंदोलन करत आलो आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन करणं हा दोष नाही. यावेळेला चार वर्षांपासून शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडले आहे. शेतकरी जे पीक काढतो त्यासाठी जो खर्च येतो तो खर्चही त्याला मिळत नाही. स्वामिनाथन आयोग सरकारने स्वीकारला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासन मला देण्यात आलं होतं पण ते पाळलं नव्हतं. मात्र आता देवेंद्र फडणवीस आणि चौधरीजी यांनी आज पंतप्रधानांचा निरोप घेऊन इथे आले. त्यामुळे मी माझा उपोषणाचा निर्णय मागे घेतला आहे असं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे.
आज केंद्र सरकारने मी ज्या 15 अटी सांगितल्या त्या सगळ्या अटी मान्य करण्याचे आणि सहा महिन्यांमध्ये त्याची पूर्तता करण्याचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे मी माझं आमरण उपोषण आंदोलन मागे घेत आहे असंही अण्णा हजारे यांनी सांगितलं.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी आम्ही गेल्या आठ दिवसांपासून चर्चा करतो आहोत. आम्ही आजही त्यांच्याशी चर्चा केली. आज कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनीही आज अण्णा हजारेंची भेट घेतली. त्यांनी आजही ज्या सुधारणा सुचवल्या त्या सगळ्या आम्ही केंद्र सरकारला सांगितलं आहे. नवीन सरकार महाराष्ट्रात स्थापन झालं तेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे आम्हाला अण्णांच्या मागणीकडे म्हणावं तसं काम करता आलं नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं तसंच त्यांचं सगळं म्हणणं आणि मागण्या ऐकून घेतल्या असंही आज देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. आज राळेगणसिद्धी या ठिकाणी देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी भेट घेतली. पुढील सहा महिन्यात अण्णा हजारे यांच्या दिलेल्या आश्वसनांवर अमलबजावणी करण्यात येईल असंही चौधरी यांनी सांगितलं.